'बडे मिया तो बडे मिया, छोटे मिया...'; वैभवनंतर आता धाकट्या भावानं ठोकलं वादळी शतक
वैभव सूर्यवंशीनंतर आता त्याचा धाकटा भाऊ, आशीर्वाद सूर्यवंशी सध्या चांगलाच चर्चेत आहे.

Published : June 13, 2026 at 5:03 PM IST
Vaibhav Suryavanshi Younger Brother : वैभव सूर्यवंशीनंतर आता त्याचा धाकटा भाऊ, आशीर्वाद सूर्यवंशी सध्या चांगलाच चर्चेत आहे. बिहारमधील समस्तीपूर इथं खेळल्या गेलेल्या एका स्थानिक सराव सामन्यात शानदार शतक झळकावून आशीर्वादनं क्रिकेट चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं. क्रिकेट अकादमी ताजपूरकडून खेळताना, आशीर्वाद सूर्यवंशीनं 87 चेंडूंमध्ये 103 धावांची धडाकेबाज खेळी केली. त्याच्या या शानदार खेळीत 20 चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. आशीर्वादचा स्ट्राइक रेट 118.39 होता, ज्यावरुन त्याच्या आक्रमक फलंदाजीची कल्पना येते.
काय म्हणाले वडील : आशीर्वादच्या कारकिर्दीतील पहिल्या शतकामुळं वडील संजीव सूर्यवंशी देखील आनंदी होते. त्यांनी सोशल मीडियावर लिहिलं, "आशीर्वाद सूर्यवंशीनं आज एका सराव सामन्यात आपलं पहिलं शतक झळकावलं. मी तुम्हा सर्वांना विनंती करतो की, आशीर्वादवर तुमचं प्रेम आणि आशीर्वाद असंच कायम ठेवा." आशीर्वादचे वडील, संजीव यांनी पुढं स्पष्ट केलं, "पुढील दोन वर्षांत आशीर्वादनं वैभवसारखा एक महान क्रिकेटपटू बनावे, अशी त्यांची इच्छा आहे."

वैभवनंही केला आनंद व्यक्त : आशीर्वादच्या खेळीनंतर, सोशल मीडियावर त्याची मोठ्या प्रमाणावर चर्चा होत आहे. मोठा भाऊ वैभव सूर्यवंशीनंही आपल्या धाकट्या भावाच्या या कामगिरीबद्दल आनंद व्यक्त केला आणि इंस्टाग्राम स्टोरीद्वारे त्याचं अभिनंदन केलं. वैभव सूर्यवंशी स्वतः सध्या भारतीय क्रिकेटमधील एक उदयोन्मुख खेळाडू आहे. आयपीएल 2026 मध्ये त्यानं उत्कृष्ट कामगिरी केली आणि स्पर्धेत सर्वाधिक 776 धावा केल्या. 16 सामन्यांतील त्याच्या या धावांनी त्याला ऑरेंज कॅप मिळवून दिली. या शर्यतीत त्यानं साई सुदर्शन, शुभमन गिल आणि विराट कोहली यांसारख्या मोठ्या फलंदाजांना मागे टाकलं.

वैभवला मिळालं मेहनतीचं फळ : एका शानदार आयपीएल हंगामानंतर, वैभवनं 6 जून रोजी पहिल्यांदाच भारतीय संघात स्थान मिळवलं. त्याच्या निवडीची घोषणा होताच, बिहारमधील समस्तीपूर जिल्ह्यातील ताजपूर गावात जल्लोष करण्यात आला. गावकरी, नातेवाईक आणि शेजारी यांनी त्याच्या घरी येऊन मिठाई वाटली आणि फटाके फोडून आपला आनंद व्यक्त केला. वैभवचे वडील, संजीव सूर्यवंशी यांनी आपल्या मुलाच्या निवडीबद्दल आनंद व्यक्त करत सांगितलं की, संपूर्ण कुटुंब बऱ्याच काळापासून या क्षणाची वाट पाहत होते. त्यांनी स्पष्ट केलं की, वैभवनं लहानपणापासून भारतासाठी खेळण्याचं स्वप्न पाहिलं होतं आणि आता त्याच्या मेहनतीचं फळ मिळालं आहे.
हेही वाचा :

