वानखेडे स्टेडियमवर आणखी एका दिग्गजाच्या नावानं स्टँड; तीन गेट्सना खेळाडूंची नावं
मुंबईच्या ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमबद्दल एक मोठी बातमी आली आहे. MCA नं 27 फेब्रुवारी रोजी झालेल्या त्यांच्या अॅपेक्स कौन्सिलच्या बैठकीत एक महत्त्वाचा निर्णय घेतला

Published : February 28, 2026 at 12:42 PM IST
मुंबई Wankhede Sstadium : मुंबईच्या ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमबद्दल एक मोठी बातमी आली आहे. आता, जेव्हा जेव्हा क्रिकेट चाहते वानखेडे स्टेडियममध्ये प्रवेश करतील तेव्हा त्यांना भारतीय क्रिकेटच्या दिग्गजांचा वारसा आणखी जवळून जाणवेल. मुंबई क्रिकेट असोसिएशन (MCA) नं 27 फेब्रुवारी रोजी झालेल्या त्यांच्या अॅपेक्स कौन्सिलच्या बैठकीत एक महत्त्वाचा निर्णय घेतला, स्टेडियमच्या प्रेस बॉक्सच्या खाली असलेल्या लेव्हल 1 स्टँडला माजी भारतीय अष्टपैलू आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांचं नाव दिलं आहे.
काय म्हणाले MCA चे अध्यक्ष : एमसीएचे अध्यक्ष अजिंक्य नाईक यांनी एक निवेदन जारी करुन सांगितलं की, मुंबई क्रिकेट आपल्या दिग्गजांनी घातलेल्या मजबूत पायावर उभं आहे. त्यांनी पुढं म्हटले की, ज्यांनी शहर आणि देशाला गौरव मिळवून दिला आहे त्यांचा सन्मान करणं ही आपली जबाबदारी आहे. प्रेस बॉक्सच्या खाली असलेल्या लेव्हल 1 स्टँडला रवी शास्त्री यांचं नाव देण्याचा प्रस्ताव हा खेळाडू, नेता आणि प्रशिक्षक म्हणून त्यांच्या प्रचंड योगदानाला श्रद्धांजली आहे.
टीम इंडियासाठी 200 हून अधिक सामने खेळले : रवी शास्त्री यांनी मुंबईसाठी देशांतर्गत क्रिकेट खेळल्यानंतर भारतासाठी 80 कसोटी आणि 150 वनडे सामने खेळले. 2017 ते 2021 पर्यंत त्यांनी भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणूनही काम पाहिलं. त्यांच्या कार्यकाळात भारत 2019 च्या वनडे विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पोहोचला. शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली भारतानं 2018-19 मध्ये ऑस्ट्रेलियन भूमीवर पहिली कसोटी मालिका जिंकली आणि 2020-21 मध्ये तो ऐतिहासिक विजय पुन्हा मिळवला.
एमसीएनं केली मोठी घोषणा : शास्त्रींव्यतिरिक्त, एमसीएनं स्टेडियमचे तीन गेट दिग्गज खेळाडूंना समर्पित करण्याचा निर्णय घेतला आहे. या गेट्सना दिलीप सरदेसाई, एकनाथ सोलकर आणि डायना एडुलजी यांचं नाव दिलं जाईल. 1971 च्या वेस्ट इंडिज दौऱ्यात 642 धावा करुन भारताच्या ऐतिहासिक कसोटी मालिकेतील विजयात दिलीप सरदेसाई यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. एकनाथ सोलकर शॉर्ट लेगमध्ये उत्कृष्ट झेल घेण्यासाठी प्रसिद्ध होते. डायना एडुलजी भारतीय महिला क्रिकेटमधील एक आघाडीची दिग्गज खेळाडू आहे, त्यांनी 22 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारतीय महिला संघाचं नेतृत्व केलं आहे. अजिंक्य नाईक म्हणाले की, वानखेडे स्टेडियमचे गेट दिलीप सरदेसाई, एकनाथ सोलकर आणि डायना एडुलजी यांना समर्पित करण्याचा उद्देश गौरवशाली वारशाची आठवण करुन देणं आहे.
हेही वाचा :

