नाताळ आणि नवीन वर्षाच्या सुट्ट्यांमध्ये भाविकांनी साईचरणी केलं भरभरून दान; 9 दिवसात तब्बल 23 कोटी 29 लाखांचं दान
'सबका मालिक एक'चा महामंत्र देणाऱ्या शिर्डी साईबाबांना भाविक आपल्या स्वेच्छेनं सोनं, चांदी, रक्कम दान करतात. नाताळ आणि नवीन वर्षाच्या सुट्ट्यांमध्ये भाविकांनी साईबाबांना भरभरून दान दिलंय

Published : January 3, 2026 at 4:10 PM IST
शिर्डी : देशभरातील भाविकांचं श्रद्धास्थान म्हणून ओळख असलेल्या शिर्डीच्या साईमंदिरात (Sai Mandir) रोजच हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात. त्यात साईचरणी दान देणाऱ्या भक्तांची संख्याही खूप आहे. यंदा नाताळाच्या आणि नवीन वर्षाच्या 9 दिवसांच्या सुट्ट्यांमध्ये 8 लाख भाविकांनी साई समाधीचं दर्शन घेतलं आहे. त्याचबरोबर भाविकांनी या दिवसांमध्ये साईच्या झोळीत भरभरून दान दिलं आहे. शिर्डी साईबाबांना भाविकांनी 9 दिवसात तब्बल 23 कोटी 29 लाख 23 हजार रुपयांचं दान दिलं आहे.
कसे मिळाले दान? : साईबाबांच्या मंदिर परिसरातील दानपेटीत 6 कोटी 2 लाख 61 हजार रुपयांची विक्रमी देणगी जमा झाली आहे. तर या व्यतिरिक्त लाखो भाविकांनी साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं असून सोनं 293.910 ग्रॅम त्याची किंमत 36 लाख 38 हजार 610 रुपये असून 5983.970 ग्रॅम वजनाची चांदी ज्याची किंमत 9 लाख 49 हजार 471 रुपयांची साईबाबांना दान स्वरूपात दिली आहे. त्याचबरोबर हरियाणा राज्यातील भाविकांनी सोन्याचा हिरेजडीत तब्बल 80 लाख रुपयांचा मुकुट साईबाबांच्या चरणी अर्पण केला आहे. तसंच साई मंदिर परिसरातील देणगी काउंटरवर 3 कोटी 22 लाख 43 हजार 388 रुपयांचे दान भाविकांनी दिले असून जे भाविक शिर्डीत येऊ शकले नाहीत. त्या भाविकांनी ऑनलाईनद्वारे, डेबिट-क्रेडिट कार्डद्वारे चेक-डीडीद्वारे, मनीऑर्डरद्वारे 10 कोटी 18 लाख 86 हजार 955 रुपये साईंना दान स्वरूपात अर्पण केले आहेत. त्याचबरोबर 2 कोटी 42 लाख 60 हजार रुपये पीआरओ सशुल्क देणगी पासच्या माध्यमातून संस्थानला आले आहेत. लाडू पॉकेट प्रसादाच्या माध्यमातून 2 कोटी 30 लाख 23 हजार 320 रुपयांची भाविकांनी खरेदी केली आहे. 26 देशांतील विदेशी भाविकांनी तब्बल 16 लाख 83 हजार रुपयांचे दान दिले आहे. तसंच इतर किरकोळ स्वरुपातील दानाची ही एकूण रक्कम आहे.
गेल्या वर्षीच्या तुलनेत विक्रमी देणगी : नाताळच्या सुट्ट्या आणि नववर्षाच्या स्वागतासाठी 25 डिसेंबर ते 2 जानेवारी या काळात 23 कोटी 29 लाख 23 हजार 373 रुपयांची देणगी संस्थानच्या दानपेटीत जमा झाली असून, यात गेल्या वर्षीच्या तुलनेत काही कोटींनी वाढ झाली आहे. आजपर्यंतची ही विक्रमी देणगी म्हणता येईल. दरवर्षी शिर्डीत गर्दीचे आणि दानाचे नवनवे विक्रम मोडत असताना, ज्या साई भक्तांच्या दानातून साईंची गंगाजळी भरली जात आहे. साईबाबा संस्थानकडे आजमितीला 3300 कोटींच्यावर ठेवी, तर 540 किलो सोनं आणि 7 हजार किलो चांदी असून तब्बल 10 कोटी रुपयांचे हिरे जमा आहेत.
फकिराचा दरबार झाला कुबेराचा दरबार : फेब्रुवारी 1992 मध्ये सुरू झालेल्या साईबाबा संस्थानच्या खात्यामध्ये फक्त 3500 रुपये होते आणि वर्षाचे बजेट 3200 रुपये होते. आज साईबाबा संस्थानचे वार्षिक बजेट 550 कोटी रुपयांपर्यंत जाऊन पोहोचले आहे. काही हजारात सुरू झालेल्या साई संस्थानकडं आता अब्जावधी रुपये जमा आहेत. या पैशामधून साई भक्तांच्या राहण्याची सुविधा, जेवण, दर्शन लाईन या सुविधांसाठी खर्च केला जातो. तसंच शिर्डी आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या मुलांसाठी साईबाबा संस्थानकडून शाळा-कॉलेज चालवले जातात आणि गरीब, सामान्य लोकांसाठी संस्थानच्या हॉस्पिटलमध्ये मोठ्या-मोठ्या आजारांवर मोफत उपचार केले जातात. शिर्डीतील रस्ते आणि पाणी यासारख्या अनेक सुविधांवर साईबाबा संस्थानकडून दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. हे सर्व साई भक्तांच्या कृपेनं सुरू असून ते साईबाबांना आपलं सर्वस्व मानतात आणि यामुळंच फकिराचा दरबार कुबेराचा दरबार म्हणून ओळखला जातो.
हेही वाचा -

