"आमच्यासाठी आशा ताई म्हणजे..."; सुर समाज्ञी आशा भोसलेंच्या निधनानंतर 'क्रिकेटच्या देवा'ची भावनिक पोस्ट
सुमधुर संगीताची राणी, महान गायिका आशा भोसले यांचं निधन झालं. आशा भोसले यांच्या निधनानंतर सचिननं एक भावनिक पोस्ट शेअर करत दुःख व्यक्त केलं आहे.

Published : April 12, 2026 at 5:32 PM IST
मुंबई Sachin Tendulkar on Asha Bhosle : सुमधुर संगीताची राणी, महान गायिका आशा भोसले यांचं रविवारी (12 एप्रिल) वयाच्या 92व्या वर्षी निधन झालं. त्यांचं निधन केवळ भारतासाठीच नव्हे, तर संपूर्ण संगीत जगतासाठी एक मोठी हानी आहे. आपल्या मधुर आवाजासाठी प्रसिद्ध असलेल्या आशा भोसले यांना क्रिकेटचीही प्रचंड आवड होती. क्रिकेटचा देव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरसोबत त्यांचं एक अनमोल नातं होतं. विशेष म्हणजे, आशा सचिनला आपल्या मुलाप्रमाणे मानत असत. त्या तेंडुलकरचा खूप आदर करत असत आणि सचिन तेंडुलकरही आशा भोसले यांचा खूप आदर करत असे. आशा भोसले आणि तेंडुलकर यांची भेट 2023 मध्ये झाली होती. आता आशा भोसले यांच्या निधनानंतर सचिननं एक भावनिक पोस्ट शेअर करत दुःख व्यक्त केलं आहे.
सचिनची भावनिक पोस्ट : आशा भोसलेंच्या निधनानंतर सचिननं लिहिलं, "भारतासाठी आणि जगभरातील संगीतप्रेमींसाठी आजचा दिवस अत्यंत दुःखद आहे. आमच्यासाठी आशा ताई म्हणजे कुटुंबाचाच एक भाग होत्या. आज आपण अनुभवत असलेल्या या दुःखासाठी शब्दही अपुरे वाटत आहेत. एका क्षणी मन अगदी शांत होतं, आणि दुसऱ्याच क्षणी त्यांनी आपल्याला दिलेल्या असंख्य सुरेल गाण्यांच्या आठवणींत ते हरवून जातं. जणू काळही काही क्षणांसाठी थांबून गेला आहे, असं वाटतं. पण त्यांच्या अमर गीतांमधून त्या कायम आपल्या सोबत राहतील." सचिन अखेरीस आशाताईंचे आभार मानत म्हणाला, "धन्यवाद ताई, आममचं आयुष्य तुमच्या प्रेमळपणाने, आणि अविस्मरणीय संगीतानं भरुन टाकल्याबद्दल. आशा ताई, तुमची खूप आठवण येईल."
A deeply sad day for India, and for music lovers across the world.
— Sachin Tendulkar (@sachin_rt) April 12, 2026
For us, Asha Tai was family. Today, words feel too small for the loss we feel. One moment the heart falls silent, and the next, it drifts through the countless melodies she gifted all of us.
It feels as…
एका युगाचा अंत : आशा भोसले या भारतीय संगीतातील सर्वात अष्टपैलू गायकांपैकी एक मानल्या जातात. त्यांनी रोमँटिक ते गझल, पॉप, शास्त्रीय अशा प्रत्येक संगीत प्रकारात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. त्यांचं नाव, त्यांच्या भगिनी लता मंगेशकर यांच्या नावाबरोबरच, संगीत इतिहासात सुवर्ण अक्षरांनी कोरलं गेलं आहे. त्यांनी मिळून भारतीय संगीताला नव्या उंचीवर नेले. आशा भोसले यांच्या कारकिर्दीत अनेक सुपरहिट गाणी होती, पण 'उमराव जान' चित्रपटातील गाणी आजही त्यांच्या ओळखीचा एक अविभाज्य भाग आहेत. त्यांच्या आवाजातील गोडवा आणि भावनिक खोलीनं या गाण्यांना अजरामर केलं आहे.
गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड तयार केला : आशा भोसले यांच्या नावावर अनेक विक्रम आहेत. त्यांच्या प्रतिभेच्या जोरावर, ग्रॅमी पुरस्कारासाठी नामांकन मिळवणारी त्या पहिल्या भारतीय महिला गायिका ठरल्या. 2005 मध्ये आशा यांना ग्रॅमी पुरस्कारासाठी नामांकन मिळालं होतं. इतकंच नाही, तर गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्येही त्यांची नोंद आहे. 2011 मध्ये, सर्वाधिक स्टुडिओ रेकॉर्डिंग केल्याबद्दल गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये त्यांची नोंद झाली. त्यांनी 20 हून अधिक भारतीय भाषांमध्ये 12,000 हून अधिक गाणी गायली आहेत, ज्यामुळं त्यांना हा प्रतिष्ठित किताब मिळाला आहे.
हेही वाचा :

