ETV Bharat / state

अजित पवार यांच्या मृत्यूला एक महिना पूर्ण; अपघात की घातपात याबाबत अजूनही साशंकता?

अजित पवार यांचा 28 जानेवारी रोजी बारामती इथं विमान अपघातात मृत्यू झाला. या घटनेनंतर अनेकांनी संशय व्यक्त केला.

A month has passed since Ajit Pawar's death; Still doubtful about accident or assassination?
अजित पवार यांच्या मृत्यूला एक महिना पूर्ण; अपघात की घातपात याबाबत अजूनही साशंकता? (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : February 28, 2026 at 4:17 PM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

मुंबई : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील मृत्यूला आज एक महिना पूर्ण झाला. मात्र, या दुर्घटनेभोवतीचा संशय अद्याप कायम आहे. हा अपघात होता की घातपात? याबाबत विविध स्तरांवर प्रश्न उपस्थित होत आहेत. सीआयडी चौकशीची मागणी होत असली तरी अद्याप त्याबाबत ठोस निर्णय झालेला नाही. दरम्यान, या प्रकरणात आमदार रोहित पवार आक्रमक भूमिका घेत आहेत. त्यांनी या अपघाताची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी केली असून एसआयटी नेमण्याबाबत मुंबई उच्च न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आली आहे. आमच्याकडे धक्कादायक नवे पुरावे आहेत, असा दावा त्यांनी केला आहे. सोमवारी पत्रकार परिषद घेऊन हे पुरावे सादर करणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं.

आज AAIB चा अहवाल येणार? : अजित पवार यांचा 28 जानेवारी रोजी बारामती इथं विमान अपघातात मृत्यू झाला. या घटनेनंतर अनेकांनी संशय व्यक्त केला. सत्ताधारी गटातील आमदार अमोल मिटकरी यांच्यासह विरोधी बाकावरील रोहित पवार यांनीही काही गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. रोहित पवार यांनी आतापर्यंत चार पत्रकार परिषदांतून विविध मुद्दे मांडले असून तपास यंत्रणांवर दबाव वाढला आहे. रोहित पवार म्हणाले, "केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी जाहीर केल्याप्रमाणे 'AAIB' चा प्राथमिक अहवाल आज येणार आहे. या अहवालातून सत्य समोर येईल, अशी अपेक्षा आहे. सोमवारी आम्ही आमच्याकडील नवी माहिती आणि पुरावे सादर करू. यापूर्वीप्रमाणे थातुरमातूर अहवाल देण्याचा प्रयत्न होऊ नये," अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

A month has passed since Ajit Pawar's death; Still doubtful about accident or assassination?
अजित पवार यांच्या मृत्यूला एक महिना पूर्ण; अपघात की घातपात याबाबत अजूनही साशंकता? (ETV Bharat Reporter)

फास्ट ट्रॅक आणि सीआयडी चौकशी व्हावी : दुसकीकडे, विधानभवनात बोलताना अमोल मिटकरी यांनीही अनेक प्रश्न उपस्थित केले. डीजीसीएनं VSR एव्हिएशनला परवानगी कशी दिली? जळालेला ब्लॅक बॉक्स परदेशात पाठवला, त्याचं काय झालं? कलिना गेट क्रमांक 8 पासून बारामती धावपट्टीपर्यंत नेमकं काय घडलं? याची संपूर्ण माहिती जनतेसमोर यावी, अशी अमोल मिटकरी यांची मागणी आहे. तसंच या प्रकरणाची फास्ट ट्रॅक आणि सीआयडी चौकशी व्हावी, असंही अमोल मिटकरी यांनी म्हटलं आहे. दरम्यान, यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही चौकशी करण्यासंदर्भातील पत्र देण्यात आलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सीबीआय चौकशी व्हावी अशी भूमिका घेतली होती, पण सीबीआय चौकशीला अनेकांचा विरोध आहे. वर्षानुवर्षे प्रकरणे प्रलंबित असल्याचं बोललं जातंय. त्यामुळं सीआयडी चौकशीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय भूमिका घेतात? याकडे सगळ्यांचं लक्ष आहे.


काय आहे AAIB? : Aircraft Accident Investigation Bureau (AAIB) ही नागरी विमान वाहतूक मंत्रालयांतर्गत कार्यरत स्वतंत्र संस्था आहे. 30 जुलै 2012 रोजी स्थापन झालेली ही संस्था देशातील नागरी विमान अपघातांची तांत्रिक आणि निष्पक्ष चौकशी करते. अपघातांची पुनरावृत्ती टाळणे हा तिचा मुख्य उद्देश आहे. अपघातानंतरचा अहवाल नागरी विमान वाहतूक मंत्रालयाला सादर केला जातो आणि तो आंतरराष्ट्रीय नागरी विमान संघटनेलाही पाठवला जातो. दरम्यान, रोहित पवार यांनी या प्रकरणाशी संबंधित सर्व कागदपत्रे आणि पुरावे सीआयडीकडे सुपूर्द केल्याचं सांगितलं. तसंच अपघातासाठी जबाबदार असलेल्या VSR कंपनी आणि DGCA विरोधात एफआयआर दाखल करण्याची गरज असल्याचं त्यांनी नमूद केलं. याशिवाय, इतक्या मोठ्या नेत्याच्या अपघातप्रकरणी साधी एफआयआरही नोंद होत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

हेही वाचा :

  1. 'अजित दादांचा अपघात की घातपात? उत्तर मिळेपर्यंत लढा सुरूच राहणार', अमोल मिटकरींचा निर्धार
  2. मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींमध्ये सरपंचांना प्रशासक म्हणून काम करता येणार नाही, उच्च न्यायालयाचे आदेश
  3. बारामतीच्या पठारावर स्ट्रॉबेरीचा गोडवा; प्रयोगशील शेतकरी दीपक जगताप यांची यशोगाथा