'फक्त नीलम गोऱ्हे यांच्याकडून चांदीची वीट आणि बहिणीकडून रोख रक्कम स्वीकारली'- मंदिर घोटाळा प्रकरणात स्वामी गोविंददेव गिरींचे स्पष्टीकरण
अयोध्येतील राम मंदिरातील देणगी घोटाळा उजेडात आल्यानंतर प्रथमच श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. वाचा, सविस्तर

Published : July 6, 2026 at 1:24 PM IST
शिर्डी (अहिल्यानगर)- स्वामी गोविंददेव गिरी हे नेहमीच वादग्रस्त विधानामुळे चर्चेत असतात. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुरतवरील हल्ल्याचं वर्णन ईडीच्या कारवाईशी केले होते. हेच स्वामी गोविंददेव गिरी महाराज श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष आहेत. अयोध्येतील श्रीराम मंदिरातील आर्थिक गैरव्यवहार उजेडात आणल्यानंतर त्यांनी काही दिवसांपासून मौन बाळगले होते. एका व्हायरल व्हिडिओतील घटनेनुसार माध्यमांनी त्यांचा प्रतिक्रियेसाठी पिच्छा पुरविल्यानंतर त्यांनी अक्षरश: पळ काढला होता. अखेरीस त्यांनी श्रीराम मंदिरातील आर्थिक गैरव्यवहाराबाबत भूमिका मांडली आहे.
अयोध्येत राम मंदिर बांधण्याचं आश्वासन हे भाजपाकडून देण्यात आले होते. तसेच सर्वोच्च न्यायलयाच्या आदेशानंतर संपूर्ण देशात त्याची जाहिरातबाजी पक्षाकडून आणि मोदी सरकारकडून करण्यात आली होती. प्रत्यक्षात राम मंदिरातील देणगीसह भेट वस्तुंमध्ये घोटाळा झाल्याचं उघडकीस आल्यानंतर रामभक्तांमधून प्रचंड नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. अशा परिस्थितीत श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी यांनी अयोध्या येथील श्रीराम मंदिरातील हुंडीतील देणगी मोजणीदरम्यान झालेल्या कथित आर्थिक गैरव्यवहाराच्या पार्श्वभूमीवर सविस्तर निवेदन प्रसिद्ध केले. त्यांनी निविदेनात म्हटलं की, रामभक्तांनी श्रद्धेनं अर्पण केलेल्या देणगीत चोरी झाल्याचा आरोप अत्यंत वेदनादायी आहे. या प्रकरणाची निष्पक्ष, सखोल आणि पारदर्शक चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा झाली पाहिजे. केवळ शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी दिलेली एक किलो चांदीची वीट आणि बहिणीनं दिलेले 11 हजार रुपये स्वीकारले आहेत. त्याची पावतीदेखील दिली आहे, असा दावा स्वामी गोविंददेव गिरी यांनी केला.
स्वामी गोविंददेव गिरी यांनी निवेदनात म्हटलं की, शेकडो वर्षांच्या संघर्षानंतर उभारण्यात आलेले श्रीराम मंदिर हे कोट्यवधी रामभक्तांच्या श्रद्धेचे प्रतीक आहे. अशा पवित्र स्थळी देणगी मोजणीदरम्यान आर्थिक गैरव्यवहार झाल्याची माहिती समोर येणे, ही अत्यंत दुर्दैवी आणि मन हेलावून टाकणारी घटना आहे. या प्रकारामुळे देशभरातील रामभक्तांच्या भावना दुखावल्या आहे. आपणही अत्यंत व्यथित असल्याचं त्यांनी नमूद केले.
न्यासाकडून कोणताही खर्च घेतला नसल्याचा दावा- निवेदनात त्यांनी आपल्या जबाबदाऱ्यांबाबतही स्पष्ट भूमिका मांडली आहे. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासात कोषाध्यक्षपद मिळविण्यासाठी आपण कधीही प्रयत्न केले नाहीत. प्रभू श्रीरामांची सेवा करण्याची संधी मिळणं हेच आपलं भाग्य असल्याचं त्यांनी म्हटलं. न्यासाच्या कामासाठी अयोध्येला वारंवार ये-जा करूनही आजपर्यंत प्रवासाचा किंवा इतर कोणताही वैयक्तिक खर्च न्यासाकडून घेतलेला नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
आर्थिक व्यवहाराबाबत गोविंदगिरी यांनी काय म्हटलं?- आर्थिक व्यवहाराबाबत गोविंदगिरी यांनी स्पष्ट करताना म्हटलं की, कोषाध्यक्ष म्हणून आर्थिक व्यवहारांवर नियमित लेखापरीक्षण ऑडिट केले जाते. न्यासाचे सर्व उत्पन्न-खर्चाचे हिशेब अधिकृतरीत्या तपासले जातात. आवश्यकतेनुसार त्यांची पडताळणी केली जाऊ शकते. मंदिरातील सर्व आर्थिक व्यवहार थेट बँकेमार्फत केले जातात. कोणतेही रोख पेमेंट होत नाही. तसेच आपण अधिकृत स्वाक्षरीदार नसल्यामुळे आर्थिक व्यवहारांमध्ये थेट सहभाग नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केले. देणगी मोजणीच्या प्रक्रियेशीही आपला कोणताही थेट संबंध नसल्याचं स्वामी गोविंददेव गिरी यांनी नमूद केलं. आपण पुण्यात वास्तव्यास असून मंदिरातील हुंडी मोजणीचे काम स्थानिक विश्वस्त, अधिकृत कर्मचारी आणि बँकेच्या निर्धारित कार्यपद्धतीनुसार केले जाते. या प्रक्रियेचे नियम संबंधित यंत्रणांनी संयुक्तपणे तयार केलं असल्याचंही त्यांनी सांगितलं.
प्रभावी आणि विश्वासार्ह यंत्रणा उभारण्याचं आवाहन- या कथित चोरीची सखोल चौकशी सुरू असून सत्य लवकरच समोर येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. विशेष तपास पथक एसआयटी, पोलीस आणि न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास असल्याचं सांगत आरोपी कितीही प्रभावशाली असला तरी त्याला कायद्यापुढे झुकावेच लागेल. कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही असे स्वामी गोविंददेव गिरी यांनी नमूद केले. भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी देणगी मोजणीची संपूर्ण व्यवस्था अधिक सुरक्षित, पारदर्शक आणि तंत्रज्ञानाधारित करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी अधोरेखित केलं. रामभक्तांनी अर्पण केलेल्या प्रत्येक रुपयाचा अचूक हिशेब ठेवला जाईल, अशी प्रभावी आणि विश्वासार्ह यंत्रणा उभारण्याचं आवाहनही त्यांनी न्यासाकडे केले. स्वामी गोविंददेव गिरी यांनी रामभक्तांना संयम राखण्याचे आणि न्यायप्रक्रियेवर विश्वास ठेवण्याचे आवाहन केलं. भगवान श्रीरामांच्या कृपेने सत्य समोर येईल. दोषींना शिक्षा होईल. श्रीराम मंदिराविषयीची श्रद्धा अधिक दृढ होईल, असा विश्वास केला.
गैरव्यवहाराबाबत थेट नाव घेणं टाळलं- उल्लेखनीय बाब म्हणजे स्वामी गोविंददेव गिरी यांनी राम जन्मभूमि मंदिर न्यासचे चंपत राय आणि अनिल मिश्र यांच्यावर होत असलेल्या गंभीर आरोपाबाबत सोयीस्कर मौन बाळगलं आहे. तसेच आर्थिक गैरव्यवहार कोणत्या कारणांमुळे झाले? नेमक्या कोणत्या त्रुटी आहेत, यावर त्यांनी कोणतीही ठाम भूमिका निविदेनातून मांडलेल्या नाहीत.
सरकारच्या आदेशानं स्थापन झाले न्यास- श्रीराम जन्मभूमीच्या जागेचे व्यवस्थापन आणि राम मंदिराच्या बांधकामाची देखरेख करण्यासाठी श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासची स्थापना करण्यात आली आहे. 5 फेब्रुवारी 2020 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत घोषणा केल्यानंतर 'श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र' न्यासची स्थापना करण्यात आली. या न्यासमधील 15 सदस्यांपैकी 12 हे सरकारनियुक्त तर इतर 3 जणांची निवड केली जाते.
श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यासची आज बैठक-राम मंदिराशी संबंधित निधीचा गैरवापर आणि आर्थिक अनियमिततेचे आरोप होत असतानाच, आज 'श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यासची 'ची आज बैठक आयोजित करण्यात आली आहे. ही बैठक दुपारी 3 वाजता कडेकोट सुरक्षेत 'मणिराम दास छावणी' येथे होणार आहे. बैठकीला उपस्थित राहण्यासाठी ट्रस्टचे बहुतांश सदस्य आधीच अयोध्येत दाखल झाले आहेत. या बैठकीत सर्वप्रथम ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय आणि सदस्य डॉ. अनिल मिश्रा यांच्या राजीनाम्यांवर विचार केला जाईल. बैठकीच्या कामकाजादरम्यान त्यांना मुख्य समितीपासून वेगळे बसवले जाईल. या दोन पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्यांबाबत निर्णय झाल्यानंतर, एसआयटीनं (SIT) आतापर्यंत केलेल्या कार्यवाहीचा आढावा घेतला जाईल.
हेही वाचा-

