चिंताजनक! पिंपरी-चिंचवडमध्ये स्वाईन फ्लूचा शिरकाव; 37 रुग्णांना लागण, गणेशोत्सवाच्या गर्दीत खबरदारीचं आवाहन
पिंपरी-चिंचवडमध्ये स्वाईन फ्लूचे 37 रुग्ण आढळले असून, ऑगस्टमध्येच 31 बाधितांची नोंद झाली आहे.

Published : September 3, 2026 at 1:35 PM IST
पिंपरी-चिंचवड : गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला पिंपरी-चिंचवड शहरातून चिंताजनक बातमी समोर आली आहे. शहरात स्वाईन फ्लूनं पुन्हा डोकं वर काढलं आहे. यावर्षी आतापर्यंत तब्बल 37 रुग्णांना स्वाईन फ्लूची लागण झाल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी लक्ष्मण गोफने यांनी दिली. विशेष म्हणजे, केवळ ऑगस्ट महिन्यातच 31 रुग्ण आढळून आल्यानं आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे.
एकाच महिन्यात आढळले 31 रुग्ण : महापालिका प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, जानेवारी महिन्यात शहरात स्वाईन फ्लूचा एक रुग्ण आढळला होता. त्यानंतर जुलै महिन्यात पाच रुग्णांची नोंद झाली. मात्र, ऑगस्ट महिन्यात अचानक रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली आहे. एकाच महिन्यात 31 रुग्ण आढळून आले आहेत. गणेशोत्सवाच्या काळात होणारी मोठी गर्दी आणि त्यामुळं वाढू शकणारा संसर्गाचा धोका लक्षात घेता नागरिकांनी अधिक काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
तर संसर्गाचा धोका वाढू शकतो : सुदैवाची बाब म्हणजे, स्वाईन फ्लूची लागण झालेल्या सर्व 37 रुग्णांची प्रकृती सध्या स्थिर आहे. त्यामुळं नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असं आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. मात्र, सणासुदीच्या काळात गर्दीच्या ठिकाणी जाणं, सार्वजनिक वाहतूक आणि बंदिस्त ठिकाणी मोठ्या प्रमाणात जमणं यामुळं संसर्गाचा धोका वाढू शकतो. त्यामुळं नागरिकांनी खबरदारी घेणं गरजेचं आहे.
2022 मध्ये 58 रुग्ण : गेल्या काही वर्षांचा स्वाईन फ्लूचे प्रमाण पाहिले, तर 2022 मध्ये शहरात तब्बल 58 रुग्ण आढळून आले होते. विशेष म्हणजे त्यावेळी ऑगस्ट महिन्यातच 34 रुग्णांची नोंद झाली होती. त्यानंतर 2024 मध्ये 15 रुग्णांना स्वाईन फ्लूची लागण झाली होती. आता 2026 मध्ये पुन्हा एकदा रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे.
अधिक काळजी घेण्याची गरज : स्वाईन फ्लूचा संसर्ग प्रामुख्याने श्वसनमार्गातून होतो. त्यामुळं सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी, घशात खवखव, अशक्तपणा यासारखी लक्षणं दिसून आल्यास नागरिकांनी त्याकडं दुर्लक्ष करू नये. विशेषतः लहान मुलं, ज्येष्ठ नागरिक आणि इतर आजार असलेल्या व्यक्तींनी अधिक काळजी घेण्याची गरज आहे.
गर्दीच्या ठिकाणी मास्कचा वापर : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात मोठ्या प्रमाणात सार्वजनिक कार्यक्रम, मिरवणुका आणि धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जाणार आहे. या काळात शक्यतो अनावश्यक गर्दी टाळावी, गर्दीच्या ठिकाणी मास्कचा वापर करावा. वारंवार हात स्वच्छ धुवावेत, असा सल्ला महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिला आहे.
योग्य ती खबरदारी घ्यावी : सर्दी, खोकला किंवा तापाची लक्षणं जाणवत असल्यास स्वतःहून औषधं घेण्यापेक्षा महापालिका रुग्णालयातील डॉक्टरांचा सल्ला घेऊन योग्य उपचार घ्यावेत, असंही प्रशासनानं स्पष्ट केलं आहे. त्यामुळं शहरात स्वाईन फ्लूचे रुग्ण वाढत असले तरी सध्याची परिस्थिती नियंत्रणात असल्याचं महापालिका प्रशासनाचं म्हणणं आहे. नागरिकांनी घाबरून न जाता योग्य ती खबरदारी घेतल्यास संसर्गाचा धोका कमी करता येऊ शकतो.
हेही वाचा -
- नाशिकमध्ये स्वाईन फ्लूचा कहर; गेल्या 24 तासांत 2 जणांचा मृत्यू, डेंग्यूची रुग्ण संख्या 100 च्या पुढं - Nashik Swine flu News
- नाशिककरांनो सावधान! दोघांना स्वाईन फ्लूची लागण; एका महिलेचा मृत्यू, आरोग्य यंत्रणा अलर्ट - Swine Flu
- शहाद्यातील म्हसावदच्या डुकरांना स्वाईन फ्लूच! 'अफ्रिकन स्वाईन फिवर' ने मृत्यू झाल्याचा अहवाल

