ETV Bharat / sports

सलग दुसऱ्या दिवशी 'बेबी एबी'ची 75 धावांची खेळी; अखेर संघानं जिंकला सामना

नामिबियाच्या यजमानपदाखाली सध्या टी-20 त्रिकोणीय मालिका खेळवली जात आहे. यातील दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं झिम्बाब्वेला पराभूत करत पहिला विजय मिळवला.

SA Beat ZIM
सलग दुसऱ्या दिवशी 'बेबी एबी'ची 75 धावांची खेळी (IANS Photo)
author img

By ETV Bharat Sports Team

Published : August 30, 2026 at 10:10 AM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

विंडहोक SA Beat ZIM : नामिबियाच्या यजमानपदाखाली सध्या टी-20 त्रिकोणीय मालिका खेळवली जात आहे. या त्रिकोणीय मालिकेत नामिबिया व्यतिरिक्त दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वेचे क्रिकेट संघ सहभागी झाले आहेत. पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेला पराभूत करुन नामिबियानं सर्वांना आश्चर्यचकित केलं, परंतु आफ्रिकन संघानं पुढच्याच सामन्यात जोरदार पुनरागमन केलं. त्यांनी आपल्या दुसऱ्या सामन्यात झिम्बाब्वेला 7 गडी राखून पराभूत केलं. संघाच्या विजयात डेवाल्ड ब्रेविसनं महत्त्वाची भूमिका बजावली. त्यानं 32 चेंडूंमध्ये नाबाद 75 धावा केल्या आणि सामनावीर पुरस्कार पटकावला.

झिम्बाब्वेचे फलंदाज मोठी खेळी करण्यात अपयशी : झिम्बाब्वेनं चांगली सुरुवात केली, परंतु त्यांचे फलंदाज दक्षिण आफ्रिकेच्या भेदक गोलंदाजीचा सामना करु शकले नाहीत. बेन करननं 12 चेंडूंमध्ये 24 धावा करुन वेगवान सुरुवात करून दिली, पण त्यानंतर विकेट्स पडतच राहिल्या. डियान मायर्स 17 धावांवर बाद झाला, तर ब्रायन बेनेटनं सावध खेळ करत संघासाठी सर्वाधिक 34 धावा केल्या. कर्णधार सिकंदर रझा (10 धावा) आणि रायन बर्ल हे देखील मधल्या फळीत महत्त्वपूर्ण योगदान देण्यात अपयशी ठरले, त्यामुळं 16 व्या षटकापर्यंत झिम्बाब्वेची धावसंख्या 5 गडी बाद 94 झाली होती. शेवटच्या षटकांमध्ये, ताडीवानाशे मारुमानीनं 13 चेंडूंमध्ये तीन षटकारांसह 30 धावांची धडाकेबाज खेळी केली आणि वेस्ली माधेवेरेसोबत 43 धावांची भागीदारी केली. यामुळं झिम्बाब्वेला 20 षटकांत 8 गडी बाद 144 धावांपर्यंत पोहोचण्यास मदत झाली. दक्षिण आफ्रिकेसाठी ड्वेन जेन्सन हा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला, त्यानं 45 धावांत 3 बळी घेतले.

डेवाल्ड ब्रेविसची जबरदस्त खेळी : प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेनं चांगली सुरुवात केली, परंतु पहिल्या सहा षटकांत लुआन-ड्रे प्रिटोरियस (22 धावा) आणि जॉर्डन हर्मन (20 धावा) बाद झाल्यामुळं झिम्बाब्वेला पुनरागमन करण्याची संधी मिळाली. त्यावेळी संघाची धावसंख्या 2 गडी बाद 61 होती. त्यानंतर देवाल्ड ब्रेविसनं आक्रमक फलंदाजी करत संघाचा विजय जवळपास निश्चित केला. त्यानं केवळ 32 चेंडूंमध्ये सहा षटकार आणि सात चौकार मारुन सामन्याचं चित्र पूर्णपणे पालटून टाकलं. टोनी डी झोर्झीनं ब्रेविससोबत तिसऱ्या विकेटसाठी 46 धावांची भागीदारी केली, पण तो यष्टीमागे झेलबाद झाला. असं असूनही, ब्रेविसनं चिकाटी दाखवली आणि रुबिन हरमन (11 नाबाद) सोबत मिळून दक्षिण आफ्रिकेला 73 चेंडू शिल्लक असताना सहज विजय मिळवून दिला. या विजयासह दक्षिण आफ्रिकेनं त्रिकोणीय मालिकेत आपलं विजयाचं खातं उघडलं. या त्रिकोणीय मालिकेतील पुढील सामना नामिबिया आणि झिम्बाब्वे यांच्यात खेळला जाईल.

हेही वाचा :

  1. Age Is Just A Number! 49व्या वर्षात पदार्पण, 51व्या वर्षी घेतल्या 5 विकेट; 94 वर्षे जुना विक्रम इतिहासजमा
  2. पाकिस्तानची लाजिरवाण्या पराभवाकडे वाटचाल; लॉर्ड्स कसोटीत इंग्रजांची भक्कम आघाडी
  3. 120 चेंडूंच्या सामन्यात 73 चेंडू शिल्लक ठेवत मिळवला विजय! प्रतिस्पर्धी संघाचा एकतर्फा उडवला धुव्वा