ETV Bharat / state

मुख्यमंत्र्यांनी तपोवनाची जागा 'रिझर्व फॉरेस्ट' म्हणून घोषित करावी; आदित्य ठाकरे यांची मागणी

माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी शनिवारी नाशिकमधील तपोवनला भेट दिली. यावेळी त्यांनी तपोवनची जागा रिझर्व फॉरेस्ट करावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडं केली.

ADITYA THACKERAY IN TAPOVAN NASHIK
आदित्य ठाकरे यांनी तपोवनला भेट दिली (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : December 27, 2025 at 7:19 PM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

नाशिक : शिवसेना - उबाठा नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी शनिवारी पंचवटीतील तपोवन परिसराला भेट दिली. यावेळी त्यांनी स्थानिक नागरिक व पर्यावरणप्रेमींची भूमिका जाणून घेतली. तपोवन परिसरातील पर्यावरण संरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या 'तपोवन वाचवा, नाशिक वाचवा' आंदोलनाला त्यांनी पाठींबा दिला. यावेळी आदित्य ठाकरे यांनी सरकारवर टीका करत मुख्यमंत्री यांनी तपोवनाची जागा रिझर्व फॉरेस्ट म्हणून घोषित करावी, अशी मागणी केली.

पर्यावरणप्रेमींची आदित्य ठाकरेंकडं मागणी : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी तपोवन परिसरात साधुग्राम उभारण्यासाठी 1,800 वृक्ष तोडली जाणार आहेत. याला पर्यावरणप्रेमींनी तीव्र विरोध केला असून, हरित लवादानं 15 जानेवारीपर्यंत झाडं तोडू नये, असं म्हणत स्थगिती दिली आहे. शनिवारी माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी तपोवन परिसरात पाहणी करून पर्यावरणप्रेमींशी चर्चा केली. पर्यावरण हा केवळ विकासाचा भाग नसून जनजीवनाशी थेट जोडलेला मुद्दा आहे. आपल्या पर्यावरण मंत्रिपदाच्या काळात मोठ्या प्रमाणात झाडांचं संवर्धन करण्यात आलंय, असा उल्लेख आदित्य ठाकरे यांनी केला. तपोवन परिसरात एसटीपी प्रकल्पाच्या नावाखाली सुमारे 300 झाडांची तोड झाल्याचा आरोप करून प्रशासनाच्या भूमिकेबाबत आंदोलनकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. तपोवन आणि साधुग्राम हा धार्मिक अन् पर्यावरणीय वारसा आहे. नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन निर्णय घ्यावेत, अशी मागणी यावेळी पर्यावरणप्रेमींनी आदित्य ठाकरे यांच्याकडं केली.

प्रतिक्रिया देताना पर्यावरणप्रेमी राजेंद्र बागुल, निरंजन टकले आणि आदित्य ठाकरे (ETV Bharat Reporter)

...मग झाडं तोडण्याचा अट्टाहास का? : "तपोवन परिसर हा रेसिडेन्शिअल झोन केला आहे. याची कुठलीही परवानगी महानगरपालिकेनं घेतलेली नाही. विशेष म्हणजे, नगर विकास मंत्र्यांना याची माहिती नाही. कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी एकतर्फी हे प्रकरण रेटून नेण्याचा प्रयत्न केला आहे. महानगरपालिकेनं 325 एकर जमीन नो डेव्हलपमेंट झोन म्हणून घोषित केली आहे. तसंच 31 लाख चौरस मीटर जागा साधुग्रामसाठी भाडेतत्त्वावर घेतली आहे. मग झाडं तोडण्याचा अट्टाहास का केलं जातो?" असा प्रश्न पर्यावरणप्रेमी निरंजन टकले यांनी उपस्थित केला.

जमिनीचं आरक्षण उठवून धनदांडग्यांना दिलं जातंय : "इथं सुरुवातीला साडेतीनशे एकरमध्ये साधुग्राम होतं. त्यातील काही भागात त्यांनी ग्राउंड केलं. प्रभू रामचंद्राचं नाव काढून स्वतःचं नाव दिलं जात आहे. काही जमीन बस सेवेसाठी सीएनएनला विकली. जमिनीचं आरक्षण उठवायचं आणि धन-दांडग्यांच्या घशात घालायचं असे प्रकार सुरू आहेत. इथं येणारे सर्व ठेकेदार महाराष्ट्राबाहेरील आहेत. सरकारनं मराठी माणसाच्या नादाला लागू नके," असा इशारा पर्यावरणप्रेमी राजेंद्र बागुल यांनी दिला.

काय म्हणाले आदित्य ठाकरे? : "तपोवनातील झाडं वाचवण्यासाठी एक, दीड महिना स्थानिक नागरिक लढा देत आहेत. आम्ही त्यांना पाठिंबा दिला आहे. पर्यावरणप्रेमी नाशिकसाठी आंदोलन करत आहेत. तपश्चर्या वनात होत असते. तपोवन हिरवगार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तपोवनाला रीझर्व फॉरेस्टची घोषणा करावी. सरकार आरवली पर्वतमाला, मायनिंगसाठी झाडं कापत होतं तेव्हा शेतकरी, गावकरी रस्त्यावर आले. पुण्यातील वेताळ टेकडीचा मुद्दा देखील असाच होता. मी मंत्री असताना ते थांबवलं होतं. डान्स पार्ट्या इथं चालवणार का? यलो झोन करून टीडीआर घेणार होते का? ते बिल्डर कोण आहेत? ते तपोवनमधील झाडं कापायच्या मागं लागलेत, त्यांना मतदान करू नका. झाडं मोठी करा, ती कापू नका. आपल्या धर्मात पंच महाभुतं यांची पूजा करतात हे तेच संपवायला निघालेत. भाजपाचा बिल्डर धर्म आहे. आम्ही झाडं कापू नये यासाठी प्रतिज्ञापत्र देणार आहोत," असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी सरकारवर टीका केली.

हेही वाचा :

  1. मुंबईत शिवसेनेची भाजपाबरोबर युती कन्फर्म; ठाकरेंचा मराठी, तर भाजपा-शिवसेनेचा अमराठी मतदारांवर डोळा
  2. नांदेड मृत्यू प्रकरणात मोठा खुलासा; मुलांनीच केला आई-वडिलांचा खून, नंतर स्वत: केली आत्महत्या
  3. पुणे महानगरपालिकेसाठी महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरला; प्रत्येकाला मिळणार 'इतक्या' जागा