'अजित दादांचा अपघात की घातपात? उत्तर मिळेपर्यंत लढा सुरूच राहणार', अमोल मिटकरींचा निर्धार
रोहित पवार यांच्यासोबत विचारलेल्या प्रश्नांमध्ये आपणही ठामपणे उभे असल्याचं अमोल मिटकरी म्हणाले.


Published : February 28, 2026 at 1:44 PM IST
मुंबई : अजित पवार यांच्या विमान अपघाताला आज 28 फेब्रुवारी रोजी एक महिना पूर्ण झाला असला तरीही या घटनेभोवतीचे प्रश्न अद्याप अनुत्तरीत असल्यानं संशयाचं सावट कायम असल्याची भावना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी व्यक्त केली. अजितदादांच्या निधनाचं दुःख अजूनही कमी झालेलं नाही आणि लोकांच्या मनातील शंकेचे काहूर तसेच असल्याचंही अमोल मिटकरी यांनी सांगितलं. याचबरोबर, अपघाताबाबत ठोस पुरावे समोर आलेले नाहीत. तसंच मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात तक्रार नोंद झाली नसल्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला. ब्लॅक बॉक्सचे नुकसान, तांत्रिक बाबी, तसंच काही कथित राजकीय कनेक्शन यामुळं प्रश्न अधिकच गहिरे झाले असल्याचंही अमोल मिटकरी यांनी म्हटलं आहे.
घातपाताचा संशय व्यक्त होतोय : बारामती परिसरात सेफ लँडिंगचा इतिहास असताना शेवटच्या क्षणी विमान उतरवण्याची शक्यता होती का? असा सवाल त्यांनी केला. इंजिनमध्ये स्फोट, गुप्तचर यंत्रणांचे अपयश, रडारवरून विमान गायब होणे या सर्व कारणांमुळे घातपाताचा संशय व्यक्त होत असल्याचं त्यांनी नमूद केलं. तसंच इतक्या मोठ्या नेत्याच्या अपघातानंतरही तपासात स्पष्ट निष्कर्ष न लागल्याची खंत व्यक्त करत त्यांनी सुमित कपूर यांचा शोध घेतला जात नसल्याबद्दलही प्रश्न उपस्थित केला. याचबरोबर, या संपूर्ण प्रकरणाची चौकशी स्वतंत्रपणे सीबीआयकडे का देण्यात आली, याबाबतही त्यांनी शंका व्यक्त केली.
उत्तर मिळेपर्यंत प्रश्न विचारत राहणार : सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन चौकशीची मागणी केल्याचं अमोल मिटकरी यांनी सांगितलं. तसंच घरातील व्यक्ती गमावलेल्या कुटुंबानं स्टंट करण्याचा प्रश्नच नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. रोहित पवार यांच्यासोबत विचारलेल्या प्रश्नांमध्ये आपणही ठामपणे उभे असल्याचं अमोल मिटकरी म्हणाले. "अजित दादा माझ्यासाठीही जवळचे होते, त्यामुळं उत्तर मिळेपर्यंत प्रश्न विचारत राहणार," असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. पक्षांतर्गत टीकेबाबत बोलताना त्यांनी सांगितलं की, काही नेते “तुम्ही का बोलता?” असा प्रश्न विचारतात; मात्र जे योग्य वाटतं, तेच आपण करत असल्याचं त्यांनी ठामपणे सांगितलं. राजकीय भूमिका वेगळी असली तरी अपघाताविषयी प्रश्न विचारणाऱ्यांच्यासोबत राहणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
सत्य समोर आणण्याचा प्रयत्न : दरम्यान, धनंजय मुंडे यांच्या टीकेलाही त्यांनी प्रत्युत्तर दिलं. प्रश्न विचारणं ही चमकोगिरी नसून सत्य समोर आणण्याचा प्रयत्न असल्याचं अमोल मिटकरी यांनी म्हटलं आहे. तसंच राज ठाकरे यांच्याबाबत बोलताना, त्या काळात धोका होता की, धुक्याची परिस्थिती होती, यावर चर्चा सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच अजित पवार यांच्या निधनानं निर्माण झालेली पोकळी सुनेत्रा पवार भरून काढतील आणि राज्याला सक्षम नेतृत्व देतील, असा विश्वासही अमोल मिटकरी यांनी व्यक्त केला. याशिवाय, अजित पवार यांचा अपघात की घातपात याचे सत्य समोर येईपर्यंत लढा सुरू ठेवणार असल्याचा निर्धार अमोल मिटकरी यांनी पुन्हा व्यक्त केला.
हेही वाचा :

