ETV Bharat / sports

शतक ठोकल्यानंतरही BCCI नं वनडे संघातून वगळलं; मराठमोळ्या ऋतुराजनं विक्रमी शतक झळकावून दिलं उत्तर

विजय हजारे ट्रॉफी 2025-26 मध्ये गोवा विरुद्धच्या एलिट ग्रुप सामन्यात गायकवाडनं महाराष्ट्रासाठी कर्णधारपदाला साजेशी खेळी करत विक्रमी शतक झळकावलं.

Ruturaj Gaikwad
ऋतुराज गायकवाड (IANS Photo)
author img

By ETV Bharat Sports Team

Published : January 8, 2026 at 3:16 PM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

जयपूर Ruturaj Gaikwad : न्यूझीलंडविरुद्धच्या टीम इंडियाच्या वनडे मालिकेतून ऋतुराज गायकवाडला वगळल्यानं सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. गायकवाडनं 30 नोव्हेंबर रोजी संपलेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेत त्याचं पहिलं वनडे शतक झळकावलं होतं. तरीही, कर्णधार शुभमन गिल भारतीय संघात परतल्यानंतर त्याला वगळण्यात आलं. गायकवाड त्याच्या वगळण्यावर मौन राहिला आहे, परंतु गुरुवारी, त्याच्या फलंदाजीनं निवडकर्त्यांना उत्तर दिलं. विजय हजारे ट्रॉफी 2025-26 मध्ये गोवा विरुद्धच्या एलिट ग्रुप सामन्यात गायकवाडनं महाराष्ट्रासाठी कर्णधारपदाला साजेशी खेळी केली.

विजय हजारे ट्रॉफीतील 15वं शतक : गोव्याच्या गोलंदाजांसमोर महाराष्ट्राचा अव्वल फलंदाजीचा क्रम कोसळल्यानंतर, गायकवाडच्या एकहाती नाबाद शतकामुळं संघानं 50 षटकांत 7 बाद 249 धावांचा सन्मानजनक धावसंख्या गाठली. गायकवाड 131 चेंडूत 34 धावा काढत अखेर नाबाद परतला, ज्यामध्ये आठ चौकार आणि सहा षटकारांचा समावेश होता. विजय हजारे ट्रॉफीमधील हे त्याचं 15 वं शतक आहे, जे सर्वकालीन विक्रमाशी बरोबरी करते.

पृथ्वी शॉ अपयशी, संघानं गमावल्या 25 धावांत 5 विकेट : गोव्याविरुद्धच्या सामन्यात महाराष्ट्राकडून दमदार कामगिरी अपेक्षित होती, परंतु पृथ्वी शॉ (1 धाव) स्वस्तात बाद झाला. शॉला त्याचा माजी मुंबई संघातील सहकारी अर्जुन तेंडुलकरनं पॅव्हेलियनमध्ये परत पाठवलं. त्यानंतर कौशिक व्ही. नं तीन विकेट घेतल्या आणि महाराष्ट्राचा डाव अडखळला. पाच विकेट फक्त 25 धावांत पडल्या. एका टोकाला ऋतुराज गायकवाड एकटाच उभा होता. त्यानंतर सहावी विकेट 52 धावांत पडली. डाव कोसळत असल्याचं दिसत होतं, परंतु ऋतुराजला विकी ओस्तवालची साथ मिळाली. ओस्तवालनं दमदार फलंदाजी केली आणि 82 चेंडूत दोन चौकार आणि दोन षटकारांसह 53 धावा केल्या. दोघांनी सातव्या विकेटसाठी 106 धावा जोडल्या.

ऋतुराजची जबरदस्त खेळी : महाराष्ट्राचा कर्णधार ऋतुराजनं जबरदस्त खेळी केली. त्यानं केवळ एका टोकाला आपली पकड टिकवून ठेवली नाही तर धावसंख्याही हलवत ठेवली. त्यानं सर्व गोलंदाजांविरुद्ध मैदानाच्या प्रत्येक कोपऱ्यात फटके मारले. गोव्याच्या गोलंदाजांनी त्याला बाद करण्यासाठी सर्व युक्त्या वापरुन पाहिल्या, पण त्यापैकी एकही यशस्वी झाली नाही. ऋतुराजनं हंगामातील दुसरे आणि विजय हजारे ट्रॉफीमध्ये एकूण 15 वं शतक पूर्ण केले. ऋतुराज 131 चेंडूत 134 धावा काढून अखेर नाबाद परतला.

अंकित बावणेच्या सर्वकालीन विक्रमाशी बरोबरी : या खेळीसह, ऋतुराजनं अंकित बावणेच्या सर्वकालीन विजय हजारे ट्रॉफी विक्रमाशी बरोबरी केली. गायकवाडनं विजय हजारे ट्रॉफीमध्ये त्याचं 15वं शतक झळकावलं. यासह, त्यानं ट्रॉफीमध्ये सर्वाधिक शतकं ठोकणाऱ्यांच्या यादीत बावणेची बरोबरी केली. बावणेनं 94 डावांमध्ये 15 शतकं झळकावली आहेत, तर ऋतुराजनं त्याच्या 59 व्या डावातच 15 वं शतक झळकावले. त्याच्या पाठोपाठ कर्नाटकचा देवदत्त पडिक्कल आहे, ज्यानं फक्त 35 डावांमध्ये 14 शतकं झळकावली आहेत. पडिक्कलनंही या हंगामात अनेक शतकं झळकावली आहेत.

लिस्ट-ए क्रिकेटमध्ये सर्वात जलद 20वं शतक : 28 वर्षीय ऋतुराज गायकवाडच्या नावावर लिस्ट-ए क्रिकेटमध्ये एक उल्लेखनीय विक्रम आहे. हे शतक लिस्ट-ए क्रिकेटमधील त्याचं 20 वं शतक आहे, जे फक्त त्याच्या 95 व्या डावात आहे. यासह, तो लिस्ट-ए क्रिकेटमध्ये सर्वात कमी डावात 20 वं शतक करणारा फलंदाज बनला. त्याच्या डावात त्यानं 5000 लिस्ट-ए धावा देखील पूर्ण केल्या. त्यानं 95 व्या डावात हा बेंचमार्क गाठला आणि एक नवीन विक्रम प्रस्थापित केला.

लिस्ट-ए क्रिकेटमध्ये सर्वोत्तम सरासरी : ऋतुराज गायकवाडच्या नावावर आधीच लिस्ट-ए क्रिकेटमध्ये सर्वाधिक फलंदाजी सरासरीचा विक्रम आहे. त्याची लिस्ट-ए सरासरी 58.83 आहे जी कमीत कमी 50 लिस्ट-ए डाव खेळलेल्या इतर कोणत्याही फलंदाजापेक्षा जास्त आहे. त्यानं यासह ऑस्ट्रेलियन दिग्गज मायकेल बेवन यांचा विक्रम मोडला आहे, ज्यांची लिस्ट-ए सरासरी 57.86 होती.

हेही वाचा :

  1. यंदाच्या अ‍ॅशेसमध्ये ऑस्ट्रेलिया-इंग्लंडनं मिळून केला विश्वविक्रम; 'असं' यापूर्वी कधीही झालं नव्हतं
  2. 'आम्ही भारतात टी-20 विश्वचषक खेळू शकत नाही'; राष्ट्रीय प्रतिष्ठेचा दाखला देत बांगलादेशची आडमुठी भूमिका
  3. ऑस्ट्रेलियाच्या विजयानंतर WTC गुणतालिकेत उलथापालथ; टीम इंडियाची स्थिती काय?