दौंडच्या हॉटेलमध्ये गॅस सिलेंडरचा स्फोट, 10 कामगार गंभीर जखमी
हॉटेलमध्ये गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्यानं 10 कामगार गंभीर जखमी झाले. ही घटना दौंड पाटम मार्गावरील हॉटेल जगदंबामध्ये घडली.


Published : January 7, 2026 at 10:56 PM IST
पुणे : दौंड पाटस या अष्टविनायक मार्गावरील जगदंबा हॉटेलमध्ये गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्यानं मोठी खळबळ उडाली. या स्फोटामध्ये दहा कामगार जखमी झाले आहेत. स्फोटाची तीव्रता इतकी जास्त होती की यामुळे हॉटेलच्या काचा फुटल्या तसेच पत्रे उडाले आहेत. या स्फोटानंतर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. अग्निशामक दल आणि पोलीस पथकान तत्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. स्फोट झालेल्या हॉटेलमध्ये आणखी अनेक गॅस सिलेंडर होते, मात्र त्यांना आग लागली नसल्यानं मोठा अनर्थ टळल्याची माहिती स्थानिकांनी दिली. स्फोटाचा आवाज इतका मोठा होता की तो आवाज दूरवर पसरला. यामुळे मोठ्या प्रमाणावर बघ्यांची गर्दी हॉटेल समोर झाल्याचं पाहायला मिळालं.
गॅस सिलेंडरचा स्फोट : दुपारच्या सुमारास हा स्फोट झाला, यावेळी किचनमधील किचनमधील भांडी आणि इतर साहित्य अस्ताव्यस्त पडले. किचनमध्ये 15 ते 20 सिलेंडर आणखी असल्याचं समोर आले आहे. दौंड पोलिसांकडून या घटनेचा पंचनामा करण्यात आला आहे. परंतु अद्याप स्फोटाचे कारण समोर आलेले नाही. या घटनेमुळे दौंड पाटस रोडवरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. स्थानिक नागरिकांनी मदतकार्य करत अग्निशामक दलाला सहकार्य केले.
10 कामगार जखमी झाले : "आज दुपारी दौंड पाटस रोडवरील हॉटेल जगदंबामध्ये एका गॅस सिलेंडरचा स्फोट झाला आहे. या स्फोटामध्ये हॉटेलमध्ये काम करणारे 10 कामगार जखमी झाले आहेत. यातील गंभीरित्या जखमी झालेल्या कामगारांना ससून हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. आणि बाकीच्यांना दौंडमधील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. स्फोटामध्ये मोठ्या प्रमाणावर हॉटेलचे नुकसान झाले आहे. या स्फोटाबाबत माहिती मिळताच पोलीस, अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले होते. अग्निशामक दलाने तेथील आग आटोक्यात आणली. तसेच पोलीस पथकाने तेथील परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलीस सध्या या घटनेचा तपास करत आहेत. गुन्हा दाखल करण्याचे काम चालू आहे. फायर, सेफ्टी, सप्लायर्स अशा सगळ्या टीमची मदत घेऊन तपास सुरू झाला आहे. या स्फोटानंतर आम्ही जखमींच्या आरोग्याची काळजी घेत त्यांच्या उपचारावरती प्राथमिक भर दिला आहे. याबरोबरच आमचा तपास सुरू झाला आहे वेगवेगळ्या पातळीवरती या प्रकरणाचा तपास सुरू आहे," अशी माहिती दौंडचे उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस यांनी दिली आहे.
हेही वाचा :

