ETV Bharat / sports

4 वर्षांपूर्वीचा बदला घेत राजस्थान अहमदाबादचं तिकिट मिळवणार? GT vs RR यांच्यात रंगणार क्वालिफायर-2 सामना

आयपीएल 2026 चा दुसरा क्वालिफायर सामना आज राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात खेळला जाईल.

RR vs GT Qualifier 2
4 वर्षांपूर्वीचा बदला घेत राजस्थान अहमदाबादचं तिकिट मिळवणार? (IANS Photo)
author img

By ETV Bharat Sports Team

Published : May 29, 2026 at 10:19 AM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

RR vs GT Qualifier 2 : आयपीएल 2026 चा दुसरा क्वालिफायर सामना आज राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात खेळला जाईल. हा सामना न्यू चंदीगड येथील महाराजा यादवेंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल. सामना सायंकाळी 7:30 वाजता सुरु होईल. या दुसऱ्या क्वालिफायरची सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, विजेता संघ आयपीएल 2026 चा दुसरा अंतिम स्पर्धक बनेल. मात्र, या सामन्याची तारीख त्याला आणखी रोमांचक बनवते. कारण चार वर्षांपूर्वी, 29 मे रोजी, गुजरात टायटन्सनं आयपीएल 2022 च्या अंतिम सामन्यात राजस्थान रॉयल्सला पराभूत केलं होतं. त्यानंतर, हे दोन्ही संघ पुन्हा एकदा 29 मे रोजी एकमेकांसमोर उभे ठाकतील.

पराभवाचा बदला घेण्यासाठी राजस्थान मैदानात : जर राजस्थान रॉयल्सनं आयपीएल 2026 चा दुसरा क्वालिफायर जिंकला, तर त्यामुळं त्यांचे अंतिम सामन्यातील स्थान तर निश्चित होईलच, शिवाय 29 मे रोजी झालेल्या आयपीएलच्या अंतिम सामन्यात गुजरात टायटन्सकडून झालेल्या पराभवाचा बदलाही घेतला जाईल. आयपीएल प्लेऑफमध्ये राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यातील ही तिसरी लढत असेल. यापूर्वी आयपीएल 2022 मध्ये हे दोन संघ आमनेसामने आले होते, ज्यात गुजरातनं क्वालिफायर-1 मध्ये राजस्थानला आणि नंतर अंतिम सामन्यातही पराभूत केलं होतं.

वैभवच्या फलंदाजीवर सामन्याचा निकाल अवलंबून : आयपीएल 2026 चा दुसरा क्वालिफायर सामना हा राजस्थान रॉयल्ससाठी गुजरात टायटन्ससोबत हिशोब चुकता करण्याचा सामना बनला आहे. या महत्त्वपूर्ण सामन्यात वैभव सूर्यवंशी पुन्हा एकदा मोठी भूमिका बजावू शकतो. याचं कारण म्हणजे हा सामना त्याच मैदानावर खेळला जात आहे जिथं एलिमिनेटर सामना झाला होता, ज्यात वैभवच्या बॅटच्या वादळानं सनरायझर्स हैदराबादच्या आशा धुळीस मिळवल्या होत्या. वैभव केवळ पूर्ण फॉर्मातच नाही, तर आयपीएल 2026 मध्ये आतापर्यंत सर्वाधिक धावा आणि सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाजही आहे. त्यामुळं, आजच्या सामन्यात जर त्याची बॅट तळपली, तर यात शंका नाही की राजस्थान रॉयल्स चार वर्षांपूर्वी झालेल्या पराभवाचा नक्कीच बदला घेईल.

दोन्ही संघांचा हेड टू हेड रेकॉर्ड कसा : आयपीएलमध्ये दोन्ही संघांच्या हेड टू हेड रेकॉर्डबद्दल बोलायचं झाल्यास, आतापर्यंत दोन्ही संघांमध्ये झालेल्या 10 सामन्यांमध्ये गुजरात टायटन्सनं राजस्थान रॉयल्सवर 7-3 अशी आघाडी घेतली आहे. मात्र, आयपीएल 2025 पासून खेळल्या गेलेल्या चार सामन्यांमध्ये दोन्ही संघांची कामगिरी 2-2 अशी बरोबरीत आहे. राजस्थान रॉयल्सनं न्यू चंदीगड येथील महाराजा यादवेंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळलेले सर्व सामने जिंकले आहेत. त्यांनी इथं चार सामने खेळले असून, ते सर्व जिंकले आहेत. तर दुसरीकडे, गुजरात टायटन्सनं या मैदानावर खेळलेल्या तीन सामन्यांपैकी एक जिंकला असून, दोन गमावले आहेत.

नाणेफेक ठरणार निर्णायक : न्यू चंदीगडचं मैदान प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघांसाठी एक चांगलं मैदान राहिलं आहे. आयपीएल 2026 मध्ये या मैदानावर खेळल्या गेलेल्या सात सामन्यांपैकी सहा वेळा प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघानं विजय मिळवला आहे. त्यामुळं, नाणेफेक हा एक महत्त्वाचा घटक ठरेल. मैदानाचा इतिहास पाहता, क्वालिफायर 2 मध्ये नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो.

हेही वाचा :

  1. French Open 2026 मध्ये सर्वात मोठा अपसेट! जगात अव्वल असलेल्या यानिक सिनरचा पराभव; तीव्र उष्णता ठरली कारण
  2. T20 विश्वचषकापूर्वी टीम इंडियाचा धमाका; इंग्रजांचा घरच्या मैदानावर दारुण पराभव
  3. क्वालिफायर-2 न खेळता अंतिम फेरीत पोहोचणार गुजरात? 'या' समीकरणानं उडवली राजस्थानची झोप