ETV Bharat / sports

'दहीहंडी कॉमनवेल्थ आणि ऑलिम्पिकपर्यंत पोहोचवण्याचं लक्ष्य'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले?

मुंबईत 'प्रो गोविंदा सीझन 4' चा अंतिम सोहळा अत्यंत उत्साहात गुरुवारी पार पडला. या स्पर्धेत अंतिम फेरीतील 16 संघांमध्ये अत्यंत चुरशीची लढत पाहायला मिळाली.

Pro Govinda Season 4
'दहीहंडी कॉमनवेल्थ आणि ऑलिम्पिकपर्यंत पोहोचवण्याचं लक्ष्य' (Eknath Shinde X Account)
author img

By ETV Bharat Sports Team

Published : August 28, 2026 at 11:12 AM IST

1 Min Read
Choose ETV Bharat

मुंबई Pro Govinda Season 4 : मुंबईत 'प्रो गोविंदा सीझन 4' चा अंतिम सोहळा अत्यंत उत्साहात गुरुवारी (27 ऑगस्ट) पार पडला. या स्पर्धेत अंतिम फेरीतील 16 संघांमध्ये अत्यंत चुरशीची लढत पाहायला मिळाली. या स्पर्धेतील विजेत्या संघाला राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, प्रो गोविंदा सीझन 4 चा ब्रँड ॲम्बेसेडर सूर्यकुमार यादव आणि प्रो गोविंदा लीगचे अध्यक्ष पुर्वेश सरनाईक यांच्या हस्ते 75 लाख रुपयांचा धनादेश आणि मानाचा चषक देऊन सन्मानित करण्यात आला. यासोबतच स्पर्धेतील उपविजेत्या म्हणजेच द्वितीय क्रमांकाच्या संघाला 50 लाख रुपये, तर तृतीय क्रमांकाच्या संघाला 25 लाख रुपये याशिवाय उर्वरित सर्व सहभागी संघांना प्रत्येकी 3 लाख रुपयांचं पारितोषिक देण्यात आलं.

हा खेळ कॉमनवेल्थ आणि ऑलिम्पिकपर्यंत पोहोचावा : याप्रसंगी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "दहीहंडी हा खेळ मातीपासून मॅटपर्यंत आणि थेट स्पेनपर्यंत पोहोचला आहे, ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे. हा खेळ पुढं कॉमनवेल्थ आणि ऑलिम्पिक स्पर्धेत घेऊन जाण्यासाठी राज्य सरकार पूर्णपणे पाठीशी उभं राहील." तसंच कबड्डीप्रमाणे इयत्ता 8 वी नंतर शालेय पीटीच्या तासात गोविंदांचा सराव शिकवला जावा यासाठी शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्याशी चर्चा करणार असल्याचं सांगत, हा खेळ सातासमुद्रापार नेण्यासाठी आणि प्रो गोविंदा स्पर्धेच्या पाठीशी आपण सदैव उभं राहू असा शब्दही शिंदेंनी दिला.

सूर्या काय म्हणाला : प्रो गोविंदा सीझन 4 चा ब्रँड ॲम्बेसेडर सूर्यकुमार यादव गोविंदांचं कौतुक करत म्हणाला, "मातीपासून मॅटपर्यंतचा गोविंदांचा प्रवास अतिशय प्रेरणादायी आहे. गोविंदांचं संघ कौशल्य, जिद्द, मेहनत आणि अचूक टायमिंग थक्क करणारं असून थरावर थर रचणं सोपं नाही, त्यामुळं सर्व गोविंदांच्या जिद्दीला आणि समर्पणाला सलाम." तसंच भारतीय संघात पुनरागमन करण्याबाबत सूर्या म्हणाला, "मला पुनरागमन करण्यासाठी शक्य तितकी मेहनत करायची आहे. जर गोष्टी जुळून आल्या, तर सर्व काही व्यवस्थित होईल." सूर्यकुमार यादवच्या या वक्तव्यावरुन हे स्पष्ट होतं की, त्यानं अद्याप आंतरराष्ट्रीय क्रिकेटची आशा सोडलेली नाही आणि त्याला पुन्हा एकदा भारतीय संघाच्या टी-20 संघात आपलं स्थान मिळवायचं आहे.

हेही वाचा :

  1. WTC फायनलमध्ये कशी पोहोचणार टीम इंडिया? उर्वरित 7 सामन्यांत करावं लागणार 'हे' काम
  2. 17 दिवस, 15 सामने, 8 संघ... आजपासून रंगणार आशिया कपचा थरार; कधी होणार भारत-पाकिस्तान युद्ध?
  3. Hockey World Cup: भारताच्या लेकींची कमाल! 52 वर्षांनंतर केलं स्पर्धेतील सर्वोत्तम प्रदर्शन; नवनीतनं केले 2 गोल