ETV Bharat / state

देशातील 9 आयुर्वेदिक औषध कंपन्यांचा बुलढाणामधील शेतकऱ्यांसोबत करार; केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांची घोषणा

बुलढाणा जिल्ह्यामध्ये झालेल्या चार दिवसीय राष्ट्रीय आरोग्य मेळाव्याच्या समारोपप्रसंगी केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी मोठी घोषणा केली.

NATIONAL AROGYA FAIR 2026 BEED
कार्यक्रमात बोलताना केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : February 28, 2026 at 8:41 PM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

बुलढाणा : जिल्ह्यातील शेतकरी आता आयुर्वेदिक औषधी वनस्पतींची शेती करणार आहेत. यासाठी देशातील 9 प्रमुख आयुर्वेदिक औषध कंपन्यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसोबत करार केले आहेत. ही घोषणा केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी शनिवारी शेगाव इथं आयोजित चार दिवसीय राष्ट्रीय आरोग्य मेळाव्याच्या (National Arogya Fair 2026) समारोपप्रसंगी केली. हा मेळावा भारत सरकारच्या आयुष मंत्रालय आणि अखिल भारतीय आयुर्वेद महासंमेलन यांच्या संयुक्त विद्यमानानं 25 ते 28 फेब्रुवारी 2026 दरम्यान संत गजानन महाराज संस्थानच्या विसावा मैदानावर पार पडला. मेळाव्याचं उद्घाटन भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते झाले होतं. या मेळाव्याचा समारोप समारंभ केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते पार पडला.

औषधी वनस्पती लावल्यास शाश्वत उत्पन्न मिळेल : केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी शेतकऱ्यांना आयुर्वेदिक शेतीकडं वळण्याचं आवाहन केलं. ते म्हणाले "औषधी वनस्पतींची लागवड केवळ शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारत नाही तर जमिनीचं आरोग्य राखते आणि पर्यावरण संवर्धनास मदत करते. पारंपरिक पिकांसोबत औषधी वनस्पती लावल्यास शाश्वत उत्पन्न मिळेल."

आयुर्वेद क्षेत्राच्या विकासासाठी मैलाचा दगड ठरेल : या कार्यशाळेनंतर देशातील 9 आयुर्वेदिक औषध कंपन्यांनी बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसोबत औषधी वनस्पतींच्या लागवडीसाठी करार केले आहेत. हे करार शेतकऱ्यांना हमीभाव, तांत्रिक मार्गदर्शन आणि बाजारपेठेची हमी देतील. यामुळं विदर्भात 'वनौषधी हब' उभं राहण्यास मदत होईल. मंत्री जाधव यांनी सांगितलं की, आयुष क्षेत्र केवळ आरोग्य नव्हे तर ग्रामीण समृद्धी आणि प्रतिबंधात्मक आरोग्याचा आधारस्तंभ बनत आहे. मेळाव्यात कृषी अधिकारी, बुलढाणा, PDKV अकोला, RCFC पुणे आणि NMPB दिल्ली यांच्या समन्वयानं औषधी वनस्पतींवर कार्यशाळा घेण्यात आल्या. शेतकरी, स्वयंसहाय्य गट आणि युवकांनी यात सक्रिय सहभाग घेतला. बुलढाणा जिल्ह्यासाठी अभिमानास्पद असून, शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ आणि आयुर्वेद क्षेत्राच्या विकासासाठी मैलाचा दगड ठरेल."

मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी विशेष कार्यशाळा : समारोपाच्या दिवशी हजारो रुग्णांची नेत्र तपासणी करून त्यांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले. मेळाव्यात आयुर्वेद, योग, निसर्गोपचार, युनानी, सिद्ध, सोवा-रिग्पा आणि होमिओपॅथी या आयुष पद्धतींचे एकत्रित प्रदर्शन, मोफत आरोग्य तपासणी, तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला आणि औषधी वनस्पतींचे प्रदर्शन आकर्षण ठरलं. या मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी विशेष कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या होत्या. ज्यात शास्त्रज्ञ आणि तज्ज्ञांनी मार्गदर्शन केलं. यात उत्पादन, मूल्यवर्धन, प्रक्रिया आणि विपणन याबाबत माहिती देण्यात आली.

हेही वाचा :

  1. अजित पवारांच्या अपघातासंदर्भातील प्राथमिक अहवाल एएआयबीकडून समोर!
  2. बारामतीच्या पठारावर स्ट्रॉबेरीचा गोडवा; प्रयोगशील शेतकरी दीपक जगताप यांची यशोगाथा
  3. झोपडपट्ट्यांत शिक्षणाची नवी वाट; 'ग्लोबल टीचर' विजेत्या रूबल नागी काय काम करतात?