अशोक खरात प्रकरणानंतर भोंदूगिरीचे अर्धशतक; राज्यात आतापर्यंत 50 भोंदूबाबांचे दरबार उधळले
पुरोगामी महाराष्ट्रात भोंदूगिरीचं पेव किती खोलवर रुजलं आहे, याची चर्चा सध्या राज्यभर सुरू आहे. अशातच अशोक खरात प्रकरणानंतर राज्यभरात 50 भोंदूबाबांवर गुन्हे दाखल झाले आहेत.

Published : May 30, 2026 at 1:33 PM IST
नाशिक : राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणानंतर अवघ्या सव्वा दोन महिन्यांत पोलिसांनी राज्यभरातील 50 भोंदूबाबांच्या दरबारांवर कारवाई करून ते उधळून लावले आहेत. यापैकी सर्वाधिक 5 गुन्हे नाशिक जिल्ह्यात दाखल झाल्याची माहिती महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं दिली. तसेच, राज्यातील या 50 प्रकरणांपैकी बहुतांश प्रकरणांमध्ये महिलांचं लैंगिक शोषण झाल्याचंही समोर आलं आहे.
अंनिसच्या प्रयत्नांमुळे कारवाई : पुरोगामी महाराष्ट्रात भोंदूगिरीचं पेव किती खोलवर रुजलं आहे, याची चर्चा सध्या राज्यभर सुरू आहे. नाशकात उघडकीस आलेल्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणानंतर अवघ्या दोन महिन्यांत राज्यभरात जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत एकूण 50 गुन्हे दाखल झाले आहेत.
यापैकी काही गुन्हे उत्स्फूर्तपणे दाखल झाले, तर काही प्रकरणांमध्ये महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या (अंनिस) प्रयत्नांमुळे कारवाई झाली. या यादीवरून सर्व धर्मांतील भोंदूबाबांविरोधात गुन्हे दाखल झाल्याचं स्पष्ट होतं. ग्रामीण तसेच शहरी भागातील महिला आणि पुरुषांची फसवणूक झाल्याची बाब या घटनांमधून समोर आली आहे. विशेषतः महिलांवरील लैंगिक शोषण आणि आर्थिक लुटीचं प्रमाण अधिक असल्याचं दिसून येते.
पीडित महिलांना लढण्याची हिंमत मिळाली : भीती आणि सामाजिक प्रतिष्ठेच्या दबावामुळे अनेक पीडित अद्यापही पुढे येण्यास घाबरत आहेत. मात्र, अशोक खरात प्रकरणानंतर अनेक पीडित महिलांना लढण्याची हिंमत मिळाली असून न्याय मिळण्याची अपेक्षाही निर्माण झाली आहे. त्यामुळे इतर पीडितांनीही पुढे येऊन तक्रारी नोंदविण्याची गरज निर्माण झाली आहे.
अंधश्रद्धेमुळे होणारी फसवणूक आणि अमानुष प्रथा रोखण्यासाठी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं तब्बल 18 वर्षे संघर्ष केला. या लढ्याच्या परिणामी 2013 मध्ये ‘महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांचे समूळ उच्चाटन अधिनियम, 2013’ हा कायदा अस्तित्वात आला. असा कायदा करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरलं.
या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात शासन पूर्णपणे यशस्वी ठरलं नसले, तरी अंनिस आपल्या मर्यादा आणि क्षमतांच्या चौकटीत राहून जनजागृती, प्रचार आणि प्रबोधनाचे काम सातत्यानं करत आहे. त्यामुळे राज्यातील अनेक ठिकाणी जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत गुन्हे दाखल होत असल्याचं अंनिसचे राज्य कार्यवाहक कृष्णा चांदगुडे यांनी सांगितलं.
राज्यात खालील भोंदूबाबांवर गुन्हे दाखल :
1) अशोक कुमार खरात, नाशिक
2) गडगेबाबा राजेंद्र गडगे, संगमनेर, अहिल्यानगर
3) चेतन सुनील माळी, मूर्तिजापूर, अकोला
4) पंकज देवराम घोलप, येडगांव, पुणे
5) मोहन मामा भोसले, कुर्डुवाडी, सोलापूर
6) नाना बर्डे, आळे फाटा, पुणे
7) ऋषिकेश वैद्य, वसई, मुंबई
8) अल्ताफ रईस खान, मालाड, मुंबई
9) रिधम पांचाळ, मालाड, मुंबई
10) गणेश शिंदे, श्रीरामपुर, अहिल्यानगर
11) अर्जुन चव्हाण उर्फ टनटन बाबा, नवी मुंबई
12) विठोबा वाल्मीक जाट, सातपूर, नाशिक
13) किसन तळपे मंदोशी, खेड
14) महेशगिरी उर्फ महेश काकडे,लासलगाव ,नाशिक
15) अब्दुल रशीद शेख, खालापूर, रायगड
16) इरफान नियाज अहमद, कांदिवली , मुंबई
17) अनिल सोलोमन सिंग, (पादरी), पुणे
18) शिवराम पराश सावर, पालघर
19) अल्ताफ हसन मदारी, जळगाव
20) नाना महाराज उर्फ गुरु माऊली वीरकर, टेंभुर्णी . सोलापूर
21) पिंटू धुमाळ बारामती, पुणे
22) हेमदास किसन बावणे,अड्याळ,भंडारा
23) चंद्रकांत राजेंद्र माळी , इगतपुरी, नाशिक
24) अशोक मधुकर आढाव, श्रीरामपूर,अहिल्यानगर
25) औदुंबर गडदे, स्वारगेट, पुणे
26) नवनाथ गवळी, खेड, पुणे
27) शाहिद शेख, खडकपाडा,कल्याण
28) शिव भाऊ सोनवणे, सर्जेपुरा, अहिल्यानगर
29) ज्ञानेश्वर नागोराव कोरडे, बिलोली, नांदेड
30) रमेश गुप्ता , मालाड , मुंबई
31) हरिगिरी दत्तगिरी महाराज , भाग्यनगर, नांदेड
32) मंजुनाथ शेट्टी उर्फ दीक्षित , ठाणे
33) कृष्णा उर्फ भगत सुभाष चित्ते, पश्चिम देवपूर, धुळे
34) यशवंत एकनाथ थोरात, पारनेर, अहिल्यानगर
35) श्याम महाराज राठोड , दिघी , पुणे
36) सुधाकर गाडगे, बाळापूर , अकोला
37) परमेश्वर उर्फ प्रमोद बाळू गायकवाड, उत्तमनगर, पुणे
38) शितल सालके व पोर्णिमा सारस्वत भारती विद्यापीठ, पुणे
39) योगेश उर्फ भैय्या बापू खैरनार, निजामपूर, साक्री, धुळे
40 ) विठ्ठल पवार, महागाव, यवतमाळ
41) ताहीर रशीद बेग, सक्करदरा, नागपूर
42) सुधाकर रमेश काळे, अंजनगाव सुर्जी, अमरावती
43) अशोक रामधन राठोड, वडगाव (जंगल) , यवतमाळ
44)महेश मोहन बाबर, विटा, सांगली
45) कमलेश महाराज अधिकारी, इंदिरानगर, नाशिक
46) परवेज अब्दुल अजीज मेमन , कोंढवा, पुणे
47) गंगाधर बुरांडे, सावली, चंद्रपूर
48) भीमराव पुंजाराम बिहाडे, संभाजीनगर
49) मुक्तानंदगिरी महाराज उर्फ बापू महाराज,कन्नड, संभाजीनगर
50) राजू बन्सी दिवटे, पारनेर, अहिल्यानगर.
हेही वाचा

