कोल्हापुरात 14 वर्षीय कलाकार सॅक्सोफोनद्वारे करतोय मतदारांचं प्रबोधन!
कोल्हापुरातल्या चौका-चौकांमध्ये अर्हन मिठारी हे नाव चर्चेत आहे. कारण, 14 वर्षीय अर्हन मिठारी हा सॅक्सोफोनद्वारे मतदारांचं प्रबोधन करतोय.

Published : January 7, 2026 at 8:02 PM IST
|Updated : January 7, 2026 at 8:45 PM IST
कोल्हापूर : राज्यभरात सध्या महानगरपालिका निवडणुकांची लगीन घाई जोरात सुरू आहे. निवडणूक कोणतीही असो मतदारांना आमिष, प्रलोभन ही ठरलेली गोष्ट आहे. मात्र, याच प्रलोभनांना बळी पडून शहराचा विकास खुंटवू नका, उमेदवारांकडून मतदारांना घातल्या जाणाऱ्या जेवणावळी, पैशाचं आमिष हे क्षणिक आहे. यानंतरची पाच वर्ष तुम्हालाच पश्चाताप करावा लागेल, अशा आशयाचं प्रबोधन सध्या कोल्हापुरात सुरू आहे.
सॅक्सोफोनद्वारे मतदारांचं प्रबोधन : कोल्हापुरातल्या चौका-चौकांमध्ये अर्हन मिठारी हे नाव चर्चेत आहे. कारण, 14 वर्षीय अर्हन मिठारी हा सॅक्सोफोनद्वारे मतदारांचं प्रबोधन करतोय. आपल्या गळ्यात अडकवलेला सॅक्सोफोन, त्यावर वाजणारी संगीतमय धून आणि मतदारांचं प्रबोधन करणारा फलक लावून मतदारांना अर्हन मिठारी साद घालतोय. दरम्यान, कमी वयात त्याला सुचलेलं शहाणपण मतदार राजा पाळेल का? असा प्रश्न सामान्य कोल्हापूरकरांनाही पडतोय.
निवडणुकीच्या काळात प्रलोभनं : निवडणूक कोणतीही असो सामान्य मतदारांना आकर्षित करण्यासाठी अनेकवेळा आमिष आणि प्रलोभनं दाखविली जातात. सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू आहेत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीप्रमाणे स्थानिक प्रश्न सोडवले जावेत, या हेतूनं स्थानिक स्वराज्य संस्थांची स्थापना झाली. यामध्ये महानगरपालिका निवडणुका म्हणजे स्थानिक कार्यकर्ते घडण्याचं केंद्र मानलं जातं. स्थानिक प्रश्न मांडणारे सक्षम उमेदवार निवडून यावेत, यासाठी मतदार आपली जबाबदारी निभावतात. मात्र, या मतदारांनाच निवडणुकीच्या काळात जेवण, पैसे आणि इतर अमिष दाखवून उमेदवारांकडून मत विकत घेण्याचे प्रकार समोर आले आहेत.

कल्पना कशी सुचली? : अर्हन मिठारीला यासंदर्भात कल्पना कशी सुचली? तर ऑगस्ट 2024 मध्ये कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृहाला आग होती. या आगीनंतर या नाट्यगृहानं समृद्ध केलेल्या कोल्हापूरच्या सांस्कृतिक वैभवाचा प्रवास व्हिडिओद्वारे संगीताची आवड असलेल्या अर्हन मिठारीनं मांडला होता. त्यानंतर मराठी अभिनेते जितेंद्र जोशी यांनी अर्हन मिठारीचा हा व्हिडिओ संगीतकार अजय-अतुल यांना पाठवला. अजय-अतुल यांनीही अर्हन मिठारीच्या कलेचं कौतुक केलं आणि यातूनच निवडणुकांच्या काळात मतदारांचं प्रबोधन केलं पाहिजे, अशी कल्पना अर्हन मिठारीला सुचली.
मतदारांना जागं करण्याचा प्रामाणिक प्रयत्न : सध्या कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीची धामधूम सुरू आहे. या निवडणुकीतही 81 प्रभागात राजकीय पक्षांचे उमेदवार उभे आहेत. त्यामुळं या निवडणुकीत मतदारांचं प्रबोधन करून आमिष, प्रलोभन अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी अर्हन मिठारी प्रयत्न करतोय. गेल्या चार दिवसांपासून कोल्हापुरातील प्रमुख चौकांमध्ये अर्हन मिठारी सॅक्सोफोन वाजवून मतदारांना आवाहन करतोय. सामान्य कोल्हापूरकर अर्हन मिठारीची धडपड बघत आहेत. दरम्यान, "मतदारराजाला जागं करण्यासाठी माझा हा प्रामाणिक प्रयत्न आहे," असं मत अर्हन मिठारीनं 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितलं.
प्रबोधनाचे व्हिडिओ सोशल मीडियावर : दरम्यान, कमी वयात अर्हन मिठारीला सुचलेलं शहाणपण मतदार अंमलात आणणार का? कोणत्याही आमिषाला बळी न पडता सक्षम उमेदवार निवडण्यासाठी अर्हननं केलेले प्रयत्न यशस्वी होणार? असे प्रश्न सध्या उपस्थित होत आहेत. तसंच, कोल्हापूरच्या चौका-चौकात अर्हन मिठारी करत असलेल्या प्रबोधनाचे व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. तर "कोल्हापूर महानगरपालिकेत योग्य आणि सक्षम उमेदवार निवडून येऊ शकतात. यासाठी अर्हनला सुचलेलं शहाणपण मतदारांना समजणं गरजेचं आहे," असं कोल्हापुरातील रंकाळा तलावावर फिरायला आलेल्या शिवाजी पाटील या मतदारानं म्हटलं आहे.
अर्हनला व्हायचंय संगीतकार : बहिस्थ विद्यार्थी म्हणून अर्हन मिठारी यंदा दहावीची परीक्षा देणार आहे. मात्र त्याला संगीताचा लहानपणापासूनच लळा लागलेला आहे. त्यामुळं त्यानं वडील आशिष मिठारी यांच्या मदतीनं 24 वेगवेगळ्या प्रकारची वाद्य वाजवण्याचं प्रशिक्षण घेतलं आहे. वडील आशिष मिठारी यांनाही संगीताची चांगली जाण असल्यामुळं गेली चार वर्ष ते अर्हनला सॅक्सोफोन वाजवण्याचे धडे देत आहेत. तसंच 24 वाद्य वाजवणाऱ्या अर्हनला संगीतकार व्हायचं आहे.
हेही वाचा :
- BMC ची सत्ता कोणाच्या हाती जाणार? मुंबईतील विविध भागांमध्ये काय परिस्थिती, कोणाचं पारडं जड? थोडक्यात जाणून घ्या
- कोणी कितीही शिव्या दिल्या तरी परिणाम होत नाही, आता ‘विष पिण्याची सवय झाली; मुख्यमंत्र्यांचा काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांना टोला
- काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष हिदायत पटेल यांचा उपचारादरम्यान मृत्यू; आरोपीला अटक

