'हैदराबाद ई चॅम्पियन्स'चा 'अन्विता खम्मम एसेस'वर शानदार विजय
'हैदराबाद ई चॅम्पियन्स' विरुद्ध 'अन्विता खम्मम एसेस' यांच्यात साखळी सामना पार पडला.

Published : June 29, 2026 at 10:51 PM IST
हैदराबाद : हैदराबाद क्रिकेट असोसिएशनतर्फे आयोजित 'टीजी20 लीग' (TG20 League) अंतर्गत सोमवारी झालेल्या साखळी सामन्यात, कर्णधार अभिरथ रेड्डीच्या आक्रमक 59 धावांच्या जोरावर 'हैदराबाद ई-चॅम्पियन्स'ने 'अन्विता खम्मम एसेस'विरुद्ध 9 बाद 211 धावांची आव्हानात्मक धावसंख्या उभारली होती.
राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर फलंदाजीची संधी मिळाल्यावर सलामीवीर अभिरथ आणि साई विकास रेड्डी (20 चेंडूंत 22 धावा) यांनी अवघ्या 6.5 षटकांत पहिल्या विकेटसाठी 76 धावांची भागीदारी करत संघाच्या भक्कम धावसंख्येचा पाया रचला.
अभिरथ आणि विकास रेड्डी यांनी 'अन्विता खम्मम एसेस'च्या गोलंदाजीचा समाचार घेत मैदानावर चौफेर फटकेबाजी केली. यात अभिरथने आक्रमक पवित्रा स्वीकारला होता, तर विकासने त्याला उत्तम साथ दिली.
वेद रेड्डीच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत होऊन बाद होणारा अभिरथ हा पहिला फलंदाज ठरला. कर्णधार असलेल्या अभिरथने 26 चेंडूंच्या आपल्या खेळीत पाच चौकार आणि तितकेच षटकार लगावले.
त्यानंतर विकासला अन्वित रेड्डीची (21 चेंडूंत 32 धावा) समर्थ साथ लाभली. त्याने आपली भूमिका चोख बजावली. प्रेक्षकांचे मनोरंजन होत असतानाच मैदानावर चौकार आणि षटकारांचा पाऊस पडत होता.

