ETV Bharat / state

मुंबई महानगरपालिकेच्या कारभारामुळं 3 लाख विद्यार्थी वह्या-पुस्तकांविना; शिक्षण मंडळाच्या बैठकीत मुद्दा गाजणार

शाळा सुरू होऊन आठवड्यानंतरही मुंबई महानगरपालिकेच्या 90% विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य मिळालेलं नाही. त्यामुळे 'जेम' पोर्टलवरील निविदा विलंबाच्या मुद्द्यावरून शिक्षण मंडळाच्या बैठकीत जोरदार वाद होणार.

BMC SCHOOL MATERIAL DELAY 2026
महानगरपालिका शाळा (File Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : June 23, 2026 at 2:55 PM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

मुंबई : महानगरपालिकेच्या शाळा सुरू होऊन आता एक आठवडा उलटून गेला आहे. मात्र, अद्यापही तब्बल 90 टक्के विद्यार्थ्यांना वह्या, पुस्तकं आणि इतर 27 प्रकारच्या आवश्यक वस्तू मिळालेल्या नाहीत. शैक्षणिक साहित्याअभावी गरीब विद्यार्थ्यांच्या अभ्यासात मोठे अडथळे निर्माण होत आहेत. या गंभीर समस्येवर मंगळवारी (दि.23) होणाऱ्या पालिकेच्या शिक्षण मंडळाच्या बैठकीत जोरदार वादळ उठण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

विद्यार्थी पालकांमध्ये तीव्र असंतोष : महानगरपालिका क्षेत्रातील आणि उपनगरांमधील एक हजारांहून अधिक शाळांमध्ये सध्या सुमारे सव्वातीन लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शाळा सुरू होऊन आठ दिवस झाले, तरी साहित्य वाटपात झालेल्या प्रचंड विलंबामुळं विद्यार्थी आणि पालकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.

निविदा प्रक्रियेतील घोळामुळं विद्यार्थ्यांना फटका : महानगपपालिकेच्या कारभारात पहिल्यांदाच शालेय साहित्य खरेदीची निविदा प्रक्रिया राज्य सरकारच्या नेहमीच्या पोर्टलऐवजी, केंद्र सरकारच्या नवीन 'जेम' (GeM) पोर्टलवर राबवण्यात आली. मात्र, या नवीन प्रणालीमुळं निविदा प्रक्रियेला कमालीचा विलंब झाला आणि याचा थेट फटका निष्पाप विद्यार्थ्यांना बसला. परिणामी, 3 लाख 20 हजार विद्यार्थ्यांपैकी जवळपास 90 ते 95 टक्के विद्यार्थ्यांना हक्काचं शालेय साहित्य वेळेत मिळालेलं नाही. पहिल्या दिवशी नगरसेवक, आमदारांसह फोटो काढण्यासाठी कुठून शैक्षणिक साहित्य प्रकट झाले, असा उपरोधिक सवाल मानखुर्द येथील पालक रवींद्र गायकवाड यांनी उपस्थित केला. शैक्षणिक साहित्य न मिळाल्याचा थेट परिणाम शिक्षकांच्या दैनंदिन अध्यापन प्रक्रियेवर होत असल्याच्या तक्रारी पुढं येत आहेत.

अजून शैक्षणिक साहित्य मिळालेलं नाही : "विद्यार्थ्यांना गृहपाठासाठी दिलेला अभ्यास करण्यास अडचणी येत आहेत. साहित्य न मिळाल्यामुळं विद्यार्थ्यांसमोर गृहपाठ करायला वह्या नाहीत, गृहपाठ नाही केला तर शिक्षा ठरलेली आहे, असं दुहेरी संकट उभं राहिलं आहे. वह्या आणि इतर लेखनसाहित्य उपलब्ध नसल्यामुळं वर्गात शिकवलेला अभ्यास लिहून कसा घ्यावा, असा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर आहे. कामगार वर्गातील पालकांना वाढत्या महागाईमुळं स्वतःच्या पैशांनी बाजारातून महागडे साहित्य खरेदी करणं परवडत नाही," अशी व्यथा रवींद्र गायकवाड यांनी मांडली. पालक सुप्रिया जोशी यांनी सांगितलं की, मुलं सध्या तात्पुरत्या स्वरूपात सुट्या कागदांवर नोंदी करत आहेत. शाळा सुरू होऊन आठवडा झाला तरी मुख्य शैक्षणिक साहित्य मिळालेलं नाही.

साहित्य विद्यार्थ्यांना वाटण्याचं काम सुरू : गेल्या वर्षातील शिल्लक राहिलेलं साहित्य आणि यंदा नव्यानं उपलब्ध झालेल्या काही वस्तू तातडीनं विद्यार्थ्यांना वाटल्या आहेत. तसंच, कंत्राटदारांकडून जसजसा नवीन माल येईल, तसा तो थेट शाळांमध्ये पोहोचवून विद्यार्थ्यांच्या हाती सुपूर्द केला जाईल, असा दावा शिक्षण विभागानं केलाय.

विद्यार्थ्यांचं होतंय शैक्षणिक नुकसान : "इतिहासात पहिल्यांदाच असं घडत आहे की, शाळा सुरू होऊनही विद्यार्थ्यांना मूलभूत वस्तू मिळालेल्या नाहीत. त्यातच शिक्षकांवर लागलेली इतर शासकीय कामांची ड्युटी आणि शाळांमधील रिक्त पदे यामुळं विद्यार्थ्यांचं मोठं शैक्षणिक नुकसान होत आहे," असं मुख्याध्यापक संघटनेचे सचिव सचिन गवळी यांनी सांगितलं.

हेही वाचा :

  1. आषाढी वारीनिमित्त देखण्या रथांना वाढती मागणी, कोल्हारमधील तरुण उद्योजकाचा 25 वर्षांचा यशस्वी वारसा
  2. शिंदेंच्या मंचावरून बाळासाहेबांच्या शेवटच्या भाषणाची खिल्ली? अंबादास दानवेंची संतप्त प्रतिक्रिया
  3. कौटुंबिक वादाचे हिंसक रूप; मुलगा अन् सुनेला कारखाली चिरडण्याचा प्रयत्न, अमरावतीच्या तिवसातील घटना