पश्चिम आशियात अडकलेल्या राज्यातील 164 जणांचं यशस्वी 'एअरलिफ्ट'; भारतात परतलेल्या लोकांनी सांगितले थरारक अनुभव
पश्चिम आशियात सुरु असलेल्या युद्ध परिस्थितीत अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांच्या मदतीसाठी मंगळवारी दोन विशेष विमानांची व्यवस्था करत 164 नागरिकांना सुखरूप मायदेशी परत आणलं.


Published : March 4, 2026 at 1:46 AM IST
-By Amey Rane
मुंबई 164 Passengers Returned : पश्चिम आशिया आणि आखाती देशात सुरु असलेली युद्धजन्य परिस्थती दिवसेंदिवस भयानक होत चालली आहे. इराण-इस्रायल-अमेरिका यांच्यातील तीव्र संघर्षाच्या झळा सध्या संपूर्ण जगावर पसरल्याचं चित्र आहे. या युद्धाच्या वातावरणात हवाई क्षेत्र बंद पडल्यामुळं दुबईसह यूएईमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांना मायदेशी परण्याकरता राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेत तातडीनं पावलं उचलली. या भीषण परिस्थितीत अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांच्या मदतीसाठी मंगळवारी दोन विशेष विमानांची व्यवस्था करत 164 नागरिकांना सुखरुप मायदेशी परत आणण्यात आलं.
प्रवाशांनी सांगितले थरारक अनुभव : मुंबईत सुखरुप परत आलेल्या प्रवाशांनी प्रशासनाचे आभार मानल्यानंतर सांगितलेले काही अनुभव फारच भयानक आणि अंगावर काटा आणणारे होते. यापैकी राहुल या तरुणानं 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितलं की, तो मुंबईहून अमेरिकेला जात होता. या विमानप्रवासात दुबईतून त्याचं कनेक्टेड फ्लाईट होतं. त्यात तो इतर प्रवाशांसोबत जाऊन बसलाही. मात्र बराचवेळ विमान रनवेच्याजवळ टेक ऑफच्या प्रतीक्षेत उभेच होतं. काहीवेळ त्यांना तांत्रिक बिघाडाचं कारण देण्यात आलं. मात्र काही वेळानं विमान पुन्हा टर्मिनलवर वळवून सर्वांना विमानातून सामानासह उतरवण्यात आलं. त्यानंतर काही तासांच्या प्रतीक्षेनंतर युद्ध परिस्थितीमुळे सर्व उड्डाणं रद्द केल्याचं त्यांना सांगण्यात आलं. त्यानंतर विमान कंपनीनं तातडीनं विमानतळावर बसेस पाठवून सर्व प्रवाशांना विमानतळावरून हॉटेलला नेत असल्याचं सागितंल. मात्र, संपूर्ण दुबईत तणावाचं वातावरण होतं. हॉटेल शोधण्यातही काही तास लागले. अनेकांचे यात प्रचंड हाल झाले, ज्यांना खोली मिळाली नाही, त्यांना हॉटेलच्या लॉबीत सोफ्यांवर झोपावं लागलं. अद्यापही अनेक भारतीय तिथं अडकून पडल्याचं यावेळी राहुलनं सांगितलं. त्यामुळं या युद्धामुळं आंतरराष्ट्रीय पर्यटकांचे अतोनात हाल झाल्याचं या प्रवाशांनी दिलेल्या माहितीवरुन स्पष्ट होतंय.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून 'मिशन एअर लिफ्ट' : आखाती देशात अडलेल्या महाराष्ट्रातील लोकांसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्टार एअर या विमान कंपनीची दोन विशेष विमानं आरक्षीत केली होती. रविवारी दुपारी फुजैरा एअरपोर्ट वरुन VT GSO आणि VT GSH या दोन विमानांची काही मिनिटांच्या अंतरात लागोपाठ उड्डाणं झाली. या दोन्ही विमानांमधून एकूण 164 प्रवासी मंगळवारी रात्री 10 च्या सुमारास मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले. यात पुण्यातील इंदिरा स्कूल ऑफ बिझनेस स्टडीजचे 84 विद्यार्थी तसंच ठाणे, मुरबाड, अहिल्यानगर, इत्यादी भागातील नागरिकांचा समावेश होता. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी या लोकांशी फोनवरून संवाद साधत त्यांना धीर दिला होता. "तुम्ही सर्व सुरक्षित आहात, काळजी करु नका, महाराष्ट्र शासन आणि मी स्वतः तुमच्या पाठीशी ठाम उभा आहे. तुम्हाला सुखरुप मायदेशी परत आणण्यासाठी सर्व प्रयत्न केले जातील," असा शब्द एकनाथ शिंदे यांनी दिला होता. त्यानंतर सर्व संबंधित यंत्रणांशी सतत संपर्कात राहून या 164 प्रवाशांना मायदेशी आणत त्यांनी दिलेला शब्द पाळला.

शिवसेना आमदरांकडून परतलेल्या प्रवाशांचं विमातळावर स्वागत : एकनाथ शिंदे यांच्या आदेशावरुन शिवसेना आमदार मुरजी पटेल, शायना एनसी यांच्यासह दीपक सावंत आणि कुणाल सरमळकर यांच्यासह तमाम शिवसेना कार्यकर्ते विमानतळावर पोहोचले होते. यावेळी शिवसैनिक गुलाबचे फूल आणि पुष्पगुच्छ घेऊन त्यांच्या स्वागतासाठी सज्ज होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी मोबाईलवरुन एयर पोर्टवर आलेल्या शिवसेना नेत्यांसोबत संपर्क साधून घेत सर्व व्यवस्थेवर देखरेख ठेवून होते. आखाती देशातील हवाई क्षेत्र बंद पडल्यानं दुबईसह यूएईमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील अनेक नागरिकांना मदत करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीनं पावलं उचलली आणि त्याचा परिणाम म्हणून अडकलेले लोक सुखरुप मुंबईत आले. त्यांना केवळ भारतात आणण्यापूरतीच नाही तर मुंबई विमानतळाहून त्यांना त्यांच्या गावी किंवा राहत असलेल्या ठिकाणी सुखरुप पाठविण्याची व्यवस्थाही एकनाथ शिंदे यांनी स्वखर्चानं केल्याची माहिती शिवसेना आमदार मुरजी पटेल यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली. परत आलेल्या अनेकांनी बाहेर पडताच 'गणपती बाप्पा मोरया' आणि एकनाथ शिंदेंचा जयजयकार करत त्यांना धन्यवाद देत त्यांनी केलेल्या मदतीबाबत आभार मानले.
राज्य सरकारकडूनही अडकलेल्या नागरिकांसाठी मदतकार्य सुरु : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री कार्यालयातूनही अडकलेल्या नागरिकांना परत भारत आणण्यासाठी पावलं उचलली जात आहेत. अडकलेल्या नागरिकांच्या मदतीकरता महाराष्ट्र सरकारनं एक विशेष व्हॉट्सॲप क्रमांक जारी केला आहे. मदतीसाठी अडकलेल्या प्रवाशांनी त्या क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आलंय. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयानं सोशल मीडियावर माहिती दिली. या पोस्टमध्ये लिहिलंय की, आखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या युद्ध परिस्थितीमुळं तिथं अडकलेल्या महाराष्ट्रातील विविध नागरिकांच्या संपर्कात राज्य सरकार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः सातत्यानं विविध यंत्रणांशी संपर्कात असून ते केंद्र सरकारसोबत सुद्धा सातत्यानं संपर्क ठेवून आहेत.
आखाती देशातील सध्याची परिस्थिती काय? : अमेरिका आणि इस्त्रायलनं मिळून इराणवर सध्या जोरदार हल्ला चढवला आहे. त्यामुळं पश्चिम आशियात सध्या युद्ध पेटल्याचं पाहायला मिळतंय. या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते आयतुल्ला खामेनेई मारले गेले आहेत. त्यामुळं संतप्त झालेल्या इराणनं प्रत्यूत्तरात आखाती देशांत अमेरिकेच्या लष्करी तळांवर हल्ला चढवला आहे. ज्यात आसपासच्या सहा देशातील विविध ठिकाणी असलेल्या अमेरिकन सैनिक तळांना इराणनं लक्ष्य केलं. आंतरराष्ट्रीय व्यापर केंद्र असलेल्या दुबईतील अमेरिकेच्या तळावर हल्ला चढवताना दुबईतील इतर भागांनाही लक्ष्य करण्यात आलं आहे. त्यामुळं जगभरात एकच खळबळ उडाली. यामुळं जगभरातील देशांनी आखाती देशात जाणारी विमान उड्डाणं थांबवली आहेत. यादरम्यान महाराष्ट्रातून पर्यटनासाठी, कामासाठी गेलेले अनेक नागरिक दुबईसह आखाती देशात अडकून पडले आहेत.
हेही वाचा :

