ETV Bharat / sports

4 वर्षांनी दोन देश मैदानात भिडणार; पाहुण्या संघात अर्ध्याहून जास्त नवे खेळाडू

पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघात आजपासून तीन सामन्यांची वनडे मालिका सुरु होणार आहे. यातील पहिला सामना आज होईल.

PAK vs AUS 1st ODI
पाहुण्या संघात अर्ध्याहून जास्त नवे खेळाडू (AP Photo)
author img

By ETV Bharat Sports Team

Published : May 30, 2026 at 12:39 PM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

रावळपिंडी PAK vs AUS 1st ODI : पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघात आजपासून तीन सामन्यांची वनडे मालिका सुरु होणार आहे. या वनडे मालिकेतील पहिला सामना आज रावळपिंडी येथील रावळपिंडी क्रिकेट स्टेडियमवर भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी 5:00 वाजता सुरू होईल. या मालिकेत पाकिस्तान मायदेशात पुनरागमन करण्याच्या प्रयत्न करेल. तर दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाचा युवा संघ या दौऱ्याची सुरुवात विजयानं करण्याच्या ईराद्यानं मैदानात उतरेल.

कांगारुंच्या वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती : ऑस्ट्रेलियानं या मालिकेसाठी अनेक वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती दिली आहे. नियमित कर्णधार पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, ट्रॅव्हिस हेड आणि जोश हेझलवूड या दौऱ्याचा भाग नाहीत. तर मिचेल मार्श दुखापतीमुळे संघाबाहेर आहे. परिणामी जोश इंग्लिस संघाचं कर्णधारपद भूषवेल. दरम्यान, बाबर आझम आणि नसीम शाह यांचं पाकिस्तान संघात पुनरागमन झालं आहे. पाकिस्ताननं नुकतंच बांगलादेशविरुद्ध वनडे मालिका गमावली आहे, तर ऑस्ट्रेलियानं आपल्या शेवटच्या वनडे मालिकेत भारताला पराभूत केलं आहे. यामुळं दोन्ही संघांमध्ये एक रोमांचक सामना पाहायला मिळू शकतो.

दोन्ही संघांचा हेड टू हेड रेकॉर्ड कसा : पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आतापर्यंत 112 वनडे सामने खेळले गेले आहेत. या दरम्यान ऑस्ट्रेलियाचं वर्चस्व राहिलं आहे. त्यांनी 71 सामने जिंकले आहेत, तर पाकिस्ताननं 36 सामने जिंकले आहेत. एक सामना बरोबरीत सुटला, तर चार सामन्यांचा निकाल लागला नाही. मात्र, पाकिस्ताननं ऑस्ट्रेलियाविरुद्धची शेवटची वनडे मालिका जिंकली आहे. याशिवाय हे दोन्ही संघ एप्रिल 2022 नंतर पहिल्यांदाच पाकिस्तानच्या भूमीवर वनडे मालिकेत आमनेसामने येत आहे. 4 वर्षांपूर्वी झालेल्या मालिकेत पाकिस्ताननं तीन सामन्यांची मालिका 2-1 नं जिंकली होती.

रावळपिंडीची खेळपट्टी कशी असेल : या मैदानाची खेळपट्टी फलंदाजांसाठी अत्यंत अनुकूल मानली जाते. खेळपट्टी सपाट राहण्याची शक्यता असून चेंडू चांगला उसळेल. सुरुवातीच्या षटकांमध्ये वेगवान गोलंदाजांना काही प्रमाणात मदत मिळू शकते, परंतु सामना जसजसा पुढं जाईल, तसतसं फलंदाज मुक्तपणे धावा करु शकतील. खेळपट्टी सुकल्यावर फिरकी गोलंदाजांनाही मदत मिळण्याची शक्यता आहे. या मैदानावर दुसऱ्या डावात फलंदाजी करणं तुलनेनं सोपं मानलं जातं.

भारतात सामना कसा पाहायचा : पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेचं थेट प्रक्षेपण भारतातील कोणत्याही टीव्ही चॅनल किंवा ओटीटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होणार नाही. मात्र, भारतीय चाहते स्पोर्ट्स टीव्हीच्या अधिकृत यूट्यूब चॅनलवर पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया वनडे मालिकेतील सामन्यांचं थेट प्रक्षेपण पाहू शकतात.

सामन्यासाठी दोन्ही संघ :

  • पाकिस्तान: साहिबजादा फरहान, माज सदाकत, बाबर आजम, सलमान आगा, अब्दुल समद, गाजी गोरी (विकेटकीपर), शादाब खान, शाहीन शाह अफरीदी (कर्णधार), नसीम शाह, हारिस रऊफ, अबरार अहमद, रोहेल नजीर, अहमद दानियाल, अराफात मिन्हास, सुफयान मोकिम आणि शमील हुसेन.
  • ऑस्ट्रेलिया: मॅथ्यू शॉर्ट, जोश इंग्लिस (कर्णधार), मार्नस लाबुशेन, मॅट रेनशॉ, ॲलेक्स कॅरी (विकेटकीपर), कॅमरुन ग्रीन, लियाम स्कॉट, नाथन एलिस, रिले मेरेडिथ, ॲडम झम्पा, बिली स्टॅनलेक, मॅथ्यू कुह्नेमन, तनवीर संघा आणि ऑलिवर पीक.

हेही वाचा :

  1. एकमेव कसोटीत 'ब्लॅक कॅप्स'चा दणदणीत विजय; तीन दिवसांतच जिंकला सामना
  2. WWE SmackDown: क्लॅश इन इटलीपूर्वी थरारक सामन्यात गुंथर आणि कोडी रोड्स आमनेसामने; कोणी मारली बाजी?
  3. French Open 2026: नोव्हाक जोकोविचचं 25वं ग्रँड स्लॅम जिंकण्याचं स्वप्न भंगलं; 19 वर्षीय खेळाडूनं तिसऱ्या राऊंडमध्ये हरवलं