अजित पवार यांच्या विमान अपघाताची उच्चस्तरीय चौकशी करा, लोणी भापकर गावात कडकडीत बंद
अजित पवार यांच्या विमान अपघातातील मृत्यूनंतर बारामतीत जनक्षोभाची ठिणगी पेटली असून, अपघाताबाबत जनतेच्या मनात मोठा संशय निर्माण झाला आहे. लोक आता संतप्त होताना दिसत आहेत.

Published : February 22, 2026 at 5:09 PM IST
बारामती (पुणे) : राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर त्यांच्या मृत्यूबाबत सखोल आणि पारदर्शक चौकशी व्हावी, अशी मागणी सामाजिक आणि राजकीय स्तरावर जोर धरत आहे. बारामती तालुक्यातील लोणी भापकर इथं ग्रामस्थांनी या मागणीसाठी एकदिवसीय कडकडीत बंद पाळत तीव्र आंदोलन छेडलं आहे.
ग्रामस्थांनी स्पष्ट केलं की, हे आंदोलन सत्य आणि न्यायासाठीचा लोकशाही मार्गानं दिलेला इशारा आहे. अजित पवार यांच्या मृत्यूनंतर बारामतीत जनक्षोभाची ठिणगी पेटली असून, अपघाताबाबत जनतेच्या मनात मोठा संशय निर्माण झाला आहे. लोक आता संतप्त होताना दिसत आहेत.
खरं तर, 28 जानेवारी 2026 रोजी झालेल्या विमान अपघातामुळे महाराष्ट्राला मोठा धक्का बसला. मात्र, घटनेनंतर काही दिवस उलटूनही अपघाताबाबत स्पष्ट माहिती समोर न आल्यानं संशयाचं वातावरण कायम आहे.
अपघाताची चौकशी व्हावी,- गावकऱ्यांची मागणी : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी अपघाताच्या चौकशीची मागणी केल्यानंतर, बारामती परिसरातील विविध गावांमधूनही आवाज उठू लागला आहे. लोणी भापकर गावानं गावबंद आंदोलन करून या मागणीला संघटित स्वरूप दिलं.
अधिकृत यंत्रणांनी अपघाताचा प्राथमिक निष्कर्ष मांडला असला तरी, अनेक प्रश्न अनुत्तरित असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. आंदोलनकर्त्यांनी सांगितलं की, 'ही घटना केवळ अपघात नसून घातपात असू शकतो,' आणि म्हणून स्वतंत्र व उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली. स्थानिक तपासावर विश्वास नसल्यानं केंद्र सरकार आणि राष्ट्रपती स्तरावर चौकशी व्हावी, अशी भूमिका आंदोलनातून मांडण्यात आली.
ग्रामस्थांनी ब्लॅक बॉक्समधील फ्लाइट रेकॉर्डिंग तातडीनं सार्वजनिक करण्याची मागणी केली. अपघाताच्या दिवशी अजित पवार शासकीय निवासस्थानातून निघाल्यापासूनच्या सर्व सीसीटीव्ही फुटेज, व्हिडिओ आणि छायाचित्रं जाहीर का केली जात नाहीत? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. आंदोलनकर्त्यांनी पारदर्शकतेच्या अभावामुळे संशय वाढत असल्याचा आरोप केला. हे आंदोलन लोणी भापकरच्या सरपंच गीतांजली भापकर यांच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात आलं आहे.
ज्या खासगी कंपनीच्या विमानातून प्रवास झाला, त्या कंपनीच्या व्यवस्थापनावर अद्याप कठोर कारवाई का झाली नाही? हा आंदोलनाचा केंद्रबिंदू ठरला आहे. ग्रामस्थांनी मागणी केली की, संबंधित कंपनीच्या मालकाला चौकशीअंती तातडीने अटक करून जबाबदारी निश्चित केली जावी. 'जोपर्यंत दोषींवर कारवाई होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरू राहील,' असा इशाराही त्यांनी दिला.
गावातील सर्व व्यवहार स्वयंस्फूर्तीनं बंद : लोणी भापकरसह आसपासच्या पंचक्रोशीतील व्यापारी, नागरिक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं आंदोलनात सहभागी झाले होते. गावातील सर्व व्यवहार स्वयंस्फूर्तीनं बंद ठेवण्यात आले. 'अजित दादा अमर रहे' अशा घोषणांनी परिसर दुमदुमला. आंदोलनात भावनिक वातावरणासोबतच न्याय मिळवण्याची भूमिका स्पष्टपणे दिसून आली.
लोणी भापकर ग्रामस्थांनी उपस्थित केलेले प्रश्न आता संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय बनले आहेत. हा अपघात नेमका कसा घडला? तांत्रिक कारणं की मानवी हस्तक्षेप? आणि सर्वात महत्त्वाचे, सत्य जनतेसमोर कधी येणार? न्यायाच्या मागणीसाठी सुरू झालेला हा आवाज पुढील काळात राज्याच्या राजकारणात नवे वळण देणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
हेही वाचा
- खासदार अमोल कोल्हे यांचा गौप्यस्फोट, म्हणाले छगन भुजबळ जाणार होते राज्यसभेवर
- अजित पवारांच्या विमान अपघाताची कशी चौकशी सुरूय ? ; रोहित पवारांच्या आरोपानंतर मंत्रालयानं प्रथमच दिलं स्पष्टीकरण
- 'राष्ट्रवादी काँग्रेसचं विलीनीकरण होऊ नये, म्हणूनच अजित पवारांच्याबाबतीत घातपात झाला'- रोहित पवारांचा गंभीर आरोप

