दुसऱ्या कसोटीत पाकिस्तानचं पुनरागमन; बाबर आझम 4 वर्षांनी शतकाच्या उंबरठ्यावर
वेस्ट इंडिज क्रिकेट संघाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत पाकिस्ताननं जोरदार पुनरागमन केलं आहे. पहिल्या डावातील धावसंख्येच्या तुलनेत पाकिस्तान आता वेस्ट इंडिजपेक्षा केवळ 78 धावांनी मागे आहे.

Published : August 4, 2026 at 12:58 PM IST
पोर्ट ऑफ स्पेन WI vs PAK 2nd Test : वेस्ट इंडिज क्रिकेट संघाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत पाकिस्ताननं जोरदार पुनरागमन केलं आहे. अब्दुल्ला शफीकचं नाबाद शतक आणि बाबर आझमच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर, दुसऱ्या दिवसाचा खेळ संपताना संघानं 2 बाद 266 धावा केल्या. पहिल्या डावातील धावसंख्येच्या तुलनेत पाकिस्तान आता वेस्ट इंडिजपेक्षा केवळ 78 धावांनी मागे आहे. शफीक आणि बाबर आझम यांनी तिसऱ्या विकेटसाठी नाबाद 168 धावांची भागीदारी केली.
Babar Azam is closing in on his first Test century in almost four years as Pakistan showed plenty of fight on the second day of their #WTC27 contest with the West Indies 💥https://t.co/2w7nEbNG4r
— ICC (@ICC) August 4, 2026
दोन वर्षांनंतर शफीकचं कसोटीत शतक : अब्दुल्ला शफीकनं आपलं सहावं कसोटी शतक झळकावलं, जे 2024 नंतरचं त्याचं पहिलं शतक आहे. जोमेल वॉरिकनच्या एका आखूड चेंडूवर मिडविकेटच्या दिशेनं चौकार मारुन शतक पूर्ण करण्यापूर्वी तो बराच वेळ 99 धावांवर खेळत होता. यापूर्वी त्यानं केमार रोचच्या गोलंदाजीवर चौकार मारुन आपलं अर्धशतक पूर्ण केलं होतं.
चार वर्षांनंतर बाबर कसोटी शतकाच्या जवळ : बाबर आझम 86 धावांवर नाबाद राहिला, तो आपल्या शतकापासून केवळ 14 धावा दूर आहे. जर त्यानं तिसऱ्या दिवशी शतक पूर्ण केलं, तर चार वर्षांतील हे त्याचं पहिलं कसोटी शतक असेल. त्यानं सुरुवातीला जेडन सील्सच्या एका षटकात तीन चौकार मारले आणि नंतर संयमानं फलंदाजी करत शफीकसोबत मोठी भागीदारी रचली.
STUMPS | DAY 2️⃣🏏
— Windies Cricket (@windiescricket) August 3, 2026
Plenty cricket still to be played, the Men in Maroon will be aiming for early breakthroughs on Day 3️⃣.🌴💥#WIvPAK #WIOutside pic.twitter.com/12lE2PXc2A
अझान ओवैसनं पाकिस्तानला दिली आक्रमक सुरुवात : तरुण फलंदाज अझान ओवैसनं पाकिस्तानला आक्रमक सुरुवात करुन दिली. त्यानं दुसऱ्या षटकात केमार रोचच्या गोलंदाजीवर सलग तीन चौकार मारुन वेस्ट इंडिजला लवकर फिरकी गोलंदाज आणण्यास भाग पाडलं. मात्र, शमर जोसेफच्या 150 किमी/तास वेगाच्या चेंडूवर इमाम-उल-हक स्लिपमध्ये झेलबाद झाला. ओवैसनं आपलं अर्धशतक पूर्ण केलं, पण नंतर जोमेल वॉरिकननं त्याला पायचीत (LBW) घोषित केलं.
वेस्ट इंडिजच्या पहिल्या डावात 344 धावा : यापूर्वी, वेस्ट इंडिजचा पहिला डाव 344 धावांवर संपला. जस्टिन ग्रीव्हज आणि रॉस्टन चेस यांनी अर्धशतकं झळकावली. पाकिस्तानसाठी अली उस्माननं पहिल्याच चेंडूवर ग्रीव्हजला बाद केलं. उबैद शाहनं चेसला बाद केले, तर साजिद खाननं शमर जोसेफला बाद करुन डाव संपवला.
हेही वाचा :

