आखाती देशात अडकलेल्या कोल्हापूरकरांसाठी प्रशासन सज्ज, जिल्हाधिकाऱ्यांचे नागरिकांना आवाहन
आखाती देशांमध्ये अडकलेल्या सुमारे 150 कोल्हापुरकरांपैकी 130 जणांची अधिकृत माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाला प्राप्त झाली आहे.

Published : March 2, 2026 at 4:01 PM IST
कोल्हापूर : आखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे दीडशे नागरिक विविध ठिकाणी अडकले असल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनानं तातडीनं हालचाली सुरू केल्या असून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या माध्यमातून सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. आखाती देशांमध्ये अडकलेल्या सुमारे 150 कोल्हापुरकरांपैकी 130 जणांची अधिकृत माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाला प्राप्त झाली आहे. या सर्व नागरिकांशी प्रशासन सातत्यानं संपर्कात असून ते सुरक्षित असल्याचंही स्पष्ट करण्यात आलं आहे. "युद्धजन्य परिस्थिती लक्षात घेता संबंधित नागरिकांशी संपर्क साधण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. राज्य शासनाकडून मिळणाऱ्या सर्व सूचनांची तंतोतंत अंमलबजावणी केली जात आहे," असं जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सांगितलं.
जिल्हाधिकाऱ्यांचे नागरिकांना आवाहन : "सध्याच्या परिस्थितीत इराण आणि इस्रायलमधील युद्धामुळं सर्व आखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या युद्धजन्य स्थितीमुळं आखाती देशांमध्ये विमान सेवा बंद करण्यात आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील जे नागरिक पर्यटनासाठी किंवा नोकरी व शिक्षणानिमित्त आखाती देशांमध्ये तसंच इस्रायल, इराणमध्ये आहेत, त्यांनी कोणतीही भीती बाळगू नये. केंद्र सरकार तसंच राज्य शासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील या ठिकाणी अडकून असलेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांनी सदर व्यक्तींच्या सर्व माहितीसह (नाव, मोबाईल नंबर, पासपोर्ट) जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडील टोल फ्री क्रमांक 10770 क्रमांकावर संपर्क साधावा," असं आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केलं आहे.
कुस्तीपटू रेश्मा माने अलबेनिया देशात अडकल्या : जागतिक कुस्ती स्पर्धेसाठी गेलेल्या कोल्हापुरातील महिला कुस्तीपटू रेश्मा माने आपल्या टीमसह मायदेशी परतत असताना आखाती देशात सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळं अलबेनिया देशात अडकल्या आहेत. आखाती देशांनी आपल्या हवाई सीमा बंद केल्यामुळं मायदेशी परतताना रेश्मा माने यांच्यासह त्यांच्या टीमला अडचणीचा सामना करावा लागत आहे. "दोन मार्च रोजी रेश्मा माने मायदेशी परतणार होत्या, मात्र तत्पूर्वी विमानाची उड्डाण रद्द झाल्यामुळं त्यांना मायदेशी परतण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या आहेत. आम्ही त्यांच्या सतत संपर्कात असून लवकरच त्या आपल्या टीमसह भारतात परततील," असा विश्वास त्यांचे वडील अनिल माने यांनी व्यक्त केला आहे.
हेही वाचा :

