धुळे शहरातील प्रार्थनास्थळ परिसरात तुफान राडा; दोन गटांमध्ये हिंसाचार, गोळीबार आणि दगडफेक
धुळ्यात दोन गटात तुफान राडा झाला आहे. विशिष्ट धर्मियांच्या दोन गटात प्रार्थनास्थळ परिसरात हा प्रकार घडला. सध्या शहरात तणावपूर्ण शांतता आहे.

Published : January 5, 2026 at 12:27 PM IST
धुळे : शहरातील प्रार्थनास्थळ परिसरात एकाच धर्माच्या दोन गटांत झालेल्या तुफान राड्यामुळे तणाव निर्माण झाला आहे. या हिंसक घटनेत दगडफेक आणि गोळीबार देखील झाल्याची माहिती समोर आली आहे. पोलीस प्रशासन तत्काळ घटनास्थळी दाखल झालं असून, सध्या तिथं तणावपूर्ण शांतता पसरली आहे.
गुरुगोविंद सिंग यांची जयंती सोमवारी साजरी होणार आहे, मात्र, प्रार्थनास्थळाचा उत्तराधिकारी नेमणुकीवरून दोन गटांमध्ये वाद निर्माण झाला. हा वाद गेले काही दिवसांपासून सुरू होता, आणि आता त्याचं रुपांतर या हिंसक घटनेत झालं आहे.
उत्तर अधिकारी कोण? यावरून वाद : खरं तर, बाबा धीरजसिंग यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबीयांमधील सदस्य उत्तराधिकारी म्हणून नेमावा, अशी मागणी स्थानिक समाज बांधवांकडून करण्यात आली होती. पण पंजाब येथून आलेल्या समितीनं बाबा रणवीर सिंग यांची नियुक्ती केली. बाबा रणवीर सिंग यांच्या नियुक्तीला स्थानिक समाज बांधवांकडून विरोध करण्यात आला होता. या वादातूनच ही घटना घडल्याचं सांगितलं जात आहे.
रणवीरसिंग खालसा यांच्या विरोधात आरोप : दरम्यान, या हिंसक घटनेनंतर रणवीरसिंग खालसा यांच्यावर प्रार्थनास्थळाची दारं बंद करणं आणि समाज बांधवांना आत प्रवेश देण्यास नकार देणं, असे आरोप येथील समुदायानं केले आहेत.
बाबा धिरजसिंग यांच्या मृत्यूनंतर वाद : प्रार्थनास्थळाचे प्रमुख बाबा धीरजसिंग खालसा यांचं निधन झाल्यानंतर प्रार्थनास्थळाच्या प्रमुखपदावरून वाद सुरू झाले. बाबा धीरजसिंग यांच्याप्रती शहरातील सर्व समाजात आदराची भावना होती. त्यांच्या मृत्यूनंतर, प्रार्थनास्थळ प्रमुख म्हणून त्यांच्या छोटे बंधू बाबा दारासिंग यांची नियुक्ती करण्यात आली.
तथापि, पंजाब येथून आलेल्या समितीनं रणवीरसिंग खालसा यांची नेमणूक केली. या नेमणुकीवरून नवीन वाद निर्माण झाले. अशा स्थितीत सध्याची परिस्थिती अधिक तणावपूर्ण झाली आहे.
रणवीरसिंग खालसा यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी : गुरु गोविंदसिंग महाराजांची जयंती सोमवारी शांततेत पार पडावी, अशी धुळ्यातील समाज बांधवांची अपेक्षा आहे. त्याचबरोबर, रणवीरसिंग खालसा यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी समाजानं केली आहे. रात्री उशिरापर्यंत पोलिसांत गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती. धुळे शहरातील प्रार्थना स्थळ परिसरात तणावाचं वातावरण कायम असून पोलीस प्रशासनानं शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे.
पोलिसांनी काय सांगितलं? : या घटनेबाबत पोलीस उपधीक्षक अजय देवरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तक्रारदार पोलीस स्टेशनमध्ये येऊन तक्रार दिल्यास तक्रार दाखल करून घेण्यात येईल. संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असं पोलीस उपाधीक्षक अजय देवरे यांनी सांगितलं. तसेच, या घटनेसंबंधित काही जण चुकीचे व्हिडिओ व्हायरल करून अफवा पसरवण्याचं काम करत आहेत. या अफवांवर विश्वास ठेवू नये, असं आवाहनही पोलीस उपधीक्षक देवरे यांनी केलं.
हेही वाचा

