ETV Bharat / state

19 डिसेंबरला अमेरिकेच्या संसदेत किंवा बाहेर काही महत्त्वाचे गौप्यस्फोट होणार, पृथ्वीराज चव्हाणांच्या विधानाला संजय राऊतांचा दुजोरा

19 डिसेंबरला अमेरिकेच्या संसदेत किंवा बाहेर काही महत्त्वाचे गौप्यस्फोट होण्याची शक्यता आहे, असं म्हणत संजय राऊतांनी भाजपावर निशाणा साधलाय.

Sanjay Raut corroborates Prithviraj Chavan statement
पृथ्वीराज चव्हाणांच्या विधानाला संजय राऊतांचा दुजोरा (Source- ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : December 17, 2025 at 1:55 PM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

मुंबई- काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी येत्या 19 डिसेंबरनंतर देशात आतापर्यंतचा सर्वात मोठा राजकीय भूकंप होणार असून, भारताचा पंतप्रधान बदलला जाणार आहे, तसेच तो पंतप्रधान मराठी माणूस असेल, असं भाकित केलं होतं. त्यालाच आता शिवसेने (उबाठा)चे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी दुजोरा दिलाय. 19 डिसेंबरला अमेरिकेच्या संसदेत किंवा बाहेर काही महत्त्वाचे गौप्यस्फोट होण्याची शक्यता आहे, असं म्हणत संजय राऊतांनी भाजपावर निशाणा साधलाय. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.

भाजपा आणि त्यांच्या नेत्यांची फजिती होणार : पृथ्वीराज चव्हाणांचं राजकीय विश्लेषण आहे. पण 19 डिसेंबरला अमेरिकेच्या संसदेत किंवा बाहेर काही महत्त्वाचे गौप्यस्फोट होण्याची शक्यता आहे. जे काही पेपर्स तिथून निघणार आहेत, अमेरिकेतील जेफ्री एपस्टीन उद्योगपती आहेत, त्या मार्फत भारतासंदर्भातील महत्त्वाची माहिती समोर येणार आहे आणि खास करून पंतप्रधान मोदी आणि भाजपासंदर्भात, अशी आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा सुरू आहे. ही माहिती अत्यंत स्फोटक, धक्कादायक आणि अंध भक्तांना कायमची कोमात पाठवणारी माहिती आहे, अशी माझी माहिती आहे. त्यामुळे भाजपा आणि त्यांच्या नेत्यांची फजिती होणार आहे, त्यांनी कितीही प्रयत्न केला तरी त्यांना सत्तेत राहणात येणार नाही, अशा प्रकारचं एक विश्लेषण समोर आलंय. पृथ्वीराज चव्हाण हे या बाबतीतले तज्ज्ञ आहेत. कारण त्यांनी अनेक स्तरांवर काम केलेलं आहे. त्यांची माहिती बरोबर आहे. आमची माहितीही तीच आहे. त्यामुळे अमित शाहांना 102 ताप आला आहे. 19 तारखेला काही तरी स्फोट होतोय, त्यामुळे सर्व खासदारांना दिल्लीत थांबायला सांगितलंय. भाजपाचा व्हिप निघालेला आहे, धावाधाव सुरू आहे, असंही संजय राऊत म्हणालेत.

दोन्ही पक्षांची आघाडीच सत्ताधाऱ्यांसमोर आव्हान उभं करेल : उद्धव आणि राज युतीसंदर्भात विचारले असता, संजय राऊत म्हणाले की, उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि मनसेमध्ये जागावाटपासंदर्भातल्या चर्चा आहेत, त्या अंतिम टप्प्यात आलेल्या आहेत. मुंबई महत्त्वाची आहे. कालही आमची सविस्तर चर्चा झाली आणि आज या चर्चेला पूर्णविराम मिळेल. कालसुद्धा संध्याकाळनंतरसुद्धा मनसे आणि शिवसेनेचे नेते अंतिम हात फिरवण्यासाठी बसले आणि आज हा विषय संपायला हवा. ठाणे, कल्याण-डोंबिवली, पुणे आणि नाशिकमध्ये चर्चा अंतिम टप्प्यात आलेली असून, येत्या एक ते दोन दिवसांत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र बसतील आणि त्यानंतर ज्या घोषणेची उत्सुकता लागून राहिलेली आहे, ती होणार आहे. पण काही झालं तरी आमच्या गोंधळ आणि विसंवाद नाही. महायुतीमध्ये जे चाललंय तसं आमच्याकडे अजिबात नाही. आमचं घर दोघांचं आहे. काँग्रेस नाही, त्यांना स्वबळ दाखवायचं आहे. शरद पवार साहेबांशी चर्चा होईल. पण मुंबईतले जे प्रमुख पक्ष आहेत ते शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे. या दोन्ही पक्षांची आघाडीच सत्ताधाऱ्यांसमोर आव्हान उभं करेल आणि करतायत. महाराष्ट्र आणि मुंबईला जाग आणण्याचं काम ही आघाडी नक्की करणार असल्याचंही विश्वास त्यांनी बोलून दाखवला.