पाण्यातून चौघांना वाचवणारा तरुण वीर धरणात बुडाला: 30 तासांनी सापडला मृतदेह; परिसरात हळहळ
साताऱ्यातील वीर धरणात बुडून एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे, मृत विनोद गेंडे यानं यापूर्वी चौघांना पाण्यात बुडताना वाचवलं होतं.

Published : January 9, 2026 at 10:59 AM IST
सातारा : पाण्यात बुडत असलेल्या अनेकांना वाचवणाऱ्या तरुणाचा साताऱ्यातील वीर धरणात बुडून मृत्यू झाला आहे. मृत तरुणाचं नाव विनोद सुरेश गेंडे (वय 34) आहे. तो मूळचा विठ्ठलवाडी-मुळशीचा असून सध्या कोथरूड इथं वास्तव्यास होता. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दुर्घटनेनंतर तब्बल 30 तासांनी महाबळेश्वर, प्रतापगड आणि शिरवळ येथील सर्च अँड रेस्क्यू टीमला त्याचा मृतदेह शोधण्यात यश आलं. पोलीस आणि नातेवाईकांच्या माहितीनुसार, विनोद अपार्टमेंटमधील एक रिक्षाचालक आणि अपार्टमेंटच्या सुरक्षा गार्ड या मित्रांबरोबर पार्टी करण्यासाठी बुधवारी (7 जानेवारी) वीर धरण परिसरात गेला होता. त्या वेळी ही दुर्दैवी घटना घडली. विशेष म्हणजे, विनोद केवळ पट्टीचा पोहोणाराच नव्हता, तर त्यानं आपल्या धैर्यानं अनेकांना पाण्यातून वाचवलंदेखील होतं. अवघ्या वर्षभरापूर्वी त्याचा विवाह झाला होता.
विनोद पोहत लांबवर गेला आणि बुडाला : मिळालेल्या माहितीनुसार, विनोद हा सौंदर्य प्रसाधनांच्या कंपनीत विक्री प्रतिनिधी होता. तो मित्रांबरोबर पार्टी करण्यासाठी बुधवारी दुपारी वीर धरण परिसरात आला होता. धरणाच्या पाण्यात उतरल्यावर विनोद पोहत दूरवर गेला, तर एका मित्राला चांगलं पोहता येत नसल्यानं तो काठावरच होता. खोल पाण्यात गेलेला विनोद अचानक धरणात बुडाला. त्यामुळे दोन्ही मित्र घाबरले. यानंतर त्यांनी विनोदच्या मोबाईलवरून त्याच्या पत्नीशी संपर्क साधला. विनोदच्या पत्नीनं कॉल उचलला, पण तिला धक्का बसू नये म्हणून मित्रांनी घटनेची खरी माहिती तत्काळ सांगितली नाही. नंतर पत्नीनं विनोदच्या मित्रांकडून मिळालेली माहिती विनोदच्या बहिणीला सांगितली. विनोदच्या बहिणीनं तिच्या पतीला सांगितल्यावर त्यांनी मित्रांशी संपर्क साधला आणि नेमकी घटना समोर आली. यानंतर विनोदचे भावोजी तातडीनं शिरवळला पोहोचले.
शिरवळ पोलिसांनी काय सांगितलं? : हवालदार अजय झुंजार यांनी दुर्घटनेबाबत माहिती देताना सांगितलं की, "या घटनेची माहिती महाबळेश्वर, प्रतापगड आणि शिरवळच्या सर्च अँड रेस्क्यू टीमला दिली होती. मात्र, बुधवारी अंधार पडल्यामुळे शोध मोहीम राबवता आली नाही. गुरुवारी सकाळी 10 वाजता महाबळेश्वर ट्रेकर्स, प्रतापगड आणि शिरवळ रेस्क्यू टीमने बोटीच्या साह्यानं शोध मोहीम सुरू केली. सायंकाळी 6 वाजता विनोद गेंडेंचा मृतदेह सापडला. मृतदेह धरणाच्या पाण्यातून बाहेर काढून शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला. शवविच्छेदनात स्पष्ट झालं की, विनोदचा मृत्यू पाण्यात बुडून झाला होता."
विनोदनं पाण्यात बुडणाऱ्या चौघांना वाचवलं : विनोदच्या आई-वडिलांचा कोरोना काळात मृत्यू झाला होता आणि त्याला तीन विवाहित बहिणी आहेत. त्याचा वर्षभरापूर्वीच विवाह झाला होता. पण संसार वेलीवर फूल उमलण्यापूर्वीच विनोदचा मृत्यू झाला. विनोदच्या नातेवाईकांसह मित्र परिवाराला मोठा धक्का बसला आहे. त्याचा मित्रपरिवार सांगतो की, विनोद उत्तम पोहणारा होता आणि मुळशी धरणातही तो नियमित पोहत असे. पुण्यातील खडकवासला-एनडीए मार्गावरील कॅनॉलमध्ये बुडणाऱ्या तीन जणांना आणि सेव्हन लव्ह चौक, स्वारगेट येथील कॅनालमध्ये बुडणाऱ्या एका व्यक्तीला त्यानं वाचवलं होतं. अशा स्थितीत कोथरूड परिसरातही या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा

