साताऱ्यात बनावट खत निर्मिती कारखान्यावर कृषी अधिकारी, पोलिसांची धाड; ३० लाखांची खतं, कीटकनाशक जप्त
जावळीतील ड्रग्सनिर्मितीनंतर खटाव तालुक्यात बनावट खत निर्मिती करणाऱ्या कारखान्याचा पर्दाफाश झाला आहे.

Published : January 10, 2026 at 10:06 PM IST
सातारा - कृषी विभाग आणि स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) खटाव तालुक्यातील वडूजमध्ये धाड टाकून बनावट खत निर्मिती करणाऱ्या कारखान्याचा पर्दाफाश केला आहे. या धाडीत लाखो रूपये किंमतीची बनावट खते आणि कीटकनाशके जप्त करण्यात आली आहेत. तसेच कारखाना सील करण्यात आला असून एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. बनावट खत निर्मिती करणारे रॅकेट सांगली, कोल्हापूर, सिधुदुर्ग, रत्नागिरी आणि पुणे जिल्ह्यातही असल्याचा संशय सातारा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे यांनी व्यक्त केला आहे.
सापळा रचून केली कारवाई - या संदर्भात माहिती देताना भाग्यश्री फरांदे यांनी सांगितले की, "कृषी विभागाच्या जिल्हा भरारी पथकाला काही दिवसांपुर्वी फलटण तालुक्यातील टाकळवाडी सोसायटीत बनावट खते आढळून आली होती. त्यानंतर जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी विभागाने सापळा रचला."

कारखान्यावर टाकली धाड - बनावट खत निर्मितीच्या अनुषंगाने गोपनीय चौकशी करताना वडूजमधील बनावट खत निर्मिती कारखान्याची माहिती मिळाली. त्या आधारे कृषी विभागाचे अधिकारी आणि स्थानिक गुन्हे शाखेने शुक्रवारी (९ जानेवारी) रात्री साडे अकराच्या सुमारास कारखान्यावर धाड टाकली. त्याठिकाणी नामांकित कंपन्यांच्या नावाने तयार केलेली बनावट रासायनिक खते आणि कीटकनाशकांचा साठा आढळून आल्याचे कृषी अधीक्षक फरांदे यांनी सांगितले.

बनावट खत निर्मिती करणारा कारखाना उघड - बनावट खत निर्मिती केली जाणाऱ्या कारखान्याच्या गोदामात अनुदानित रासायनिक खतांपैकी पॅरादीप फॉस्फेट लि. कंपनीच्या डीएपी खताच्या ९० गोण्या, डीएपी खत तयार करण्यासाठीचा कच्चा माल, म्युरेट ऑफ पोटॅश खताच्या १५ गोण्या, नॅशनल ॲग्रो हायटेक कंपनीच्या नावाचे टन बोरिक ॲसिड, २० मेट्रीक टन इतके क्लोरोपायरीफॉस दाणेदार कीटकनाशक, ग्लायफोसेट एसएल या तण नाशकाच्या १ लिटरच्या ३८० बाटल्या, २०० लिटरच्या बॅरलमध्ये साठवलेले रासायनिक द्रव्य कारखान्याच्या गोदामात आढळून आल्या.

सर्व मुद्देमाल जप्त - कारखान्यात झिंक फॉस्फेट, ॲल्युमिनियम फॉस्फाईड, जय किसान कंपनीच्या नावाच्या छापील रिकाम्या गोण्या, इंडियन पोटॅश कंपनीच्या २५० रिकाम्या गोण्या, इफको कंपनीच्या २०० रिकाम्या गोण्याही त्याठिकाणी सापडल्या. सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. संपुर्ण मुद्देमालाची किमत ३० लाखांहून अधिक असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे यांनी दिली आहे.

रॅकेटचा केला पर्दाफाश - बनावट खत निर्मितीचे मोठे रॅकेट पाच ते सहा जिल्ह्यांमध्ये कार्यरत असल्याची खात्रीलायक माहिती देखील कृषी विभागाला मिळाली आहे. त्यानुसार तपासाची चक्रे गतिमान करण्यात आली आहेत. सध्या या प्रकरणाचा तपास सातारा स्थानिक गुन्हे शाखा करत आहे. अशा पध्दतीने शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्याच्या दृष्टीने सातारा जिल्हा कृषी विभाग आणि पोलिसांनी कठोर पावलं उचलली आहेत. जावळी तालुक्यातील ड्रग्ज निर्मिती कारखाना उध्दवस्त केल्यानंतर आता बनावट खत निर्मितीचा पर्दाफाश झाला आहे. त्याचे धागेदोरे कुठपर्यंत जातात, हे पाहणं महत्त्वाचं आहे.
हेही वाचा -

