नगरपालिका निवडणुकीत आपच्या उमेदवाराला मिळालं फक्त 1 मत; उच्च न्यायालयात मागणार दाद
निवडणुकीत मतचोरी होत असल्याचा काँग्रेसकडून सातत्यानं आरोप करण्यात आलेला आहे. असाच आरोप आता आपच्या उमेदवारानं केला आहे. वाचा, संपूर्ण बातमी

Published : December 23, 2025 at 10:21 PM IST
पुणे: जिल्ह्यातील मंचर नगरपालिका येथे झालेल्या निवडणुकीत आपच्या उमेदवाराला फक्त एकच मत मिळाल्यानं या निकालाची जोरदार चर्चा सुरू आहे. या उमेदवारानं थेट उच्च न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय घेतला आहे.
विधानसभा निवडणुकीनंतर ईव्हीएम यंत्रणेबाबत तसेच मतचोरीबाबत सातत्यानं देशातील विरोधी पक्षाकडून आवाज उठवण्यात आला. या संदर्भात भारतीय निवडणूक आयोगावरदेखील काँग्रेसनं गंभीर आरोप केले होते. मात्र, नगरपालिकांच्या निवडणुकीत अशा पद्धतीचं आरोप झाले नव्हते. अशातच पुणे जिल्ह्यातील मंचर नगरपालिकेत लागलेल्या निकालानंतर हा मुद्दा पुन्हा एकदा समोर आला आहे.
पुणे जिल्ह्यातील मंचर नगरपंचायतीच्या निवडणुकीत आम आदमी पार्टीचे उमेदवार सलीम बशीर इनामदार यांनी प्रभाग क्रमाक ६ मधून निवडणुक लढवली. त्यांना केवळ एकच मत मिळालं आहे. या निकालानंतर त्यांनी निवडणूक प्रक्रियेबाबत शंका उपस्थित केली आहे. या प्रकरणी उमेदवाराकडून मुंबई उच्च न्यायालयात दाददेखील मागण्यात येणार आहे.
याबाबत सलीम इनामदार म्हणाले, "गेल्या अनेक दिवसांपासून मी मंचर नगरपालिका येथे प्रभाग क्रमांक सहामध्ये काम करत होतो. दीडशे मते तरी मला मिळतील, अशी मला खात्री होती. पण, जेव्हा निकाल समोर आला तेव्हा आश्चर्याचा धक्का बसला. मला फक्त एकच मत मिळालं आहे. मला माझ्या घरच्यांची मतदेखील मिळाली नाहीत. माझ्या घरची 5 मते होती. ती मतेदेखील मला मिळालेली नाहीत. मंचर नगरपंचायतीच्या निकालावर मला आक्षेप असून या विरोधात मी मुंबई उच्च न्यायालयात दाद मागणार आहे".
- भाजपा हा नगरपरिषद आणि नगरपालिका निवडणुकीतील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. 129 नगराध्यक्ष भारतीय जनता पक्षाचे निवडून आलेले आहेत. तर 3325 नगरसेवक हे भारतीय जनता पक्षाचे निवडून आलेले आहेत.
राहुल गांधींनी काय केले होते आरोप- निवडणूक आयोगाचा वापर करुन महाराष्ट्रासह हरियाणामध्ये सत्ता स्थापन केल्याचा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी भाजपावर केला होता. हरियाणा विधानसभा निवडणुकीत घोळ झाल्याचा आरोप करत 25 लाख मतांची चोरी झाल्याचा दावा लोकसभेतील विरोधी पक्षनेत्यांनी केला होता.
हेही वाचा-

