ETV Bharat / state

खाकीतल्या फिटनेसचा 'विष्णू'! मुलालाही दिले धडे, नोंदवले आंतरराष्ट्रीय विक्रम

कोल्हापूरचे अपर पोलीस अधीक्षक विष्णू ताम्हाणे यांनी 19 वर्षीय मुलासोबत फिटनेसचे नवनवीन विक्रम नोंदवले आहेत.

vishnu tamhane
पोलीस अधिकारी विष्णू ताम्हाणे यांचा फिटनेसचा विक्रम (ETV Bharat GFX)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : January 8, 2026 at 7:16 PM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

पुणे - पोलीस अधिकारी हे नेहमी समाजाला दिशा देण्याचं काम करत असतात. समाज हा गुन्हेगारीमुक्त राहण्यासाठी पोलीस नेहमी कार्यरत असतात. सण, उत्सव, निवडणुका आल्या की पोलिसांच्या बंदोबस्तात वाढ होते. खाकी वर्दी घालून पोलीस आपल्या सेवेसाठी कायम तत्पर असतात. मात्र, अशावेळी त्यांच्या फिटनेसकडं दुर्लक्ष होत असल्याचं अनेक गोष्टीवरुन दिसून येतं. मात्र, कोल्हापूरचे अपर पोलीस अधीक्षक विष्णू ताम्हाणे याला मात्र अपवाद आहेत.

Vishnu Tamhane
पोलीस अधिकारी विष्णू ताम्हाणे यांचा सन्मान (Vishnu Tamhane)

19 वर्षीय गौरांगचं होतंय कौतुक - रोज अनेक किलोमीटरची सायकलिंग, स्विमिंग, रनिंग करुन विष्णू ताम्हाणे व त्यांचा 19 वर्षीय मुलगा गौरांग यांनी फिटनेसला आपलं कर्तव्य मानलं आहे. आताची तरुण पिढी ही मोबाईलच्या आहारी गेली असताना 19 वर्षीय गौरांग यानं वडिलांसोबत विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकल्या आहेत. या पिता पुत्राची सध्या फिटनेस जगात कौतुक होत आहे. रोज न चुकता हे दोघेही व्यायाम करत इतरांनाही फिटनेसकडं लक्ष देण्याचं आवाहन करत आहेत.

ट्रायथलॉन स्पर्धेत पिता पुत्राचं यश - दुबई इथं 13 ते 16 नोव्हेंबरदरम्यान पार पडलेल्या ट्रायथलॉन स्पर्धेत विष्णू ताम्हाणे यांनी वयाच्या 58 व्या वर्षी आपला 19 वर्षीय मुलगा गौरांगसोबत फक्त 5 तास 50 मिनिटांमध्ये ही स्पर्धा पूर्ण करुन अभूतपूर्व कामगिरी केली होती. त्यांच्या या कामगिरीचं सर्वत्र कौतुक झालं.

Vishnu Tamhane
पोलीस अधिकारी विष्णू ताम्हाणे यांचा विक्रम (Vishnu Tamhane)

आयर्नमॅन स्पर्धेत नवा विक्रम - जगभरातील अनेक देशांत आयर्नमॅन स्पर्धा आयोजित केली जाते. ही स्पर्धा खूप कठीण असते, यामुळं सहभागी होणाऱ्या स्पर्धकांची संख्या देखील कमी असते. 1 डिसेंबर 2024 ला झालेल्या स्पर्धेत जगभरातील 1700 स्पर्धक सहभागी झाले होते, त्यापैकी 1100 जणांना ही स्पर्धा यशस्वीपणे पार करण्यात यश आलं होतं. यात अपर पोलीस अधीक्षक विष्णू नाथा ताम्हाणे हे देखील होते. 3.8 किमी स्विमिंग, 180 किमी सायकलिंग आणि 32.2 किमी धावणे हे सलग 17 तासामध्ये पूर्ण करण्याचा आयोजकांचा नियम आहे. मात्र, विष्णू ताम्हाणे यांनी 15 तास 40 मिनिट आणि 40 सेकंदात ही स्पर्धा पूर्ण केली.

फिटनेसची गोडी कशी लागली? - वडील सध्या हयात नसले तरीही आठवणीच्या रूपात ते रोज मला फिटनेससाठी प्रेरणा देत असल्याचं विष्णू ताम्हाणे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितलं. काही वर्षापूर्वी लिफ्ट नसलेल्या बिल्डिंगमध्ये चौथ्या मजल्यावर ते राहत होते. "जवळपास 85 पेक्षा अधिक वय असलेल्या वडिलांना जिना चढण्यास त्रास होत होता. एक दिवस वडिलांना पाठीवर घेतलं व बिल्डिंग खालून जिन्यानं चार मजले चढून वर आलो. त्यानंतर थोड्या वेळानं पाठीत चमक आली. त्यावेळी मला स्वतः बद्दल राग आला, कारण ज्या वडिलांनी मला लहानपणी अंगाखांद्यावर खेळवलं, त्यांच्या उतारवयात आपण भार उचलण्यास सक्षम नाही. तेव्हापासून फिटनेसबाबतची प्रतिज्ञा केली आणि व्यायाम सुरू केला," असं विष्णू ताम्हाणे यांनी सांगितलं. फिटनेसची सवय आता माझ्या मुलालाही लागली असल्याचं ते आवर्जून सांगतात. वडिलांच्या प्रेरणेमुळं आजही मी फिटनेस चालू ठेवला आहे. वडिलांच्या प्रेरणेमुळं व आशीर्वादामुळं फिटनेस क्षेत्रात मला नवनवीन अचिव्हमेंट मिळत असल्याचं ताम्हाणे यांनी सांगितलं.

Vishnu Tamhane
पोलीस अधिकारी विष्णू ताम्हाणे यांचा विक्रम (Vishnu Tamhane)

विष्णू ताम्हाणे यांची कामगिरी -

  • 'दुबई ट्रायथलॉन वर्ल्ड टूर'मध्ये ताम्हाणे पिता-पुत्रांची चमकदार कामगिरी
  • 'आयर्नमॅन' स्पर्धेत यश मिळवून विष्णू ताम्हाणे यांनी नवा विक्रम केला
  • 'फिट इंडिया' मोहिमेला बळ मिळवून देणारी प्रेरणादायी कामगिरी

हेही वाचा - कौतुकास्पद! 58 वर्षीय पोलीस अधीक्षकांचं मुलासह दुबई ट्रायथलॉनमध्ये यश; टी-100 वर्ल्ड टूर स्पर्धा विक्रमी वेळेत पूर्ण