Wimbledon 2026: नोवाक जोकोविचनं तोडला रॉजर फेडररचा मोठा रेकॉर्ड; विक्रमी 17व्यांदा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश
सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचनं रविवारी झालेल्या एका चुरशीच्या सामन्यात 132व्या क्रमांकाच्या क्वालिफायर रोमन सफिउलिनवर एकापाठोपाठ एक विजय मिळवत रॉजर फेडररच्या विम्बल्डन विक्रमाची बरोबरी केली.

Published : July 6, 2026 at 10:46 AM IST
Wimbledon 2026 : सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचनं रविवारी झालेल्या एका चुरशीच्या सामन्यात 132व्या क्रमांकाच्या क्वालिफायर रोमन सफिउलिनवर एकापाठोपाठ एक विजय मिळवत रॉजर फेडररच्या विम्बल्डन विक्रमाची बरोबरी केली. या विजयासह, सात वेळा विम्बल्डन चॅम्पियन राहिलेल्या जोकोविचनं ऑल इंग्लंड क्लबमध्ये आपला 106 वा सामना जिंकला. आता त्यानं रॉजर फेडररला (105 विजय) मागे टाकत विम्बल्डनमधील पुरुषांच्या सर्वकालीन यादीत अव्वल स्थान पटकावलं आहे. मात्र, एकूण यादीत तो अजूनही मार्टिना नवरातिलोवाच्या 120 सामन्यांच्या विजयांच्या विक्रमापासून मागे आहे.
So good Safiullin had to clap 👏
— Wimbledon (@Wimbledon) July 5, 2026
Novak Djokovic continues to produce sensational tennis. pic.twitter.com/g5Ksu3h8FH
पहिल्या सेटमध्ये मागे असताना जिंकला सामना : हा टप्पा गाठण्यासाठी जोकोविचला खूप मेहनत करावी लागली. त्यानं सफिउलिनविरुद्धचा सामना 7-6 (6), 6-3, 3-6, 6-3 असा जिंकला. पहिल्या सेटमध्ये 5-2 नं मागे असताना जोकोविचनं दोन सेट पॉईंट वाचवून सामना टायब्रेकरमध्ये नेला होता. तिसऱ्या सेटच्या सुरुवातीला आपली सर्व्हिस गमावल्यानंतर, जोकोविचनं कथितरित्या अपमानास्पद भाषा वापरली, ज्यासाठी त्याला पंचांकडून ताकीद मिळाली. सेट गमावल्यानंतर त्यानं रागानं चेंडू दूर फेकला तेव्हा प्रेक्षकांनी त्याला हुसकारलं.
No man has won more matches at Wimbledon, ever.
— Wimbledon (@Wimbledon) July 5, 2026
Novak Djokovic overtakes Roger Federer's record to secure a historic 106th gentlemen’s singles win at The Championships 👑 pic.twitter.com/sJ6Ee5nt7u
जोकोविचनं मागितली माफी : सामन्यानंतर, 39 वर्षीय जोकोविचनं आपल्या वर्तनाबद्दल माफी मागितली आणि म्हणाला, "मी माझ्या भावनांवर नियंत्रण ठेवू शकलो नाही, त्यासाठी मी माफी मागतो." त्यानं हे देखील कबूल केलं की लांब रॅलींमध्ये मागे पडल्यामुळं त्याला बेसलाइनऐवजी नेटजवळ खेळण्याची रणनीती अवलंबावी लागली, जी प्रभावी ठरली.
17व्यांदा विम्बल्डनच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश : या विजयासह, जोकोविच 17व्यांदा विम्बल्डनच्या उपांत्यपूर्व फेरीत पोहोचला आहे. तो आता फेडररच्या आठ विम्बल्डन विजेतेपदांच्या विक्रमाची बरोबरी करण्यापासून फक्त तीन विजय दूर आहे. पुढील फेरीत, त्याचा सामना तिसऱ्या मानांकित फेलिक्स ऑगर-अलियासिम आणि 22व्या मानांकित अलेहांद्रो डेव्हिडोविच फोकिना यांच्यातील सामन्याच्या विजेत्याशी होईल.
क्रेजकोव्हाचा पराभव : यावर्षी विम्बल्डनला एक नवीन महिला एकेरी विजेती मिळणार आहे. असं सलग नवव्यांदा घडलं आहे. गतविजेती आणि 2024 ची विजेती बार्बोरा क्रेजकोव्हा चौथ्या फेरीत तिच्याच देशाच्या, चेक प्रजासत्ताकच्या कॅरोलिना मुचोव्हाकडून पराभूत झाली. इगा स्वियाटेक, एलेना रायबाकिना आणि सेरेना विल्यम्स या आधीच स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतर, क्रेजकोव्हा ही एकमेव माजी विजेती स्पर्धेत शिल्लक होती. मुचोव्हानं क्रेजकोव्हाचा 7-5, 5-7, 6-3 असा पराभव केला. 2016 मध्ये सेरेना विल्यम्सनं सातवं विजेतेपद पटकावल्यापासून, कोणत्याही महिला खेळाडूनं विम्बल्डनमध्ये एकापेक्षा जास्त वेळा विजेतेपद मिळवलेले नाहीत.
हेही वाचा :
- सातव्यांदा वर्ल्ड कप जिंकताच ऑस्ट्रेलियावर पैशांचा पाऊस; भारतालाही मिळाले करोडो रुपये
- नॉर्वेचा पाच वेळच्या विजेता ब्राझीलला धक्का! दणदणीत विजयासह पहिल्यांदाच विश्वचषक उपांत्यपूर्व फेरीत धडक
- ज्युड बेलिंगहॅमचे तीन मिनिटांत दोन गोल, इंग्लंड उपांत्यपूर्व फेरीत; कॅनडानंतर यजमान मेक्सिकोही वर्ल्ड कपच्या बाहेर

