ETV Bharat / state

तेलंगाणा पोलिसांवर महाराष्ट्रात हल्ला; आरोपीला हातकडीसह पळवलं: किनवटमध्ये मध्यरात्री गोळीबाराचा थरार

आरोपीला घेऊन जाणाऱ्या तेलंगाणा पोलिसांच्या वाहनावर आरोपीच्या नातेवाईकांनी दगडफेक करत हल्ला केला. या हल्ल्यानंतर आरोपी हातकडीसह पोलिसांच्या ताब्यातून पळून गेला.

Stone Attacked On Telangana Police
पोलिसांची कार (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : August 31, 2026 at 10:24 AM IST

|

Updated : August 31, 2026 at 12:20 PM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

नांदेड : चोरीच्या गुन्ह्यात अटक केलेल्या आरोपीला घेऊन जाणाऱ्या तेलंगाणा पोलिसांच्या वाहनावर आरोपीच्या नातेवाईकांनी दगडफेक करत हल्ला केला. या हल्ल्यानंतर आरोपीला हातकडीसह पोलिसांच्या ताब्यातून पळवून नेण्यात आल्यानं दोन्ही राज्यांच्या पोलीस यंत्रणेत खळबळ उडाली आहे. ही घटना किनवट शहराजवळ रविवारी मध्यरात्री घडली आहे. शेख जाफर असं तेलंगाणा पोलिसाच्या तावडून हातकडीसह पळवून नेलेल्या आरोपीचं नाव आहे. "महाराष्ट्र आणि तेलंगाणा पोलीस संयुक्तपणे शेख जाफरचा शोध घेत आहेत," अशी माहिती किनवटचे उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रशेखर कदम यांनी दिली.

Stone Attacked On Telangana Police
पोलिसांची कार (ETV Bharat)

एका आरोपीला पळवून नेण्यासाठी थेट दुसऱ्या राज्यातील पोलिसांवर हल्ला झाला. आरोपी आणि हल्लेखोरांच्या अटकेसाठी दोन्ही राज्याच्या पोलिसांचा शोध सुरू आहे. पोलिसांनी शोधमोहीम अधिक तीव्र केली आहे. - चंद्रशेखर कदम, उपविभागीय पोलीस अधिकारी किनवट

तेलंगाणा पोलिसांवर हल्ला करुन पळवला आरोपी : मिळालेल्या माहितीनुसार, तेलंगाणा पोलिसांनी चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी शेख जाफर याला नांदेड जिल्ह्यातील किनवट शहरातून अटक केली. अटकेनंतर तेलंगणा पोलीस आरोपीला आपल्या वाहनातून तेलंगाणाच्या दिशेनं रविवारी मध्यरात्री घेऊन जात होते. मात्र, रात्रीच्या सुमारास किनवट शहराजवळील गोकुळनगर परिसरात पोलिसांचं वाहन पोहोचताच आरोपीच्या नातेवाईकांसह काही जणांनी वाहनाला घेरलं. यावेळी जमावानं पोलिसांच्या वाहनावर जोरदार दगडफेक सुरू केली. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे पोलिसांची एकच धावपळ उडाली. त्यानंतर जमावातील काही जणांनी थेट तेलंगाणा पोलिसांवर हल्ला केला. हल्लेखोरांनी आरोपी शेख जाफर याला पोलिसांच्या ताब्यातून सोडवून घेतलं. त्यानंतर तो हातकडीसह घटनास्थळावरून पसार झाला.

जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांचा हवेत गोळीबार : परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्यानं जमावाला पांगवण्यासाठी तेलंगाणा पोलिसांनी हवेत गोळीबार केल्याची माहिती समोर आली आहे. गोळीबारानंतर परिसरात काही काळ तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. मात्र जमावानं शेख जाफर याला हातकडीसह पळवून नेलं. शेख जाफर पोलिसांच्या तावडीतून पळून गेल्यानंतर तेलंगाणा पोलिसांनी तत्काळ ही माहिती महाराष्ट्र पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच महाराष्ट्र पोलिसांनीही तातडीनं घटनास्थळी धाव घेतली. रात्रीपासून महाराष्ट्र आणि तेलंगाणा पोलिसांची संयुक्त शोधमोहीम सुरू असून आरोपी शेख जाफर आणि त्याला पळवून नेणाऱ्या हल्लेखोरांचा कसून शोध घेतला जात आहे. दरम्यान, खबरदारीचा उपाय म्हणून आरोपीचं गाव असलेल्या चिखली परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. परिसरातील परिस्थितीवर पोलिसांचं बारकाईनं लक्ष असून हल्ल्यात सहभागी असलेल्या आरोपींची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे, अशी माहिती किनवटचे उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रशेखर कदम यांनी दिली.

हेही वाचा :

  1. दौंडमध्ये सिमेंट वाहतुकीच्या वादातून थरार; पाटसमध्ये दोन गटात हाणामारीनंतर गोळीबार, वरिष्ठ पोलिसांची धाव!
  2. मोक्काच्या कुख्यात गुन्हेगारावर पोलिसांचा गोळीबार: पोलिसांवर पिस्तूल रोखल्याचा दावा, आरोपी गंभीर जखमी
  3. Accused Policeman Arrested: भिवंडीत दोन जणांवर गोळ्या झाडणारा मुंबईचा पोलीस शिर्डीत जेरबंद
Last Updated : August 31, 2026 at 12:20 PM IST