पुणतांब्यात साजरा झाला शेतकरी संप दिन, 2017 च्या ऐतिहासिक शेतकरी आंदोलनाची आठवण
अहिल्यानगर जिल्ह्यातील पुणतांबा या छोट्याशा गावातून सुरू झालेल्या शेतकरी संपाने संपूर्ण महाराष्ट्रासह देशाचे लक्ष वेधून घेतले होते.

Published : June 1, 2026 at 2:57 PM IST
अहिल्यानगर - 1 जून 2017 महाराष्ट्राच्या शेतकरी चळवळीच्या इतिहासात हा दिवस सुवर्णाक्षरांनी लिहिला गेला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील पुणतांबा या छोट्याशा गावातून सुरू झालेल्या शेतकरी संपाने संपूर्ण महाराष्ट्रासह देशाचे लक्ष वेधून घेतले होते. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी उभारलेल्या या आंदोलनामुळे शासनाला शेतकरी प्रश्नांची गंभीर दखल घ्यावी लागली आणि पुढे कर्जमाफीचा निर्णय घेण्यात आला.

शेतकऱयांची अभूतपूर्व एकजूट - शेतकरी संप उभा करण्यासाठी पुणतांबा येथील शेतकरी नेते व कार्यकर्त्यांनी गावोगावी जाऊन शेतकऱ्यांना संघटित केले. शेतकरी संपाची ताकद आणि त्यामागील भूमिका समजावून सांगत राज्यभर जनजागृती करण्यात आली. त्यातून पुणतांब्यात पेटलेली क्रांतीची ज्योत पुढे संपूर्ण महाराष्ट्रात पसरली आणि लाखो शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले. सुरुवातीला अनेकांना शेतकरी संपाची कल्पनाच अशक्य वाटत होती. मात्र शेतकऱ्यांनी अभूतपूर्व एकजूट दाखवत दूध, भाजीपाला तसेच इतर कृषी उत्पादनांचा पुरवठा थांबवून आंदोलन यशस्वी करून दाखवले. या कृतीतून देशाच्या अर्थचक्रात शेतकऱ्यांचे स्थान किती महत्त्वाचे आहे हे अधोरेखित झाले.

पुणतांबा गावाला शेतकरी संपाचे गाव अशी ओळख - सुमारे पंधरा दिवस चाललेल्या या आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांनी मोठा संयम राखला. स्वतःचे आर्थिक नुकसान सहन करूनही त्यांनी आपल्या हक्कांसाठी संघर्ष सुरू ठेवला. यापूर्वी शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांनी शेतकरी संपाची संकल्पना मांडली होती. मात्र 2017 मध्ये माध्यमांच्या व्यापक पोहोचेमुळे हे आंदोलन राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचले आणि देशभर चर्चेचा विषय ठरले. या आंदोलनामुळे पुणतांबा गावाला शेतकरी संपाचे गाव म्हणून नवी ओळख मिळाली. शेतकऱ्यांच्या एकजुटीची ताकद शासनालाही मान्य करावी लागली. त्यानंतर राज्यात मोठ्या प्रमाणावर कर्जमाफीसह विविध शेतकरीहिताच्या योजनांना चालना मिळाली.

शेतकरी एकजुटीच्या घोषणा - या ऐतिहासिक आंदोलनाच्या स्मरणार्थ 1 जून रोजी पुणतांबा ग्रामपंचायतीशेजारी शेतकरी संपानंतर उभारण्यात आलेल्या बळीराजाच्या पुतळ्याला अभिषेक करण्यात आला. यावेळी शेतकरी आणि कार्यकर्त्यांनी शेतकरी एकजुटीच्या घोषणा देत 2017 च्या आंदोलनातील योगदानाची आठवण जागवली. आंदोलन यशस्वी करण्यासाठी संघर्ष करणाऱ्या सर्व शेतकरी, कार्यकर्ते आणि नेत्यांना यावेळी अभिवादन करण्यात आले. पुणतांब्यातून पेटलेली ती क्रांतीची ज्योत आजही शेतकरी संघर्षाच्या इतिहासात तेजाने प्रज्वलित असून शेतकऱ्यांच्या हक्कांसाठीच्या लढ्याला प्रेरणा देत आहे. यंदाही जून महिन्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेल, अशी अपेक्षा यावेळी अनेक शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

हेही वाचा -

