महापालिका निवडणूक 2026: ऐन हिवाळ्यात नाशिकमध्ये राजकीय वातावरण तापलं : चार ठिकाणी गुन्हे दाखल
महानगरपालिका निवडणुकीत राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली. वेगवेगळ्या प्रकरणात चार गुन्हे पोलीस ठाण्यात दाखल झाले असून यामुळे कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पोलिसांवर आली आहे.

Published : January 8, 2026 at 9:48 PM IST
नाशिक : महानगरपालिका निवडणुकीत भाजपाकडून तिकीट न मिळाल्याची धुसफूस अद्यापही शमलेली नाही. अशात एकमेकांवर राजकीय कुरघोडी केल्या जात आहे. सिडको परिसरात प्रतिस्पर्धी कार्यकर्त्यांमध्ये जुंपली. भाजपाच्या बंडखोर उमेदवाराचा चेहरा मॉर्फ करून तो व्हायरल करण्यात आला. दुसऱ्या प्रकरणात माजी महापौर यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ मॉर्फ करून तो व्हायरल करण्यात आला. तर एका प्रकरणात उमेदवाराच्या कार्यालयासमोर प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. या प्रकरणी शहरातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात तक्रारीवरून चार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
माजी महापौराचा व्हिडिओ मॉर्फ केला : प्रभाग 13 मधील माजी महापौर विनायक पांडे यांनी पोलिसात तक्रार दिली आहे, की त्यांचा एक अज्ञात व्यक्तीनं मॉर्फ केलेला आक्षेपार्ह व्हिडिओ व्हाट्सअप ग्रूपवर टाकला. फोटो खाली अनेक वादग्रस्त विधानं केल्याचं पांडे यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीत नमूद केलं आहे.
माजी नगरसेवकाचा फोटो केला मॉर्फ : सिडकोतील प्रभाग क्रमांक 29 मधून माजी नगरसेवक मुकेश शहाणे हे निवडणूक लढवत आहे. अंबड पोलीस ठाण्यात मॉन्टी दळवी नामक आयडी असलेल्या व्यक्ती विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यात शहाणे यांचा चेहरा हुबेहू मॉर्फ करून तो एआय च्या मदतीनं तयार करून तो सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला आहे. लोकप्रतिनिधित्व कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी मॉन्टी दळवी व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कार्यकर्त्यांवर हल्ला : प्रभाग क्रमांक 29 अतिसंवेदनशील प्रभाग आहे. येथील भाजपाचे उमेदवार दीपक बडगुजर यांचा प्रचार करणारा कार्यकर्ता पवन नगर परिसरात मतदार स्लिपचं वाटप करत असताना दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्याच्यावर अचानकपणे हल्ला केला. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
प्रचार कार्यालयाबाहेर गोंधळ : जुने नाशिक परिसरातील सारडा सर्कल भागातून एका उमेदवाराच्या कार्यालयासमोर प्रतिस्पर्धी उमेदवाराची बाईक रॅली जात होती. यावेळी दुचाकीवरून आलेल्या व्यक्तींनी कार्यालय समोर जोरदार हॉर्न वाजवत घोषणाबाजी केली. याबाबत मुंबई नाका पोलिसांनी संबंधित उमेदवाराला 168 प्रमाणं नोटीस बजावली आहे.
हेही वाचा :
- भाजपामध्ये पुन्हा राडा; नाशिक शहराध्यक्षांना कार्यालयात कोंडलं, सोनं विकून पैसा उभा केला, नाराज इच्छुक आक्रमक
- नाशिकमध्ये आमदारांनी पळवले एबी फॉर्म, भाजपा जिल्हाध्यक्षांनी केला पाठलाग, अनेक माजी नगरसेवकांचे पत्ते कट
- नाशिक महापालिका निवडणूक : भाजपा, काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज मोफत, तर शिवसेना राष्ट्रवादीकडून आकारलं जातंय शुल्क

