11 वी प्रवेश प्रक्रियेची पहिली फेरी समाप्त; 4 लाख 7 हजार विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित
इयत्ता 11 वी प्रवेश प्रक्रियेची पहिली फेरी समाप्त झाली असून 4 लाख 7 हजार 273 विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला. यात सर्वाधिक मुंबई विभागात विद्यार्थी आहेत.

Published : June 4, 2026 at 7:38 AM IST
मुंबई : राज्यातील इयत्ता 11 वी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया (FYJC) 2026-27 अंतर्गत विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. आतापर्यंत 12 लाख 51 हजार 259 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. राज्यातील 9,591 कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. पहिल्या प्रवेश फेरीत 4 लाख 7 हजार 273 विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला आहे. ही माहिती माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने बुधवारी प्रसिद्ध केलेल्या जाहीर प्रकटनातून दिली आहे.
शिक्षण संचालनालयानं पत्रकाद्वारे दिलेल्या माहितीनुसार, नोंदणी केलेल्या 12,51,259 विद्यार्थ्यांपैकी 8,87,264 विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्जाचा भाग-1 आणि भाग-2 पूर्ण करून महाविद्यालय पसंतीक्रम निश्चित केला. त्यानंतर झालेल्या पहिल्या फेरीत 4,07,273 विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला. यापैकी नियमित कोट्यातून 3,75,668 तर व्यवस्थापन आणि अल्पसंख्याक कोट्यातून 31,605 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे.
मुंबई विभागात सर्वाधिक 68,209 विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला असला तरी पुणे विभाग 79,825 प्रवेशांसह राज्यात अव्वल ठरला आहे. तर लातूर विभागात सर्वात कमी 25,822 विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले आहेत. शिक्षण संचालनालयानं विद्यार्थी, पालक आणि कनिष्ठ महाविद्यालयांच्या प्राचार्यांना प्रवेश प्रक्रियेतील पुढील टप्प्यांबाबत नियमितपणे अधिकृत संकेतस्थळावरील माहिती तपासण्याचं आवाहन केलं आहे. प्रवेश प्रक्रियेविषयी अधिक माहितीसाठी महाफायजेसीच्या अधिकृत पोर्टलचा वापर करण्याचेही सांगण्यात आलं आहे.
| राज्यातील कनिष्ठ महाविद्यालये | 9,591 |
| एकूण नोंदणी | 12,51,259 विद्यार्थी |
| प्रवेशफेरी पूर्ण केलेले विद्यार्थी | 8,87,264 |
| पहिल्या फेरीतील एकूण प्रवेश | 4,07,273 |
| नियमित कोट्यातील प्रवेश | 3,75,668 |
| व्यवस्थापन/अल्पसंख्याक कोट्यातील प्रवेश | 31,605 |
इयत्ता 11 वी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतून कोणतेही कनिष्ठ महाविद्यालय वंचित राहू नये, यासाठी माहिती अद्ययावत करण्याचे शिक्षण संचालनालयाने निर्देश दिले आहेत. राज्यातील शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी इयत्ता 11 वीची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. काही कनिष्ठ महाविद्यालयांची माहिती अद्ययावत न झाल्यामुळे त्यांची नावे प्रवेश प्रक्रियेत समाविष्ट होऊ शकली नसल्याचं निदर्शनास आलं आहे. या पार्श्वभूमीवर माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयानं सर्व विभागीय शिक्षण उपसंचालकांना तातडीचे निर्देश जारी केले आहेत.
शिक्षण संचालनालयाने जारी केलेल्या पत्रानुसार, इयत्ता 11 वी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेपूर्वी आवश्यक पूर्वतयारी, नवीन कनिष्ठ महाविद्यालये किंवा तुकड्यांचा समावेश तसेच महाविद्यालयांची माहिती अद्ययावत करण्याबाबत वेळोवेळी सूचना देण्यात आल्या होत्या. शिक्षण संचालनालयानं विभागीय अधिकाऱ्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील सर्व कनिष्ठ महाविद्यालयांशी संपर्क साधून यू-डायस (U-DISE) कोड, अनुदानाचा प्रकार आणि इतर आवश्यक माहिती तातडीने अद्ययावत करण्याचे निर्देश दिले आहेत. कोणतेही कनिष्ठ महाविद्यालय प्रवेश प्रक्रियेपासून वंचित राहू नये, यासाठी विशेष दक्षता घेण्यास सांगण्यात आलं आहे.
यासाठी 4 जून 2026 रोजी कनिष्ठ महाविद्यालयांची माहिती अद्ययावत करण्यासाठी विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असून संबंधितांनी निर्धारित वेळेत आवश्यक कार्यवाही पूर्ण करावी, असेही स्पष्ट करण्यात आलं आहे. यानंतरही एखादे कनिष्ठ महाविद्यालय प्रवेश प्रक्रियेतून वंचित राहिल्यास किंवा त्यातून पुन्हा न्यायालयीन वाद निर्माण झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदार धरले जाईल, असा इशाराही संचालनालयानं दिला आहे. 11 वीची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया कोणत्याही अडथळ्याविना पार पडावी, यासाठी शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी पत्राद्वारे राज्यातील सर्व विभागीय शिक्षण उपसंचालकांना तातडीनं कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
हेही वाचा-

