ETV Bharat / state

आषाढी वारीच्या तोंडावर इंद्रायणी नदी पुन्हा फेसाळली; कोट्यवधींचा खर्च करूनही वारकऱ्यांच्या नशिबी प्रदूषित पाणी

आळंदीतील पवित्र इंद्रायणी नदीच्या पात्रात रासायनिक फेस साचल्याचं समोर आलं असून, कोट्यवधींच्या निधीनंतरही नदी प्रदूषित असल्यानं भाविकांमध्ये तीव्र संताप आहे.

ALANDI INDRAYANI RIVER POLLUTION
इंद्रायणी नदी पुन्हा फेसाळली (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : July 3, 2026 at 4:10 PM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

पुणे (आळंदी) : आषाढी एकादशीसाठी आळंदीहून श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याचं प्रस्थान 8 जुलैला होणार आहे. पण, लाखो वारकऱ्यांचं श्रद्धास्थान असलेल्या पवित्र इंद्रायणी नदीचं पात्र पुन्हा एकदा रासायनिक फेसानं भरल्याचं धक्कादायक चित्र आळंदीत दिसत आहे. शासनानं नदी स्वच्छतेसाठी आणि प्रदूषणमुक्त करण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केल्याचा दावा केला असला, तरी प्रत्यक्षात मात्र नदीचं प्रदूषण कमी होण्याऐवजी अधिकच गंभीर होत आहे. त्यामुळं यंदाच्या आषाढी वारीसाठी येणाऱ्या लाखो भाविकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

भाविक आणि नागरिकांनी व्यक्त केली नाराजी : आळंदी हे संत ज्ञानेश्वर महाराज यांचं संजीवन समाधीस्थळ आहे. आषाढी वारीपूर्वी आणि वारीदरम्यान लाखो वारकरी इंद्रायणी नदीत पवित्र स्नान करतात. मात्र, यंदा नदीच्या पाण्यावर मोठ्या प्रमाणात रासायनिक फेस साचलेला दिसत असून, नदीचं पाणी प्रदूषित झाल्याचं स्पष्ट दिसत आहे. नदीच्या पाण्यावर पसरलेला पांढराशुभ्र फेस पाहून भाविक आणि स्थानिक नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

प्रतिक्रिया देताना निसार शेख (ETV Bharat Reporter)

ग्रामस्थांनी केला आरोप : स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, नदीकाठावरील अनेक औद्योगिक कंपन्या, कारखाने तसंच गृहनिर्माण सोसायट्यांकडून कोणतीही योग्य प्रक्रिया न करता सांडपाणी आणि रासायनिक पाणी थेट इंद्रायणी नदीत सोडलं जात आहे. त्यामुळं नदीच्या पाण्याची गुणवत्ता दिवसेंदिवस खालावत आहे. जलीय जीवसृष्टीवरही त्याचा विपरीत परिणाम होत आहे. अनेकवेळा तक्रारी करूनही संबंधित यंत्रणांकडून ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

खर्चाचं नेमकं काय झालं? : शासनानं 'नमामी इंद्रायणी' प्रकल्पांतर्गत नदी स्वच्छता, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, नदी संवर्धन आणि प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा निधी खर्च केला. मात्र, प्रत्यक्षात नदीतील प्रदूषण कायम असल्याने या खर्चाचं नेमकं काय झालं? असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. वारीच्या तोंडावरच नदीची अशी अवस्था झाल्यानं प्रशासनाच्या नियोजनावरही प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

नदी प्रदूषण रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात : दरवर्षी लाखो वारकरी इंद्रायणी नदीत स्नान करून विठ्ठल दर्शनासाठी पंढरपूरकडं प्रस्थान करतात. अशा परिस्थितीत प्रदूषित पाण्यात स्नान केल्यामुळं त्वचारोग, संसर्गजन्य आजार आणि इतर आरोग्यविषयक समस्या उद्भवण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे वारीपूर्वी तातडीनं नदी प्रदूषण रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी वारकरी, ग्रामस्थ आणि पर्यावरणप्रेमींनी केली आहे. प्रशासनानं नदीत सोडलं जाणारं सांडपाणी तत्काळ बंद करून दोषींवर कठोर कारवाई करावी. तसंच इंद्रायणी नदीचं पावित्र्य आणि पर्यावरण जपण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आता जोर धरत आहे. आषाढी वारीसारख्या पवित्र सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर लाखो भाविकांना स्वच्छ आणि सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देणं ही प्रशासनाची जबाबदारी असल्याचे नागरिकांचं म्हणणं आहे.

हेही वाचा :

  1. स्वातंत्र्यदिनी रायगडमध्ये ध्वजारोहण कोण करणार? मंत्री भरत गोगावले यांनी थेटच सांगितलं
  2. दोन दिवस पाऊस; तरी पुण्याचा पाणीप्रश्न कायम, खडकवासला 15 टक्के भरलं, तर टेमघर पूर्णपणे कोरडं
  3. कोल्हापूर जिल्ह्यात दमदार पाऊस, गडहिंग्लज-चंदगड दरम्यानचा पर्यायी पूल खचला, जिल्ह्याला आज ऑरेंज अलर्ट