ETV Bharat / state

साहित्य संमेलनाच्या कार्याध्यक्षांना काळं फासणाऱ्या व्यक्तीचे कॉल डिटेल्स तपासा, पत्रकार संघटनेची मागणी

विनोद कुलकर्णी यांना काळं फासणाऱ्या संदीप जाधव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून महामंडळाच्या अध्यक्ष आणि कार्याध्यक्षांना पोलीस संरक्षण देण्यात आलं आहे.

Black Ink Thrown on Working President Vinod Kulkarni
मराठी साहित्य संमेलनाला गालबोट (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : January 4, 2026 at 1:37 PM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

सातारा : मराठी साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी यांना काळं फासण्यात आल्यानं 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात शनिवारी खळबळ उडाली. या घटनेमुळं साहित्य संमेलनाला गालबोट लागलं. काळं फासणाऱ्या संदीप जाधव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून महामंडळाच्या अध्यक्ष आणि कार्याध्यक्षांना पोलीस संरक्षण देण्यात आलं आहे.

मराठी साहित्य संमेलनाला गालबोट (ETV Bharat)

संदीप जाधव पोलिसांच्या ताब्यात : साहित्य संमेलनाचा शनिवारी (3 जानेवारी) तिसरा दिवस होता. सकाळपासून सर्वकाही सुरळीत सुरू होतं. साहित्य महामंडळाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी हे दुपारी प्रकाशन कट्ट्यावरून खाली येत असताना संदीप जाधव नामक व्यक्तीनं त्यांना काळं फासले. त्यामुळं संमेलनात गोंधळ उडाला. काही वेळातच शाहुपुरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी काळं फासणाऱ्या तरूणास ताब्यात घेतलं. काळं फासण्यासाठी वापरलेल्या केमिकलमुळे विनोद कुलकर्णी यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यांची प्रकृती बिघडल्यानंतर यांना तातडीने वैद्यकीय मदत देण्यात आली.

विनोद कुलकर्णी यांनी काय सांगितलं? : या घटनेबद्दल माहिती देताना विनोद कुलकर्णी म्हणाले की, दोन-तीन हल्लेखोरांनी केमिकलसारखा काळा पदार्थ माझ्या डोळ्यात घातला. त्यांच्याकडे धारदार शस्त्रे होती. संमेलन उधळून लावू, तुम्हाला संपवू, अशी धमकी त्यांनी दिली. दरम्यान, साहित्य महामंडळाच्या कार्याध्यक्षांना काळं फासल्याच्या घटनेनंतर साहित्यिक आणि विचारवंतांच्या वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

संदीप जाधवांचे कॉल डिटेल्स तपासा- पत्रकार संघटना: साहित्य संमेलनाच्या व्यासपीठाला बदनाम करण्याचा हा प्रयत्न असल्याची टीका देखील होत आहे. साताऱ्यातील पत्रकारांनी या घटनेचा निषेध केला आहे. साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी हे पत्रकार आहेत. त्यामुळे त्यांच्यावरील हल्ला हा समस्त पत्रकारांवरील हल्ला असल्याचं आम्ही मानतो, अशा संतप्त भावना पत्रकारांनी व्यक्त केल्या. तसेच, हल्लेखोर संदीप जाधव या तरूणानं कोणाच्या सांगण्यावरून हे कृत्य केलंय का? याचा तपास करावा. त्यांच्या कॉल डिटेल्स तपासाव्यात, अशा मागण्या सातारा शहर पत्रकार संघटनेनं केल्या आहेत.

'कर्जमाफी होत नाही म्हणून हल्ला' : शाहुपुरी पोलिसांनी संदीप जाधव यास ताब्यात घेतल्यानंतर घटनेच्या अनुषंगानं त्यांची चौकशी केली. 'शेतकरी कर्जमाफी होत नाही. पण, सरकार साहित्य संमेलनाला दोन कोटीचा निधी देते'. त्याच्या निषेधार्थ हे कृत्य केल्याची माहिती जाधव यांनी चौकशीत दिली असल्याचं शाहुपुरी पोलिसांनी सांगितलं. संदीप जाधव याने साताऱ्यात अनेकदा आंदोलनाची स्टंटबाजी केली आहे. 9 ऑगस्ट रोजी (क्रांतीदिनी) पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या निवासस्थाबाहेर मोठ्या आवाजात राष्ट्रगीत म्हटलं होतं. त्यानंतर पालकमंत्र्यांच्या प्रतिकात्मक खुर्चीला हार घालून जिल्हा परिषदेसमोर देखील स्टंट केला होता.

हेही वाचा