ETV Bharat / sports

विराटच्या नाववर सुपर संडे! 'धुरंधरां'चे विक्रम इतिहासजमा

न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात विराट कोहलीनं इतिहास रचला. त्यानं फक्त 25 धावा करुन सचिन तेंडुलकरचा विश्वविक्रम मोडला.

Virat Kohli Record
विराट कोहली (AP Photo)
author img

By ETV Bharat Sports Team

Published : January 11, 2026 at 7:57 PM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

वडोदरा Virat Kohli Record : भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीनं वडोदरा इथं न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात एक मोठा विक्रम रचला. रोहित शर्मा 26 धावांवर बाद झाल्यानंतर, कोहलीनं 25वी धाव काढताच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 28,000 धावा पूर्ण केल्या. हा टप्पा गाठणारा तो जगातील फक्त तिसरा फलंदाज आहे. यापूर्वी, महान फलंदाज सचिन तेंडुलकर आणि श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार संगकारानं ही कामगिरी केली होती.

वेगवान 28000 धावा : विराट कोहली आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 28,000 धावा पूर्ण करणारा सर्वात जलद फलंदाज बनला आहे. त्यानं सचिन तेंडुलकरचा दीर्घकाळचा विश्वविक्रम मोडला. सचिन तेंडुलकरनं 644 डावांमध्ये 28,000 धावा पूर्ण केल्या होत्या, तर कुमार संगकारानं 666 डावांमध्ये ही कामगिरी केली होती. विराटनं त्याच्या 624व्या डावात हा टप्पा गाठला.

28000 धावा करणारे सर्वात जलद फलंदाज :

  • विराट कोहली - 624 डाव
  • सचिन तेंडुलकर - 644 डाव
  • कुमार संगकारा - 666 डाव

कुमार संगकाराला टाकलं मागे : यानंतर काही काळातच विराट कोहलीनं कुमार संगकाराचा आणखी एक विक्रम मोडला. खरं तर, त्याच्या डावात जलद 42 धावा करुन तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आणि कुमार संगकाराला मागे टाकलं. विराटच्या तिन्ही स्वरुपात एकूण 28,017 हून अधिक धावा आहेत. कुमार संगकारानं तिन्ही स्वरुपात एकूण 28,016 धावा केल्या होत्या. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विश्वविक्रम भारताचा महान सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. सचिननं 664 सामन्यांमध्ये 782 डावांमध्ये 48.25 च्या सरासरीनं 34,357 धावा केल्या आहेत. त्यानं त्याच्या शानदार कारकिर्दीत 100 शतकं आणि 164 अर्धशतकं केली आहेत.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज :

  • सचिन तेंडुलकर - 34357 धावा
  • विराट कोहली - 28030* धावा (बातमी लिहेपर्यंत)
  • कुमार संगकारा - 28016 धावा
  • रिकी पॉन्टिंग - 27483 धावा
  • महेला जयवर्धने - 25957 धावा

कसोटी आणि टी-20 मधून निवृत्ती : विराट कोहलीनं कसोटी आणि टी-20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे हे लक्षात घेण्यासारखं आहे. कोहली आता फक्त वनडे क्रिकेट खेळतो. त्याने अलीकडेच दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेत चमकदार कामगिरी केली. आता, न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतील तिन्ही सामन्यांमध्ये त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा आहे. गेल्या सात लिस्ट-ए सामन्यांमध्ये किंग कोहलीची बॅट आग ओतत आहे. त्याच्या शेवटच्या सात लिस्ट-ए डावांमध्ये त्यानं चार अर्धशतकं आणि तीन शतकं झळकावली आहेत.

हेही वाचा :

  1. दोन सिक्सर अन् षटकारांचा बादशाह बनला रोहित शर्मा बनला; केला अजरामर रेकॉर्ड!
  2. 27 वर्षांनंतर कीवींच्या सलामीवीरांचा भारतीय भूमीवर पराक्रम!
  3. 'दादा'ला मागे टाकत कोहलीचा आणखी एक 'विराट' विक्रम!