ETV Bharat / state

पुण्यातील आंदेकर टोळीचा अहिल्यानगरात दरोड्याचा कट उधळला; कोयता गँग जेरबंद, गावठी कट्टे, जिवंत काडतुसे जप्त

पुण्याच्या कुख्यात आंदेकर टोळीचा अहिल्यानगरात दरोड्याचा कट पोलिसांनी उधळला आहे. स्थानिक गुन्हे शाखेनं ही कारवाई केली.

Ahilyanagar police andekar gang arrest
दरोड्याच्या तयारीत असलेल्या आंदेकर गँगला अहिल्यानगर गुन्हे शाखेने केली अटक (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 28, 2026 at 3:11 PM IST

1 Min Read
Choose ETV Bharat

पुणे - पुण्यात दहशत करणाऱया कुख्यात आंदेकर टोळीतील कोयता गँगचा अहिल्यानगरात मोठा दरोड्याचा कट स्थानिक गुन्हे शाखेने उधळून लावला आहे. मिरावली पहाडाच्या पायथ्याशी दरोड्याच्या तयारीत थांबलेल्या टोळीवर छापा टाकत पोलिसांनी चौघांना जेरबंद केले असून, त्यांच्या ताब्यातून 4 गावठी कट्टे, 10 जिवंत काडतुसे, कोयता, चाकू आणि मोबाईलसह तब्बल 2 लाख 76 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी चार जणांना पाठलाग करून पकडलं - मिलिट्री इंटेलिजेन्स, साउथ कमांडकडून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार मिरावली पहाड परिसरात काही संशयित शस्त्रांसह दरोड्याच्या तयारीत थांबल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीनं सापळा रचला. पोलिसांचं पथक घटनास्थळी पोहोचताच संशयितांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. त्यातील एक आरोपी मोटारसायकलवरून पसार झाला; मात्र पोलिसांनी चार जणांना पाठलाग करून पकडलं.

आरोपींना केली अटक - अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये मुस्ताक ईक्राहीम शेख (रा. आश्रमनगर, कोंढवा, पुणे), विराट उर्फ विल्यम रविंद्र मेहंदळे, समर्थ बाबासाहेब माडळकर आणि समर्थ राजेंद्र दुधभाते (सर्व रा. काकडे वस्ती, कोंढवा, पुणे) यांचा समावेश आहे. तर फरार आरोपीचं नाव आकाश संजय पवार (रा. ब्रम्हतळे, भिंगार) असल्याचं निष्पन्न झालं होतं. आरोपींच्या झडतीदरम्यान पोलिसांना गावठी कट्टा, जिवंत काडतूस, कोयता, चाकू आणि मोबाईल असा मुद्देमाल आढळून आला. या प्रकरणी अहिल्यानगर कॅम्प पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता तसेच आर्म अॅक्ट अंतर्गत गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. न्यायालयानं आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

गंभीर गुन्हे दाखल - फरार आरोपी आकाश पवार याचाही स्थानिक गुन्हे शाखेनं शोध घेत त्याला ताब्यात घेतलं. त्याच्याकडून आणखी तीन गावठी कट्टे आणि 9 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. त्यामुळं या टोळीचा मोठा कट उघडकीस आला आहे. तपासात धक्कादायक माहिती समोर आली असून, अटक करण्यात आलेले आरोपी हे पुण्यातील कुख्यात आंदेकर टोळीशी संबंधित असल्याचं निष्पन्न झालं आहे. त्यांच्या विरोधात पुणे शहरात खून, खुनाचा प्रयत्न, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे यांसारखे गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांनी दिली.

हेही वाचा - अक्षय मस्के गोळीबार प्रकरण : गुन्हे शाखेनं आंदेकर टोळीच्या सहा गुंडांना घेतलं ताब्यात