ETV Bharat / state

सागा इथं अडकलेले ३७ भाविक काठमांडूकडं रवाना : मुख्यमंत्री फडणवीसांच्या पुढाकारानं मार्ग मोकळा

कैलास मानसरोवर यात्रेला गेलेले 37 भाविक सागा इथं अडकले होते. या भाविकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या पुढाकारानं परतीचा प्रवास सुरू केला आहे.

37 Pilgrims Stranded in Saga
३७ भाविक काठमांडूकडं रवाना (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : August 28, 2026 at 12:54 PM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

मुंबई : कैलास मानसरोवर यात्रा पूर्ण करून परतीच्या वाटेवर तिबेटमधील सागा इथं अडकलेल्या महाराष्ट्रातील ३७ भाविकांना अखेर दिलासा मिळाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारानंतर हे सर्व भाविक आज सकाळी सागा येथून न्यालम चेक पोस्टमार्गे काठमांडूकडं रवाना झाले. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून चिंतेत असलेल्या त्यांच्या कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळाला आहे.

37 Pilgrims Stranded in Saga
३७ भाविक काठमांडूकडं रवाना (ETV Bharat)

सागा येथे अडकले होते पर्यटक : ठाणे, पुणे, अलिबाग, रायगड आणि डोंबिवली परिसरातील हे भाविक कैलास मानसरोवर यात्रेसाठी गेले होते. यात्रा पूर्ण केल्यानंतर परतीच्या प्रवासात ते सागा येथे अडकले होते. २६ ऑगस्टला नेपाळच्या रासुवा जिल्ह्यात आलेल्या मोठ्या पुरामुळे रस्ते आणि पूल खराब झाले. त्याचा परिणाम नेपाळ-तिबेट सीमेवरील प्रवासावर झाला आणि अनेक यात्रेकरू अडकले.

२७ ऑगस्टला ११४ नागरिक अडकल्याची माहिती : या परिस्थितीत २७ ऑगस्टपर्यंत महाराष्ट्रातील सुमारे ११४ नागरिक अडकले असल्याची माहिती समोर आली होती. त्यापैकी सागा-मानसरोवर परिसरातील ५३ नागरिक सुरक्षित असल्याचं स्पष्ट झालं. उर्वरित नागरिकांशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू होते. पुरामुळे मोबाईल नेटवर्क आणि संपर्क व्यवस्था विस्कळीत झाल्यानं कुटुंबीयांनाही आपल्या नातेवाइकांशी संपर्क साधणं कठीण झालं. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या परिस्थितीची तातडीनं दखल घेतली. महाराष्ट्रातील नागरिकांना सुरक्षितपणे परत आणण्यासाठी त्यांनी केंद्र सरकार आणि परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क साधला. त्यानंतर सागा येथून न्यालम चेक पोस्टमार्गे काठमांडूकडं जाण्याचा मार्ग या ३७ भाविकांसाठी मोकळा झाला. त्याचबरोबर तिथं अडकलेल्या भाविकांशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडिओ कॉल द्वारे संपर्क साधत त्यांना दिलासा दिला.

२९ ऑगस्टला काठमांडूहून विमान : या ३७ भाविकांचं काठमांडूहून परतीचे विमान २९ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता आहे. त्यामुळे वेळेत काठमांडू गाठणं त्यांच्यासाठी महत्त्वाचं आहे. सागा ते काठमांडूचा प्रवास सुरळीत झाला, तर नियोजित विमानानं हे भाविक मायदेशी परतू शकतील. दरम्यान, महाराष्ट्रातील इतर यात्रेकरू आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठीही राज्य सरकारकडून केंद्र सरकार, परराष्ट्र मंत्रालय तसेच नेपाळ आणि तिबेटमधील संबंधित यंत्रणांशी संपर्क ठेवला जात आहे.

२०० हून अधिक भारतीय यात्रेकरू अडकले : कैलास मानसरोवर यात्रेवर गेलेल्या इतर भारतीय यात्रेकरूंची परिस्थितीही याच काळात अडचणीची झाली होती. तिबेटमध्ये विविध ठिकाणी २०० हून अधिक भारतीय यात्रेकरू अडकले होते. यातील काही दारचेन, काही झिलोंग आणि झुतुलपुक, तर सुमारे ६० ते ७० यात्रेकरू सागा परिसरात असल्याची माहिती देण्यात आली होती. भारताचे बीजिंग आणि काठमांडू येथील दूतावास संबंधित प्रशासनाशी संपर्कात आहेत. संकटाच्या काळात मदत मिळाल्याबद्दल या ३७ भाविकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र सरकार आणि भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाचे आभार मानले आहेत. सागातून काठमांडूकडं सुरू झालेला प्रवास आता या भाविकांना सुखरूप घरी परतण्याच्या दिशेनं महत्त्वाचं पाऊल ठरलं आहे.