अहिल्यानगर महापालिका निवडणूक रणसंग्राम; 68 जागांसाठी 300 पेक्षा जास्त इच्छुक उमेदवार रिंगणात!
महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा मंगळवारी (30 डिसेंबर) शेवटचा दिवस होता. अखेरच्या दिवशी अहिल्यानगरमध्ये राजकीय पक्षांमध्ये प्रचंड गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं.

Published : December 31, 2025 at 1:49 PM IST
अहिल्यानगर : महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी अहिल्यानगर शहरात अक्षरशः राजकीय रणधुमाळी पाहायला मिळाली. सहाही निवडणूक कार्यालयाबाहेर उमेदवार, समर्थक, कार्यकर्ते आणि नेत्यांची प्रचंड गर्दी झाली होती. रॅल्या, घोषणाबाजी, शक्तीप्रदर्शन आणि धक्काबुक्कीमुळं परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. काही ठिकाणी उमेदवारांना कार्यालयात सोडण्यावरून थेट वादावादी झाली. तर पोलिसांना गर्दी आवरण्यासाठी अक्षरशः नाकीनऊ आले होते.
Ahilyanagar corporation election 2025
पोलीस आणि उमेदवारांमध्ये झाली शाब्दिक चकमक : उमेदवारी अर्जात कोणतीही त्रुटी राहू नये म्हणून उमेदवारांची दोन दिवस धावपळ सुरू होती. मात्र, शेवटच्या दिवशी गर्दी इतकी वाढली की पोलिसांना उमेदवार, सूचक आणि अनुमोदक यांनाच आत प्रवेश द्यावा लागला. तरीही काही कार्यालयांमध्ये प्रवेशावरून पोलीस आणि उमेदवारांमध्ये शाब्दिक चकमक झाली.
2100 अर्ज विक्री, 1300 इच्छुक : महापालिकेच्या 68 जागांसाठी तब्बल 2100 पेक्षा अधिक उमेदवारी अर्जांची विक्री झाली आहे. तर 1300 पेक्षा जास्त इच्छुक उमेदवार रिंगणात उतरले आहेत. त्यामुळं प्रत्येक प्रभागात लढत चुरशीची होण्याचे संकेत मिळत आहेत. गेल्या 13 दिवसापासून सुरू असलेली महायुतीतील जागावाटपाची रस्सीखेच अखेर सोमवारी दुपारी तुटून महायुतीत उघडपणे फूट पडली.
महायुती कोसळली, शिवसेना स्वबळावर : भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांची युती झाली असली, तरी शिवसेना (शिंदे) स्वबळावर निवडणूक लढविण्याच्या निर्णयावर ठाम राहिली आहे. या निर्णयानंतर राजकीय घडामोडींना वेग आला. पक्षांतरांचे सत्र सुरू झालं आहे. महायुती तुटताच युवा सेनेचे राज्य सहसचिव विक्रम राठोड यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केलाय. त्यानंतर शिवसेनेतील (उबाठा) काही पदाधिकाऱ्यांनीही शिवसेनेत प्रवेश केल्यानं शिवसेनेला (उबाठा) धक्का बसला असून शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढल्याचं चित्र आहे.
रॅल्या, शक्तीप्रदर्शन आणि झुंबड, निवडणूक कार्यालये गजबजली : अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी उमेदवारांनी रॅल्या काढून घोषणाबाजी करत शक्तीप्रदर्शनाच्या जोरावर अर्ज दाखल केले. त्यामुळं निवडणूक कार्यालयाचा परिसर पूर्णतः गजबजून गेला. एका कार्यालयात उमेदवारांना आत सोडण्यावरून थेट वादावादी झाली. काही वेळ वातावरण तणावपूर्ण झालं होतं. सकाळपासून सायंकाळपर्यंत सहाही कार्यालयांमध्ये गर्दीचा ओघ कायम राहिला.
राजकीय घराणी पुन्हा मैदानात : दिवंगत माजी खासदार दिलीप गांधी यांच्या सून, माजी नगरसेवक सुवेंद्र गांधी यांच्या पत्नी दीप्ती गांधी यांनी प्रभाग 11 ब मधून महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलाय. त्यामुळं या प्रभागात लढत अधिक रंगतदार होणार आहे.
सुनिता फुलसौंदर यांनी भरला राष्ट्रवादीकडून उमेदवारी अर्ज : शहराचे पहिले शिवसेनेच्या माजी महापौर भगवान फुलसौंदर यांच्या पत्नी सुनिता फुलसौंदर यांनी प्रभाग क्रमांक 14 मधून राष्ट्रवादी काँग्रेसकडून (अजित पवार) उमेदवारी अर्ज दाखल केला. याच प्रभागात गणेश भोसले, मीना चोपडा, प्रकाश भागानगरे यांचेही अर्ज दाखल झाले आहेत. आतापर्यंत शिवसेनेतून निवडून आलेल्या फुलसौंदर कुटुंबाने राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानं शिवसेनेला मोठा राजकीय धक्का बसला आहे.
भाजपा-राष्ट्रवादीचा सर्व्हेने अनेकांची तिकिटं कापली : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा आणि राष्ट्रवादीकडून (अजित पवार) सर्व्हेच्या आधारे उमेदवारी निश्चित करण्यात आली. निवडून येण्याची शक्यता नसल्याचा अहवाल आल्यानं अनेक इच्छुकांची उमेदवारी कापण्यात आली. शेवटच्या क्षणापर्यंत एबी फॉर्मचे वाटप सुरू होते. मात्र फॉर्म न मिळाल्यानं अनेक कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भाजपाच्या तिकिटावर : अहिल्यानगर शहरात आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून राष्ट्रवादीची (अजित पवार) ताकद मोठी मानली जाते. मात्र, सर्व्हेमुळं अनेकांचा पत्ता कट झाला. परिणामी, राष्ट्रवादीचे अनेक कार्यकर्ते भाजपाच्या तिकिटावर निवडणूक रिंगणात उतरल्यानं पक्षांतर्गत नाराजी उफाळून आली आहे.
मनसे 8 जागांवर स्वबळावर निवडणूक लढवणार : "आमचे उमेदवार पळविण्याचा प्रयत्न करण्यात आला. आमचा पक्ष असतानाही बैठकीत इतरांच्या चिन्हावर आमचे उमेदवार उभे करण्याचा हट्ट होता. त्यामुळं आम्ही स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला," अशी माहिती मनसे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ यांनी दिली. मनसे 8 जागांवर स्वबळावर निवडणूक लढवणार आहे.
ठाकरे सेनेचे 24 उमेदवार मैदानात : महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही आघाड्यांमध्ये शेवटच्या क्षणापर्यंत जागावाटपाचा गोंधळ कायम होता. बंडखोरी टाळण्यासाठी अनेक इच्छुकांना शेवटपर्यंत अंधारात ठेवण्यात आले. शेवटच्या क्षणी उमेदवारी कापल्याचं लक्षात येताच काही इच्छुकांनी तत्काळ दुसऱ्या पक्षाचा एबी फॉर्म जोडून अर्ज दाखल केला. महाविकास आघाडीतून ठाकरे शिवसेनेचे 24 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत.
MP Nilesh Lanke says after alliance breaki
- अहिल्यानगरमध्ये महाविकास आघाडीचा तिढा सुटला : अहिल्यानगर महापालिकेची निवडणूक एकूण 68 पैकी शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 32 जागा, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला 24 जागा तर काँग्रेसला देण्यात आल्या 12 जागा आहेत. महायुतीत पडलेल्या फुटीचा फायदा महाविकास आघाडीला होणार असल्याची प्रतिक्रिया खासदार निलेश लंके यांनी दिली.
हेही वाचा -

