पर्यावरण संवर्धनासाठी आदित्य ठाकरे उद्या तपोवनाला भेट देणार, पदाधिकाऱ्यांना देखील मार्गदर्शन करणार!
नाशिकच्या तपोवन भागातील वृक्षतोडीला पर्यावरणप्रेमी आणि नाशिककरांनी तीव्र विरोध केला आहे.

Published : December 26, 2025 at 8:22 PM IST
नाशिक : नाशिकमध्ये आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी तपोवन परिसरात साधूग्राम उभारण्यासाठी 1800 झाडं तोडली जाणार आहेत. मात्र, याविरोधात पर्यावरण प्रेमींनी न्यायालयात धाव घेतली आहे. त्यामुळं येथील झाडं तोडण्यास न्यायालयाकडून तात्पुरती स्थगिती दिली आहे. अशात उद्या (27 डिसेंबर) शिवसेना (उबाठा) पक्षाचे प्रमुख आदित्य ठाकरे तपोवनाला भेट देणार असून पर्यावरणप्रेमी आणि नागरिकांशी थेट संवाद साधणार आहेत. दरम्यान, नाशिक शहरातील नदी स्वच्छता, पर्यावरण संवर्धन, हरित विकास आणि शाश्वत शहरनिर्मिती यांसारख्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा होणार असून, स्थानिकांच्या अपेक्षा जाणून घेण्याचा आदित्य ठाकरेंकडून प्रयत्न केला जाणार आहे.
पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याला मार्गदर्शन करणार : नाशिकच्या तपोवन भागातील वृक्षतोडीला पर्यावरणप्रेमी आणि नाशिककरांनी तीव्र विरोध केला आहे. या वृक्षतोडीला भाजपा वगळता सर्वच राजकीय पक्षानं विरोध केला आहे. अशात उद्या सकाळी 11 वाजता आदित्य ठाकरे तपोवन परिसराला भेटी देऊन परिसराची पाहणी करणार आहे. त्यानंतर पर्यावरणप्रेमी आणि नाशिककर नागरिकांशी थेट संवाद साधणार आहे. यानंतर दुपारी 12 वाजता देवळाली इथं आयोजित शिवेसना (उबाठा) पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याला आदित्य ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत.

विधानसभेत काय म्हणाले होते आदित्य ठाकरे? : दरम्यान, तपोवन वृक्षतोडीचा मुद्दा अतिशय गंभीर आहे. तप आणि वन म्हणून त्याला तपोवन म्हटलं जातं. रामायणापासून नाशिककरांची तपोवनाशी नाळ जमली आहे. ज्यांनी नाशिक दत्तक घेतली आहे. तेच झाडं तोडायला का निघाले आहेत? तपश्चर्या जंगलात होते. साधूग्राममध्ये होत नाही. ही सगळी झाडं वाचली पाहिजे. नाहीतर सरकारनं सांगावं आम्ही संजय गांधी नॅशनल पार्क, अजनीवन आणि तपोवनातील सगळी झाडं तोडू, मग आपण वाळवंटातून आपला कारभार करू," असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी नुकत्याच झालेल्या विधानसभेत वृक्षतोडीच्या मुद्द्यावरून आवाज उठवला होता.

काय मार्गदर्शन करणार? याकडे सर्वांचं लक्ष : तपोवन विषयावर पर्यावरण प्रेमींशी चर्चा केल्यानंतर आदित्य ठाकरे देवळाली कॅम्प इथं आयोजित पदाधिकारी मेळाव्याला मार्गदर्शन करणार आहेत. ऐन नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या काळात गेली अनेक वर्ष पक्षाशी एकनिष्ठ असलेले माजी महापौर विनायक पांडे, यतीन वाघ यांनी भाजपात प्रवेश केल्यामुळं शिवसेना (उबाठा) पक्षाला मोठा धक्का बसला आहे. यामुळं काही प्रमाणात कंट्रोल करण्यासाठी पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साह वाढवण्यासाठी आदित्य ठाकरे या मेळाव्यात काय मार्गदर्शन करतात? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
हेही वाचा :

