ETV Bharat / state

'राज्यभरातील नागरिकांनी आपल्या-आपल्या भागात एफआयआर दाखल करावेत'-रोहित पवारांचे आवाहन

अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत विधानभवन परिसरात बोलताना रोहित पवार यांनी गंभीर आरोप केले. अपघातानंतरच्या तपासाच्या कालरेषेत, नियामक संस्थेच्या अहवालांमध्ये विसंगती आढळत असल्याचं त्यांनी म्हटलं.

Ajit Pawar death probe
संग्रहित-डावीकडे अजित पवार विमान अपघात, उजवीकडे राोहित पवार माध्यमांशी बोलताना (Source-IANS/ANI)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : February 25, 2026 at 4:32 PM IST

|

Updated : February 25, 2026 at 5:43 PM IST

3 Min Read
Choose ETV Bharat

मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या 28 जानेवारी रोजी झालेल्या विमान अपघातप्रकरणी केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री राममोहन नायडू आणि नागरी विमान वाहतूक महासंचालनालयावर (Directorate General of Civil Aviation) गंभीर आरोप केले. संबंधित विमान चालवणाऱ्या ‘व्हिएसआर कंपनी’ला वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याचा दावा त्यांनी केला. एफआयआर दाखल न झाल्यानं सर्वांना एफआयआर दाखल करण्याचं आवाहन केलं.

नागरी विमान वाहतूक महासंचालनालयानं (Directorate General of Civil Aviation) ‘व्हीएसआर’ कंपनीविरोधात कारवाई करत त्यांच्या चार विमानांना ‘ग्राऊंड’ केल्याची माहिती समोर आल्यानंतर आमदार रोहीत पवार यांनी संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यासाठी पुढाकार घेतला. यासाठी ते आज मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात दाखल झाले होते. पोलीस ठाण्यात त्यांच्या तक्रारीची नोंद घेण्यात येत होती. त्यानुसार जबाब नोंदवण्यास सुरुवातही झाली होती. मात्र, त्याचवेळी काही वरिष्ठ अधिकारी तेथे दाखल झाले. एफआयआर नोंदवता येणार नसल्याचा सांगितल्याचा दावा रोहित पवार यांनी केला. त्यानंतर पोलीस ठाण्याबाहेर येत माध्यमांसमोर संताप व्यक्त केला.

आमदार रोहित पवारांनी काय केलेत आरोप? (Source- ETV Bharat Reporter)



रोहित पवार यांनी केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्र्यांवर टीका करताना सांगितलं की, “त्याचदिवशी मंत्री महोदयांनी ‘व्हीएसआर’ लिअरजेटमध्ये कोणतीही सुरक्षात्मक उणीव नसल्याचं विधान केलं. तपास पूर्ण होण्यापूर्वीच वैमानिकाला क्लीन चिट दिली. आपले नेते रुग्णालयात असताना डीजीसीए कंपनीला निर्दोष ठरवण्यात मग्न होती. सर्व काही सुरळीत असल्याचा दावा केला गेला. मात्र, वस्तुस्थिती वेगळीच आहे,” असा त्यांनी आरोप केला. त्यानंतरच्या डीजीसीए अहवालात काही त्रुटी मान्य करण्यात आल्याचं सांगितलं. विशेष लेखापरीक्षणात उड्डाणापूर्वी आवश्यक कागदपत्रांची अनुपस्थिती किंवा अपूर्णता, प्रमाणित सुरक्षा प्रक्रियेचं उल्लंघन तसेच कार्यकारी व्यवस्थापनातील निष्काळजीपणा अशा गंभीर बाबी निदर्शनास आल्या आहेत, असा आमदार रोहित पवार यांनी दावा केला.

अजितदादांचे पार्थिव रुग्णालयात शवविच्छेदनासाठी असतानाच दुपारी 1.36 वाजता डीजीसीएनं प्राथमिक अहवाल प्रसिद्ध केला. त्यात फेब्रुवारीत झालेल्या लेखापरीक्षणात ‘ व्हीएसआर’ कंपनीत ‘लेव्हल-1’ सुरक्षाविषयक त्रुटी आढळल्या नसल्याचे नमूद करण्यात आले- आमदार, रोहित पवार


रोहीत पवार मरिन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये- “तुमच्या निष्काळजीपणामुळे आम्ही एक नेता गमावला. ते उपमुख्यमंत्री होते. पण, जनतेच्या मनातील मुख्यमंत्री होते. या बेपर्वाईमुळे महाराष्ट्राने एक दिग्गज गमावला,” असे भावनिक वक्तव्य दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुतणे रोहित पवार यांनी केलं. या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हस्तक्षेप करावा, अशी मागणीही रोहित पवार यांनी केली. डीजीसीएविरोधात बुधवारी तक्रार दाखल करण्यात येणार असल्याची त्यांनी घोषणा केली.


जबाबदारी डीजीसीएची- रोहित पवार म्हणाले, “डीजीसीएकडून जारी करण्यात आलेल्या परिपत्रकानुसार ‘व्हीएसआर’ कंपनीच्या पाच विमानांवर कारवाई करत त्यांना ग्राऊंड करण्यात आलं. त्या पत्रकातून कंपनीची जबाबदारी अप्रत्यक्षपणे स्पष्ट होते. विमान ठीक आहे की नाही, याची खात्री करण्याची जबाबदारी डीजीसीएची असते. केंद्र सरकारकडून आलेल्या या पत्रकाच्या आधारे आम्ही मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यासाठी आलो.”

गुन्हा नोंदवला जाऊ शकतो- ते पुढे म्हणाले, “एफआयआर करण्याचा अधिकार प्रत्येक नागरिकाला आहे. नव्या कायद्यानुसार (बीएनएस) दखलपात्र गुन्ह्याबाबत माहिती मिळाल्यास गुन्हा नोंदवला जाऊ शकतो. महाराष्ट्रातील एका मराठी नेत्याचा अपघात झाला. त्यांच्यासह आणखी चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना संपूर्ण राज्याला ठाऊक आहे. शवविच्छेदन अहवाल आहेत. अंत्यविधीला लाखो लोक उपस्थित होते. अशा परिस्थितीत महाराष्ट्राचा एक नागरिक म्हणून एफआयआर नोंदवण्यासाठी आलो होतो. वरिष्ठ पीआय उपस्थित होते. मात्र, एका कनिष्ठ अधिकाऱ्यानं असा एफआयआर नोंदवता येणार नाही, असे सांगितलं.”


आपल्या-आपल्या भागात एफआयआर दाखल करावेत- बारामतीला जाऊन पोलीस निरीक्षकांसमोर बसणार आहे. एफआयआर नोंदवला जाईपर्यंत तेथून हलणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. तसेच, हा विषय दडपला जाऊ नये, यासाठी राज्यभरातील नागरिकांनी आपल्या-आपल्या भागात एफआयआर दाखल करावेत, असे रोहित पवार यांनी आवाहन केलं. जनतेचा आणि माध्यमांचा दबाव कायम राहिल्यामुळेच डीजीसीएला सुरुवातीला दुर्लक्षित राहिलेल्या तांत्रिक त्रुटी मान्य कराव्या लागल्यात, असा दावाही त्यांनी केला.



अधिकाऱ्यांवर कोणाचा दबाव आहे?- रोहित पवार यांनी मरिन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये घडलेला प्रकार सांगितला. यावेळी त्यांनी बोलताना अधिकाऱ्यांवर दबाव असल्याचा गंभीर आरोप केला. ते म्हणाले , “आम्ही आमच्या वकिलांमार्फत संबंधित कायद्याच्या तरतुदी अधिकाऱ्यांना समजावून सांगितल्या आहेत. एफआयआर नोंदवण्यासाठी त्यांनी लॅपटॉपही आणला होता. माझे विधान टाइप करण्यास सुरुवात झाली होती. पण, त्याच वेळी डीसीपी तेथे आले. त्यांनी एफआयआर दाखल करता येणार नाही, असे सांगितले". पुढे आमदार रोहित पवार म्हणाले," हा त्यांचा अधिकार आहे. हा दखलपात्र गुन्हा असला तरी एफआयआर होऊ शकत नाही. इतकेच नव्हे, तर तुम्हाला ज्यांना सांगायचे आहे, त्यांना सांगा,’ असेही त्यांनी म्हटलं,” असा आरोप करत रोहित पवार यांनी संताप व्यक्त केला.


हेही वाचा

Last Updated : February 25, 2026 at 5:43 PM IST