खास बातचीत! चांगली कामगिरी करूनही टीम इंडियातून वगळलं; सरफराज खाननं काय सांगितलं?
"मैदान कोणतंही असो मी नेहमीच माझं सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करतो, बाकी गोष्टींचा विचार करत नाही", मुंबई टी-20 स्पर्धेनिमित्त सरफराज खानसोबत खास बातचीत.

Published : May 29, 2026 at 8:22 PM IST
मुंबई : वेळ कुणासाठी थांबत नाही, आणि कुणाला चुकतही नाही, याची प्रचिती सध्या भारतीय क्रिकेटमध्ये पाहायला मिळत आहे. भारताला टी-20 विश्वचषक जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या सूर्यकुमार यादव याला संघात स्थान मिळणार की नाही? याबाबत आता निवड समितीमध्ये चर्चा सुरू असल्याचं समोर येत आहे.
कसोटी संघाचा उपकर्णधार असलेल्या ऋषभ पंत यालाही आपलं पद गमवावं लागलं असून, वनडे संघातही त्याला स्थान मिळालेलं नाही. आयपीएलनंतर भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात एक कसोटी आणि तीन वनडे सामन्यांची मालिका होणार आहे. मात्र या मालिकेसाठी मुंबईच्या भरवशाच्या फलंदाजाचा विचार झालेला नाही. मधल्या फळीतील फलंदाज सरफराज खान याच्याकडे निवड समितीनं दुर्लक्ष केल्याचं बोललं जात असून, त्याच्या निवडीबाबत क्रिकेट वर्तुळात प्रश्न उपस्थित केलं जात आहेत.
सरफराज गेली दोन वर्ष टीम इंडियातून बाहेर : सरफराज खान गेल्या दोन वर्षांपासून टीम इंडियातून बाहेर असून, दमदार कामगिरी करूनही त्याला पुनरागमनाची संधी मिळालेली नाही. रोहित शर्मा कर्णधार असताना सरफराजला कसोटी संघात स्थान मिळालं होतं. मात्र त्यानंतर तो संघाबाहेर गेला आणि आजपर्यंत त्याचं कमबॅक झालेलं नाही. नोव्हेंबर 2024 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध सरफराजनं शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. त्यानंतर सातत्यपूर्ण कामगिरी करुनही निवड समितीकडून त्याच्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याची चर्चा क्रिकेट वर्तुळात सुरू आहे.
फॉर्म असूनही सरफराजला संधी मिळाली नाही : सरफराजनं आतापर्यंत 6 कसोटी सामन्यांमध्ये 37.10 च्या सरासरीने 371 धावा केल्या आहेत. यामध्ये एक शतक आणि 3 अर्धशतकांचा समावेश आहे. बंगळुरू कसोटीत त्याने 150 धावांची शानदार खेळी करत आपली गुणवत्ता सिद्ध केली होती.
देशांतर्गत क्रिकेटमध्येही सरफराज सातत्यानं चांगली कामगिरी करत आहे. मात्र उत्कृष्ट फॉर्म असूनही त्याला टीम इंडियामध्ये संधी मिळालेली नाही. सरफराजला यंदाच्या आयपीएलमध्येही पुनरागमनासाठी संघर्ष करावा लागला. 2023 चा मोसम खेळल्यानंतर तो पुढील दोन वर्षे आयपीएलमधून बाहेर होता. त्याला संघात घेण्यासाठी कोणत्याही फ्रँचायझीकडून विशेष रस दाखवण्यात आला नव्हता.
IPL मध्ये आधी अनसोल्ड, नंतर सीएसकेनं दाखवला विश्वास : आयपीएल 2026 च्या लिलावात सरफराज सुरुवातीला अनसोल्ड राहिला होता. मात्र दुसऱ्या फेरीत चेन्नई सुपर किंग्जनं त्याला 75 लाखांच्या बेस प्राईसमध्ये आपल्या ताफ्यात घेतलं. यापूर्वी सरफराजनं 2015 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून आयपीएलमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर 2016 आणि 2018 मध्येही तो आरसीबीकडून खेळला. 2019 मध्ये पंजाब किंग्जनं त्याला करारबद्ध केलं. दोन मोसम या फ्रँचायझीकडून खेळल्यानंतर 2022 च्या लिलावात दिल्ली कॅपिटल्सनं त्याला आपल्या संघात घेतलं. दिल्लीकडूनही त्यानं दोन मोसम खेळले.
सरफराजची IPL मधील कामगिरी : आयपीएलमधील कामगिरीबद्दल बोलायचं झाल्यास, सरफराजनं 58 सामन्यांत 746 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या नावावर केवळ 2 अर्धशतकं आहेत. त्याची सर्वोच्च धावसंख्या 67 आहे.
सरफराजला चुणूक दाखवण्याची संधी : आता मुंबई टी-20 लीग ही सरफराजसाठी टीम इंडियात पुनरागमनाची महत्त्वाची संधी मानली जात आहे. मागील मोसमात त्याला इथंही विशेष चमक दाखवता आली नव्हती. यंदा त्याच्यावर आकाश टायगर्स संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारीही सोपवण्यात आली आहे. त्यामुळे फलंदाज आणि कर्णधार अशा दुहेरी भूमिकेत त्याला स्वतःला सिद्ध करावं लागणार आहे. मुंबई टी-20 लीगमध्ये सरफराजच्या संघाचा पहिला सामना सोमवारी गतविजेत्या एमएससी मराठा रॉयल्सविरुद्ध होणार आहे.

