ETV Bharat / state

दुबईत अडकले पुणे जिल्ह्यातील 66 जण; इराण-अमेरिका संघर्षाचा फटका, राज्यातील 377 जणांची मायदेशी परतीची प्रतीक्षा

कार्यक्रम सुरळीत पार पडल्यानंतर ते भारतात परतण्याच्या तयारीत असतानाच मध्यपूर्वेत तणाव वाढला आणि विमानसेवा तात्पुरती बंद करण्यात आली. परिणामी, संपूर्ण गट दुबईतच अडकून पडलाय.

66 people from Pune district stuck in Dubai
दुबईत अडकले पुणे जिल्ह्यातील 66 जण (Source- ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : March 4, 2026 at 11:35 AM IST

1 Min Read
Choose ETV Bharat

बारामती- आखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीचा फटका आता भारतीय नागरिकांनाही बसू लागला आहे. केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनीच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय मेळावा आणि अभ्यास दौऱ्यासाठी दुबईला गेलेला महाराष्ट्रातील 377 जणांचा मोठा गट सध्या दुबईत अडकला आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यातील तब्बल 66 जणांचा समावेश आहे. पुणे जिल्ह्यातील पुरंदर, दौंड, बारामती, इंदापूर यांसह आळंदी, थेऊर, शिरूर, शिक्रापूर, पिंपरी-चिंचवड या भागांतील विमा प्रतिनिधी आणि त्यांचे कुटुंबीय या मेळाव्यासाठी दुबईला गेले होते. कार्यक्रम सुरळीत पार पडल्यानंतर ते भारतात परतण्याच्या तयारीत असतानाच मध्यपूर्वेत तणाव वाढला आणि विमानसेवा तात्पुरती बंद करण्यात आली. परिणामी, हा संपूर्ण गट दुबईतच अडकून पडला आहे.



दुबई विमानतळावरील आंतरराष्ट्रीय उड्डाणांवरही परिणाम : इराण-अमेरिका संघर्ष तीव्र झाल्यानंतर इराणकडून मध्यपूर्वेतील काही भागांवर प्रतिहल्ले झाल्याची माहिती समोर आलीय. या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या कारणास्तव अनेक देशांनी विमान उड्डाणे रद्द केली किंवा पुढे ढकललीत. त्यामुळे दुबई विमानतळावरील आंतरराष्ट्रीय उड्डाणांवरही परिणाम झाला असून, भारतीय पर्यटक आणि व्यावसायिकांना परतीचा मार्ग बंद झालाय. सध्या हा सर्व गट दुबईतील ‘हॉलिडे इन’ हॉटेलमध्ये सुरक्षित असल्याची माहिती मिळालीय. स्थानिक प्रशासनाकडून प्राथमिक सुविधा आणि मदत दिली जात असली तरी मायदेशी परतण्याची तीव्र ओढ सर्वांमध्ये आहे. पुढील परिस्थिती काय असेल, विमानसेवा कधी सुरू होईल, याबाबत अनिश्चितता असल्याने संबंधित कुटुंबीयांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

दुबईत अडकले पुणे जिल्ह्यातील 66 जण; इराण-अमेरिका संघर्षाचा फटका, राज्यातील 377 जणांची मायदेशी परतीची प्रतीक्षा (Source- ETV Bharat)


भारत सरकारकडून हस्तक्षेप करून विशेष विमानसेवेची मागणी : अडकलेल्या नागरिकांनी भारत सरकारने तातडीने हस्तक्षेप करून विशेष विमानसेवा किंवा पर्यायी व्यवस्था करून त्यांना मायदेशी आणावे, अशी मागणी केलीय. अद्याप अधिकृत पातळीवर विशेष मदतीची घोषणा झालेली नसल्याने कुटुंबीयांमध्ये अस्वस्थता वाढत आहे. पुरंदर तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष योगेश साहेबराव कामथे आणि त्यांचे कुटुंबीयदेखील या गटात अडकलेत. कामथे यांनी आम्ही सर्व सुरक्षित असल्याचा म्हटला आहे, त्यांना संबंधित कंपनीकडून मदत मिळत आहे, असेदेखील त्यांनी म्हटलंय. त्याचबरोबर त्यांच्या समवेत कविता योगेश कामथे, निलेश कृष्णा जगताप, मिनाक्षी निलेश जगताप, अभय निलेश जगताप, इद्रिस शेख (हडपसर), किशोर सावंत, पंकज पाखरे (संपूर्ण परिवार), विवेक झावरे, सुनील अरोटे, ऋषिकेश पवार आदींचा समावेश आहे. याशिवाय इचलकरंजी, सोलापूर, कोल्हापूर, जळगाव, धुळे, सांगली, सातारा, नाशिक आदी जिल्ह्यांतील नागरिकही या गटात आहेत.

हेही वाचाः

इराण आणि इस्रायल यांच्यातील युद्धामुळे अफवांना उधाण, छत्रपती संभाजीनगरात पेट्रोल पंपांवर तुफान गर्दी

पश्चिम आशियात अडकलेल्या राज्यातील 164 जणांचं यशस्वी 'एअरलिफ्ट'; भारतात परतलेल्या लोकांनी सांगितले थरारक अनुभव