अजित पवार विमान दुर्घटना प्रकरण : सीबीआय चौकशीवरून राजकीय संघर्ष वाढण्याची शक्यता
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेतील निधनानंतर राज्याच्या राजकारणात आरोप–प्रत्यारोपांची मालिका सुरू झाली आहे.

Published : February 23, 2026 at 6:37 PM IST
मुंबई - अजित पवार विमान दुर्घटनेची सीबीआयमार्फत चौकशी व्हावी, अशी मागणी राज्य सरकारने केंद्राकडे केली असताना विरोधकांनी मात्र या भूमिकेवर संशय व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी पत्रकारांशी संवाद साधताना या दुर्घटनेबाबत दु:ख व्यक्त केलं. संबंधित विमानाचा आपण 4 ते 5 वेळा वापर केल्याचं त्यांनी नमूद केलं. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाकडून (DGCA) 13 तांत्रिक बाबींची चौकशी सुरू असल्याची माहिती देत, “निष्पक्ष आणि पारदर्शक तपास व्हावा, यासाठी सीबीआय चौकशीची विनंती केंद्र सरकारला केली आहे. सत्य बाहेर यायलाच हवं,” असं ते म्हणाले.
गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)चे आमदार आणि अजित पवार यांचे पुतणे रोहित पवार हे अजित पवारांच्या अपघाताची सीबीआय चौकशी झाली पाहिजे ही मागणी सातत्याने करत आहेत. अजित पवारांचा अपघात हा संशयास्पद असल्याचं ‘प्रेझेन्टेशन’ रोहित पवार यांनी मुंबई आणि दिल्ली येथे पत्रकार परिषद घेऊन दिले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सीबीआय चौकशीबाबत केंद्राला लिहिलेल्या पत्राबाबत सरकारवर टीका केली आहे. रोहित पवार आज विधानभवनात बोलताना सीबीआयकडे अनेक प्रकरणे प्रलंबित असल्याने चौकशीला विलंब होण्याची शक्यता असल्याचा दावा त्यांनी केला. ते म्हणाले , “राज्यात सीआयडी यंत्रणा असताना सीबीआयकडे का धाव घेतली? ब्लॅक बॉक्स जळाला, असं सांगितलं जात आहे; मात्र त्याबाबतची संपूर्ण माहिती समोर आलेली नाही,” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. याचबरोबर शिवसेनेचे (ठाकरे) नेते भास्कर जाधव यांनीही विधानसभेत कोणतीही चौकशी करा पण महाराष्ट्राच्या मनातील संशय दूर करा असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केलं.
सत्ताधारी आघाडीतूनही चौकशीची स्पष्ट रूपरेषा जाहीर करण्याची मागणी होत आहे. शिवसेना (शिंदे) नेते आणि सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी, “चौकशी कोणतीही असो; मात्र तिची व्याप्ती आणि कालमर्यादा स्पष्ट झाली पाहिजे. जनतेच्या मनातील शंका दूर करणे आवश्यक आहे,” असं म्हटलय.
विधानसभेच्या कामकाजाला अजित पवार यांच्या अनुपस्थितीत प्रथमच सुरुवात होत असल्यानं वातावरण भावनिक असलं, तरी राजकीय हालचाली वेगाने सुरू झाल्या आहेत. केंद्र सरकारकडून प्राथमिक अहवाल कधी येणार आणि सीबीआय चौकशीस मंजुरी मिळणार का, याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.
हेही वाचा...

