IND vs WI: संजु सॅमसनची शामदार खेळी; दमदार विजयासह टीम इंडिया सेमीफायनलमध्ये

Published : March 1, 2026 at 4:55 PM IST
|Updated : March 1, 2026 at 10:33 PM IST
कोलकाता IND vs WI Live : आयसीसी पुरुष टी-20 विश्वचषकातील 52वा तसंच सुपर-8 फेरीतील शेवटचा सामना आज भारत आणि वेस्ट इंडिज क्रिकेट संघात खेळवण्यात आला. कोलकात्यातील ऐतिहासिक ईडन गार्डन्स मैदानावर झालेल्या या सामन्यात सूर्यकुमार यादवनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजनं साघिक कामगिरीच्या बळावर निर्धारित 20 षटकांत 195 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारतीय संघानं संजु सॅमसनच्या शानदार खेळीच्या बळावर 19.2 षटकात 199 धावा करत विजय मिळवला. यासह भारतीय संघ या विश्वचषकाच्या उपांत्य फेरीसाठी पात्र झाला असून आता त्यांचा सामना 5 मार्च रोजी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर इंग्लंडविरुद्ध होणार आहे. विशेष म्हणजे टीम इंडियानं टी-20 विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक धावांचा पाठलाग केला आहे.
LIVE FEED
भारतानं 5 विकेट्सनं जिंकला सामना
टीम इंडियानं 2026 च्या टी-20 विश्वचषकातील शेवटच्या सुपर-8 सामन्यात वेस्ट इंडिजचा 5 विकेट्सनं पराभव करून उपांत्य फेरीत स्थान निश्चित केलं.
तिलक वर्माच्या रुपात चौथी विकेट
भारताच्या विजयाकडे जात असताना तिलक वर्माच्या रुपात संघाला चौथा धक्का बसला. तो 27 धावांवर बाद झाला. त्याला होल्डरनं बाद केलं.
कॅप्टन सूर्या बाद
कॅप्टन सूर्यकुमार यादव बाद झाला. त्यानं 16 चेंडूत 18 धावा काढल्या, त्यात एक चौकार आणि एक षटकार मारला. तो शमार जोसेफच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला.
संजु सॅमसनचं अर्धशतक
या निर्णायक सामन्यात सलामीवीर संजु सॅमसननं 26 चेंडूत आक्रमक अर्धशतक झळकावलं. भारताच्या 10 षटकांत भारताच्या 2 बाद 98 धावा झाल्या आहेत.
भारताच्या 50 धावा पूर्ण
भारतानं सहाव्या षटकात 50 धावा पूर्ण केल्या. आतापर्यंत दोन विकेट पडल्या आहेत. अभिषेक शर्मा आणि इशान किशन बाद झाले आहेत. पॉवरप्ले अखेर भारतानं 53 धावा केल्या आहेत.
भारताची दुसरी विकेट पडली
भिषेक शर्मा पाठोपाठ तिसऱ्या क्रमांकावर आलेला ईशान किशनही स्वस्तात बाद झाला. त्यानं 10 धावा केल्या. जेसन होल्डरनं त्याला बाद केलं.
अभिषेक शर्मा पॅव्हेलियनमध्ये
वेस्ट इंडिजविरुद्ध धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाला पहिला धक्का अभिषेक शर्माच्या रूपात बसला. तो 11 चेंडूत 10 धावा करुन बाद झाला. त्याची विकेट अकील हुसेननं घेतली. 4 षटकांनंतर टीम इंडियाची धावसंख्या एका विकेटच्या मोबदल्यात 37 धावा आहे.
वेस्ट इंडिजनं उभारली आव्हानात्मक धावसंख्या
सामन्यात प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकांत 4 बाद 195 धावा केल्या. आता भारताला सामना जिंकत सेमीफयनलमध्ये जाण्यासाठी 196 धावांची गरज आहे.
पाचव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी
वेस्ट इंडिजची 119 धावांवर चौथी विकेट गेल्यानंतर जेसन होल्डर आणि रोवमन पॉवेल यांच्यात पाचव्या विकेटसाठी 22 चेंडूत अर्धशतकी भागीदारी झाली आहे. संघाची नजर 200 धावांवर असेल.
अर्शदीपच्या षटकात 24 धावा
अर्शदीपनं टाकलेल्या 16व्या षटकात कॅरोबियन फलंदाजांनी 24 धावा वसूल केल्या. या षटकात 2 षटकार आणि एक चौकार मारला.
हार्दिकनंही घेतली विकेट
दमदार सुरुवातीनंतर वेस्ट इंडिजचा डाव डळमळीत होताना दिसत आहे. त्यांना लागोपाठ चौथा धक्का बसला. 15व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर हार्दिकनं रुदरफोर्डला 14 धावांवर बाद केलं.
वेस्ट इंडिजची तिसरी विकेट
जसप्रीत बुमराहनं हेटमायर पाठोपाठ खेळपट्टीवर स्थिरावलेल्या रोस्टन चेसचीही विकेट घेतली. 12व्या षटकांत वेस्ट इंडिजला दोन धक्के बसले. रोस्टन चेस 40 धावा काढून आउट झाला.
हेटमायर आउट, कॅरोबियन संघाला दुसरा धक्का
वेस्ट इंडिजला 102 धावांवर दुसरा धक्का बसला. जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर हेटमायर बाद झाला. त्यानं 27 धावा केल्या.
वेस्ट इंडिजच्या 100 धावा पूर्ण
सामन्यात प्रथम फंलदाजी करताना वेस्ट इंडिजच्या 11.1 षटकांत 100 धावा पूर्ण झाल्या.
10 षटकात 82 धावा
सामन्यात प्रथम फंलदाजी करताना वेस्ट इंडिजचा अर्धा डाव संपला आहे. 10 षटकांत त्यांनी 1 बाद 82 धावा केल्या. रोस्टन चेस आणि शिमरन हेटमायर मैदानात आहेत. कॅरोबियन संघाची नजर मोठ्या धावसंख्येवर असेल.
68 धावांवर पडली पहिली विकेट
भारतीय संघाला 9व्या षटकात पहिली विकेट घेता आली. वरुण चक्रवर्तीच्या गोलंदाजीलक शाय होप 32 धावांवर क्लीन बोल्ड झाला. कॅरोबियन संघाला 68 धावांवर पहिला धक्का बसला.
वेस्ट इंडिजच्या पॉवरप्लेमध्ये 45 धावा
सामन्यात प्रथम फंलदाजी करताना नव्या सलामी जोडीसह वेस्ट इंडिजनं दमदार सुरुवात केली. भारतीय संघाच्या खराब क्षेत्ररक्षणाचा त्यांनी फायदा घेतला. संघानं पॉवरप्ले अखेर 6 षटकांत बिनबाद 45 धावा केल्या आहेत.
ब्रँडन किंग बाहेर
वेस्ट इंडिजनं आजच्या सामन्यासाठी त्यांचा सलामीचा फलंदाज ब्रँडन किंगला प्लेइंग इलेव्हनमध्ये समाविष्ट केलं नाही. त्यांनी अकील हुसेनचा समावेश केला आहे. याचा अर्थ संघानं एका फलंदाजाला वगळून फिरकी गोलंदाजांना संधी दिली आहे.
वेस्ट इंडिजची प्लेइंग 11
शाय होप (विकेटकीपर), रोस्टन चेस, शिमरोन हेटमायर, रोवमैन पॉवेल, शेरफेन रदरफोर्ड, रोमारियो शेफर्ड, जेसन होल्डर, मैथ्यू फोर्ड, अकील होसेन, गुडाकेश मोटी, शमर जोसेफ
सामन्यात भारताची प्लेइंग 11
संजू सॅमसन (विकेटकीपर), अभिषेक शर्मा, ईशान किशन, सूर्यकुमार यादव (कर्णधार), हार्दिक पांड्या, तिलक वर्मा, शिवम दुबे, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह
टीम इंडियाची नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी
या महत्त्वाच्या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यासाठी टीम इंडियामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
भारताकडे 10 वर्षे जुन्या पराभवाचा बदला घेण्याची संधी
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात शेवटचा सामना 2016 मध्ये मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर टी-20 विश्वचषकात झाला होता. विशेष म्हणजे, तो सामना सेमीफायनल सामना होता, ज्यामध्ये भारताचा पराभव झाला आणि संघ अंतिम फेरीत स्थान मिळवू शकला नाही. आता आज या पराभवाचा बदला घेण्याची संधी भारताकडे आहे.
ईडन गार्डन्सवर दोन्ही संघांची कामगिरी
भारतानं ईडन गार्डन्सवर फक्त एकच टी-20 विश्वचषक सामना खेळला आहे. 2016 च्या टी-20 विश्वचषकात भारताचा सामना याच मैदानावर पाकिस्तानशी झाला होता, जिथं भारतीय संघ सहा विकेट्सनं विजय मिळवला होता. 2022 मध्ये ईडन गार्डन्सवर भारताचा तीन वेळा वेस्ट इंडिजशी सामना झाला होता. दरम्यान, वेस्ट इंडिजच्या या प्रसिद्ध मैदानाच्या आठवणी आहेत. दहा वर्षांपूर्वी, त्यांनी 2016 च्या टी-20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत इंग्लंडला पराभूत करुन त्यांचे सर्वात प्रतिष्ठित आयसीसी जेतेपद जिंकले होते. वेस्ट इंडिजनं या मैदानावर तीन टी-20 विश्वचषक सामने खेळले आहेत आणि कधीही एकही सामना गमावलेला नाही. शाई होपचा संघ घरच्या संघाविरुद्ध ही मालिका सुरु ठेवण्याचा प्रयत्न करेल.
ईडन गार्डन्सची खेळपट्टी कशी असेल
ईडन गार्डन्स मैदान फलंदाजीसाठी अनुकूल मानला जातो, त्यामुळं भारत आणि वेस्ट इंडिज दोघंही आक्रमक रणनीती अवलंबण्याची शक्यता आहे. नवीन चेंडूनं सुरुवातीला वेगवान गोलंदाजांना थोडी हालचाल मिळू शकते, परंतु एकदा चमक कमी झाली की परिस्थिती फलंदाजांना अनुकूल होऊ शकते. फिरकी गोलंदाजांना जास्त मदत मिळण्याची अपेक्षा नाही. त्यामुळं, प्रेक्षकांना उच्च धावसंख्या असलेल्या सामन्याची अपेक्षा असू शकते.
हेड टू हेड रेकॉर्ड कसा
भारत आणि वेस्ट इंडिज आतापर्यंत 30 टी-20 सामन्यांमध्ये आमनेसामने आले आहेत. भारतानं 19 वेळा विजय मिळवला आहे, तर वेस्ट इंडिजनं 10 वेळा विजय मिळवला आहे, एक सामना अनिर्णित राहिला आहे. टी-20 विश्वचषकात दोन्ही संघ चार वेळा एकमेकांसमोर आले आहेत. वेस्ट इंडिजनं तीन सामने जिंकले आहेत, तर भारतानं फक्त एकच सामना जिंकला आहे.
कधी सुरु होणार सामना?
कोलकाता इथं भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7:00 वाजता सुरु होईल. यासाठी टॉस अर्धा तास आधी, संध्याकाळी 6:30 वाजता होईल. सामना रात्री 10:30 च्या सुमारास संपण्याची अपेक्षा आहे. त्यानंतरच कोणता संघ उपांत्य फेरीत पोहोचेल याचा निर्णय घेतला जाईल. याचा अर्थ असा की एका संघाचा प्रवास इथंच संपेल, तर दुसऱ्या संघाचा जेतेपदाचा दावेदार राहील आणि पुढं जाईल.

