ETV Bharat / state

नाशिक-अकोले-संगमनेर रेल्वे मार्गासह विविध मागण्यांसाठी लाँग मार्च काढण्यात येणार, डॉ. अजित नवले यांची माहिती

उद्या सकाळी राजूर येथील आदिवासी प्रकल्प कार्यालयाला निवेदन देऊन लाँग मार्चची सुरुवात करण्यात येणार आहे.

A long march will be taken out for various demands - Dr. Ajit Navale
नाशिक-अकोले-संगमनेर रेल्वे मार्गासह विविध मागण्यांसाठी लाँग मार्च काढण्यात येणार, डॉ. अजित नवले यांची माहिती (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : February 23, 2026 at 5:22 PM IST

1 Min Read
Choose ETV Bharat

शिर्डी : अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील राजूर येथून शेतकरी व कामगारांच्या विविध मागण्यांच्या अंमलबजावणीसाठी उद्या (24 फेब्रुवारी) भव्य लाँग मार्च काढण्यात येणार आहे. अखिल भारतीय किसान सभा आणि सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन यांच्या वतीने हा लाँग मार्च आयोजित करण्यात आला असल्याची माहिती डॉ. अजित नवले यांनी दिली आहे. उद्या सकाळी राजूर येथील आदिवासी प्रकल्प कार्यालयाला निवेदन देऊन लाँग मार्चची सुरुवात करण्यात येणार आहे.

शेतकरी, कामगार सहभागी होणार : अकोले, संगमनेर, लोणी मार्गे सुमारे 148 किलोमीटरचे अंतर पायी पार करत हा लाँग मार्च अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देणार आहे. हजारो शेतकरी, कर्मचारी आणि कामगार या लाँग मार्चमध्ये सहभागी होणार असल्याची माहिती डॉ. अजित नवले यांनी दिली आहे. यापूर्वी झालेल्या नाशिक व ठाणे-पालघर लाँग मार्च तसंच 2023 मध्ये अकोले ते लोणी लाँग मार्चमध्ये शासनाने मान्य केलेल्या मागण्यांची तातडीने अंमलबजावणी करावी, अशी प्रमुख मागणी आहे. तसंच नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वे प्रकल्पाबाबत देण्यात आलेली आश्वासने पूर्वीच्या सर्वेक्षणानुसार देवठाण व बोटा स्थानकांसह पूर्ण करावीत अशीही भूमिका मांडण्यात आली आहे.

डॉ. अजित नवले यांची प्रतिक्रिया (ETV Bharat Reporter)


विविध मागण्यांसाठी लाँग मार्च : सरकारने मान्य केल्याप्रमाणे वनजमिनी व गायरान जमिनी कसणाऱ्या शेतकऱ्यांच्या दाव्यांची पुन्हा पडताळणी करावी, घरकुलांच्या तळजमिनी त्यांच्या नावे कराव्यात, बांधकाम कामगारांसाठी सर्व आजारांवर वैद्यकीय योजना लागू करावी, अशी मागणी आहे. याशिवाय शालेय पोषण आहार कर्मचारी, अर्धवेळ परिचर, अंगणवाडी सेविका, आशा व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करून त्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा, भंडारदरा परिसरातील आदिवासी शेतकऱ्यांना सिंचन व पिण्यासाठी शासकीय योजनेतून पाणी उपलब्ध करून द्यावे, निराधारांना किमान पाच हजार रुपये मानधन द्यावे तसेच वर्ग दोनच्या जमिनी वर्ग एक दर्जाच्या कराव्यात, अशा विविध मागण्या या लाँग मार्चद्वारे मांडण्यात येणार आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शेतकरी व कामगार मोठ्या संख्येनं एकत्र येत शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करणार आहेत.

हेही वाचा :

  1. शरद पवार यांच्या तब्येतीबाबत डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती, कधी मिळणार डिस्चार्ज?
  2. 'बांबू कसा लावायचा आम्हाला सांगत चला'; खासदार अशोक चव्हाण यांचा टोमणा कोणाला?
  3. 'नरेंद्र-देवेंद्र महोत्सवा'त अशोक चव्हाण यांना 'नांदेड भूषण' पुरस्कार; कर्जमाफीवर सरकारची भूमिकादेखील केली स्पष्ट