ETV Bharat / sports

सिकंदर रझानं रोहित शर्माचा मोठा विक्रम मोडला; टी-20 विश्वचषकात रचला नवा इतिहास

झिम्बाब्वेचा कर्णधार सिकंदर रझानं 2026 च्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात शानदार कामगिरी केली.

Sikandar Raza
सिकंदर रझा (IANS Photo)
author img

By ETV Bharat Sports Team

Published : February 20, 2026 at 9:58 AM IST

1 Min Read
Choose ETV Bharat

कोलंबो Sikandar Raza : झिम्बाब्वेचा कर्णधार सिकंदर रझानं 2026 च्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात शानदार कामगिरी केली. त्यानं 26 चेंडूत 45 धावांची तुफानी खेळी केली, ज्यामध्ये दोन चौकार आणि चार षटकार मारले. या उत्कृष्ट कामगिरीसाठी त्याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. सामनावीराचा पुरस्कार जिंकून सिकंदर रझानं टीम इंडियाचा दिग्गज खेळाडू रोहित शर्माचा एक मोठा विक्रम मोडला.

कर्णधार म्हणून सिकंदर रझानं केला मोठा विक्रम : वास्तविक झिम्बाब्वेचा कर्णधार सिकंदर रझानं 39 वर्षे 301 दिवसांच्या वयात श्रीलंकेविरुद्ध सामनावीराचा पुरस्कार जिंकला. यासह, तो आयसीसी स्पर्धेत सामनावीराचा पुरस्कार जिंकणारा सर्वात वयस्कर कर्णधार बनला आहे. त्यानं 39 वर्षे 301 दिवसांच्या वयात ही कामगिरी केली. याबाबतीत त्यानं रोहित शर्माला मागे टाकलं, ज्यानं चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये 37 वर्षे 331 दिवसांच्या वयात ही कामगिरी केली. दरम्यान, सिकंदर रझा टी-20 विश्वचषकात कर्णधार म्हणून सामनावीर पुरस्कार जिंकणारा सर्वात वयस्कर खेळाडू ठरला आहे.

सिकंदर रझानं शोएब मलिकलाही टाकलं मागे : सिकंदर रझा टी-20 विश्वचषकात सामनावीराचा पुरस्कार जिंकणारा दुसरा सर्वात वयस्कर खेळाडूही ठरला आहे. या बाबतीत त्यानं माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिकला मागे टाकलं. आता या यादीत त्याच्या पुढं फक्त सनथ जयसूर्या आहे. जयसूर्यानं 39 वर्षे 345 दिवसांच्या वयात ही कामगिरी केली. शोएब मलिकनं 39 वर्षे 279 दिवसांच्या वयात टी-20 विश्वचषकात सामनावीराचा पुरस्कार जिंकला.

झिम्बाब्वेनं शेवटच्या षटकात गाठलं मोठं लक्ष्य : श्रीलंका आणि झिम्बाब्वे यांच्यात झालेल्या सामन्यात श्रीलंकेनं प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 7 गडी गमावून 178 धावा केल्या. श्रीलंकेकडून पथुम निस्सांकानं शानदार अर्धशतक झळकावलं, त्यानं 41 चेंडूत 62 धावा केल्या. ब्रायन बेनेटच्या अर्धशतकाच्या आणि रायन बर्ल आणि सिकंदर रझाच्या स्फोटक खेळीच्या जोरावर झिम्बाब्वेनं हे लक्ष्य सहज गाठलं. बेनेटनं 48 चेंडूत 63 धावा केल्या, तर बर्लनं 12 चेंडूत 23 धावा केल्या.

हेही वाचा :

  1. टी-20 विश्वचषकात अफगाणिस्तानची 'हॅपी एंडिंग'; शेवटच्या सामन्यानंतर रशीद खान भावुक
  2. निर्णायक सामन्यात ऑस्ट्रेलियाचा विजय; T20 मालिकेत बरोबरी
  3. कांगारुविरुद्ध मैदानात पाऊल ठेवताच हरमनप्रीत कौरनं केला विश्वविक्रम; न्यूझीलंडच्या खेळाडूला टाकलं मागे