धक्कादायक : विसापूर किल्ल्याचा भाग कोसळून गाडलं गेलं घर, घरातील तीन जण ठार; तिकोणे कुटुंबावर दु:खाचा डोंगर
विसापूर किल्ल्याचा भाग कोसळून दुर्दैवी दुर्घटना घडली आहे. घरावर किल्ल्याचा भाग कोसळल्यानं पाटण गावातील तिकोणे कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला आहे.

Published : July 6, 2026 at 7:33 PM IST
पुणे : मुसळधार पावसामुळे विसापूर किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या गावावर किल्ल्याचा काही भाग कोसळल्यानं मोठी खळबळ उडाली. या किल्ल्याचा काही भाग कोसळून माती, दगडांचा ढिगारा घरावर कोसळून मलब्याखाली दबून तीन नागरिकांचा मृत्यू झाला. ही घटना मावळ तालुक्यातील पाटण गावात आज पहाटे घडली. या घटनेत नंदू तिकोणे, त्यांची पत्नी आणि मुलगा हे मातीखाली गाडले गेले. या दुर्घटनेत तिघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला. एनडीआरएफच्या पथकानं दीर्घ शोधमोहीमेनंतर तिघांचेही मृतदेह बाहेर काढण्यात यश मिळवलं आहे.
अचानक मोठा स्फोट झाल्यासारखा आवाज : मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी पहाटेच्या सुमारास परिसरात अचानक मोठा स्फोट झाल्यासारखा आवाज झाला. काही क्षणांतच विसापूर किल्ल्याच्या उतारावरील माती आणि दगडांचा मोठा भाग कोसळून तो थेट नंदू तिकोणे यांच्या घरावर आला. घर पूर्णपणे मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेल्यानं कुटुंबातील तिघंही अडकले. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी तातडीनं मदतकार्य सुरू केलं. त्यानंतर एनडीआरएफ, पोलीस, महसूल विभाग, अग्निशमन दल आणि स्थानिक प्रशासनाची पथक घटनास्थळी दाखल झाली. जेसीबी आणि अत्याधुनिक उपकरणांच्या मदतीनं अनेक तास युद्धपातळीवर शोध व बचावकार्य राबवण्यात आलं. अखेर मातीचा ढिगारा हटवून नंदू तिकोणे, त्यांची पत्नी आणि मुलगा यांचं मृतदेह बाहेर काढण्यात आलं.
मावळ तालुक्यावर पसरली शोककळा : या हृदयद्रावक घटनेमुळे पाटण गावासह संपूर्ण मावळ तालुक्यावर शोककळा पसरली आहे. तिकोणे कुटुंबाच्या निधनानं गावकऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. अनेकांनी घटनास्थळी धाव घेत कुटुंबीयांचं सांत्वन केलं. गेल्या काही दिवसांपासून मावळ तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. सततच्या पावसामुळे डोंगराळ भागातील माती भुसभुशीत झाली असून दरडी कोसळण्याच्या घटना वाढल्या आहेत. विसापूर किल्ल्याच्या परिसरातही अतिवृष्टीमुळे ही दुर्घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन : प्रशासनानं परिसराची पाहणी सुरू केली असून किल्ल्याच्या पायथ्याशी आणि दरडप्रवण भागात राहणाऱ्या नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे. आवश्यकतेनुसार धोकादायक ठिकाणांवरील नागरिकांचं स्थलांतर करण्याची तयारीही प्रशासनानं सुरू केली आहे. या दुर्घटनेमुळे अतिवृष्टीच्या काळात डोंगराळ भागातील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
हेही वाचा :

